Organic Vegetable Farming: प्रयोगशीलतेतून शाश्‍वत, किफायतशीर शेती

Agro-Entrepreneurship: सिंधुदुर्गातील तानाजी सावंत यांनी भात आणि भाजीपाला पिकांवर आधारित बहुपर्यायी शेती मॉडेल तयार करून थेट विक्रीचे सशक्त जाळे उभे केले. पारंपरिक वाणांचे संवर्धन, कृषी अवजारनिर्मिती आणि सेंद्रिय पद्धतीचा वापर करत त्यांनी शाश्वत व किफायतशीर शेतीचा आदर्श निर्माण केला आहे.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबडपाल (ता. कुडाळ) येथील तानाजी सावंत यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे. खरिपात भात, तर अन्य हंगामांत थोड्या- थोड्या गुंठ्यांत विविध भाजीपाला उत्पादन घेत थेट विक्री व्यवस्थाही तयार केली आहे. सोबतीला पारंपरिक वाणांचे संवर्धन व अवजारांची निर्मिती करणारे सावंत यांनी शेती किफायतशीर व शाश्‍वत केली आहे.

सिं धुदुर्ग जिल्हयात मुंबई-गोवा महामार्गावर मुळदे मार्गानजिक तीन किलोमीटरवर आंबडपाल गाव आहे. मुळदे संशोधन केंद्रापासून जवळ असल्याने नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन येथील शेती, बागायतीमध्ये अनेक बदल झाल्याचे दिसून येतात. आंबा, काजू, सुपारीसह नारळाची मोठी लागवड या भागात दिसून येते. खरिपात बहुतांश शेतकरी भात, नाचणीचे उत्पादन घेतात.

Agriculture
Agriculture Success Story: तामशीने मिळवली प्रगतिशील शेतीत ओळख

सावंत यांची प्रयोगशीलता

गावातील तानाजी सोमा सावंत हे प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांची सुमारे सात एकर शेती असून, त्यातील वाटचाल किंवा प्रवास आवर्जून लक्षात घेण्याजोगा आहे. नववीत शिकत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे बालवयातच शेतीची आणि कुटुंबाची जबाबदारी आली. शिक्षणाला तेथेच पूर्णविराम मिळाला. त्यावेळी शेती पारंपरिक पद्धतीने असल्याने घरखर्च भागत नव्हता.

आर्थिक गरिबीचे चटके बसत होते. त्यामुळे पुढे कुडाळ येथील खासगी कंपनीत त्यांनी टर्नर- फिटर पदाची नोकरी धरली. शिक्षण कमी असले तरी अनुकरण क्षमता चांगली होती. मन लावून काम करण्याची वृत्ती होती. त्यामुळे काम जलदगतीने आत्मसात केले. सुमारे चार वर्षे नोकरीचा अनुभव घेतला. रात्रपाळीतही काम केले. नोकरीचे ठिकाण आठ किलोमीटरवर होते. सायकलद्वारे ते जाऊन येऊन करायचे. दुसरीकडे शेतीकडेही लक्ष देणे सुरू होते. पावसाळ्यात भात लागवड करताना सुट्टी घ्यायचे आणि लागवड पूर्ण झाली की कामावर ते रुजू व्हायचे.

प्रशिक्षणाने दिली दिशा

शेतीची आवड असल्यामुळे कृषी विभागाच्या प्रत्येक प्रशिक्षणाला सावंत हजेरी लावायचे. शेतीशाळा, शेतीसहलींमध्ये उत्साहाने सहभागी व्हायचे. त्यातून पॉली मल्चिंग, ठिबक, तुषार सिंचन, सेंद्रिय शेतीआदींचा अभ्यास झाला. आपणही असेच बदल केले पाहिजेत, नवे तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे असा विचार मनात घोळू लागला. जेवढे शक्य आहे तेवढ्याच पुरते पाटपाण्यावर कलिंगड शेती करायला सुरवात केली.

सोबत वाल, भुईमूग अशी पिके ते घेऊ लागले. सिंधुदुर्गात घाटमाथ्यावरूनच भाजीपाला विक्रीसाठी येतो हे सावंत यांच्या निर्दशनास आले. त्यामुळे आपणच त्याचे उत्पादन सुरू केल्यास बाजारपेठेचा प्रश्‍न राहणार नाही हे जाणले. त्यामुळे उन्हाळ्यात भाजीपाला लागवडीवर भर दिला. प्रत्येक प्रकारचा भाजीपाला व तोही थोड्या थोड्या स्वरूपात करण्यास सुरुवात केली. त्यातून चांगले उत्पन्न मिळू लागले. टप्प्याटप्प्याने भाजीपाला पिकांमध्ये वाढ करीत गेले.

Agriculture
Agriculture Success Story: शेतीला मिळाली मसाला उद्योगाची जोड

प्रयोगशीलता केली सिद्ध

आजमितीला त्यांचा शेतीत ३० वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. नदीकाठची जमीन असल्याने त्यांना खरिपात भातपिकाचाच मुख्य पर्याय असतो. नाचणीही असते. सावंत ओळखले जातात ते म्हणजे भाजीपाला व कलिंगड पिकांत. रब्बी हंगामात दीड एकरात ते कलिंगड घेतात. तर प्रत्येकी १० ते २० गुंठ्यांत विविध भाजीपाला पिके ते घेतात. यात वाल, गवार, घेवडा, काकडी, कारली, भेंडी, चवळी आदींचा समावेश असतो. ही पिके त्यांना कमी कालावधीत ताजे उत्पन्न मिळवून देतात.

तर सोबत नारळ व सुपारीची प्रत्येकी १०० तर काजूची ६० झाडे वर्षातून एकदा व्यावसायिक उत्पन्न मिळवून देतात. ७५ ते ८० टक्के सेंद्रिय पद्धतीचा वापर होतो. गादीवाफा, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन यांच्यासह जिवामृत, दशपर्णी तसेच विविध अर्क तयार करून त्यांचा वापर होतो. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून ५० टक्के अनुदानाच्या साह्याने पाच एचपी क्षमतेचा पंप बसविला आहे. बारमाही वाहणाऱ्या भंगसाळ नदीचे पाणी उपयोगात येते.

थेट विक्री व्यवस्था तयार केली

कोरोना काळात विक्री व्यवस्था अडचणीत आली. सावंत यांच्याकडे त्यावेळी २८ टन कलिंगड विक्रीयोग्य झाले होते. परंतु त्याचे आता काय करायचे असा प्रश्‍न निर्माण झाला. मात्र ऐन संकटात ते डगमगले नाहीत. त्यांनी प्रशासनाकडून विक्री परवाना घेतला. गावोगावी जाऊन कलिंगड विक्री करण्यास सुरवात केली. नफा झाला नाही तर चालेल. परंतु नुकसान नको या हेतूने सर्व कलिंगडांची विक्री केली. त्यामुळे मोठे नुकसान टळले. अनेक शेतकऱ्यांकडेही त्या वेळी विविध माल उपलब्ध होता.

अशावेळी सावंत यांनी पुढाकार घेत पुढील दोन महिने टेम्पोतून त्या मालाचीही विक्री केली. त्यातून अन्य शेतकऱ्यांचेही नुकसान टळले. आता कोकणात कलिंगडाचे उत्पादन अधिक होत असल्याने दरांची समस्या निर्माण होत असल्याने त्याचे क्षेत्र कमी करण्याचा विचार आहे. आपल्या सर्व भाजीपाल्यासाठी थेट विक्री व्यवस्था तयार केली आहे. व्हॉट्‍सॲप ग्रुपवर मालाच्या उपलब्धतेची ग्राहकांना माहिती दिली जाते. मागणीनुसार पुरवठा होतो. घरपोच देण्याचीही व्यवस्था आहे. सुमारे ४० ते ५० कायमस्वरूपी ग्राहक तयार केले आहेत. सेंद्रिय उत्पादन असल्याने ग्राहकांकडून मागणी असते. याशिवाय कुडाळ येथे भरणाऱ्या बाजारातही विक्री होते. शेतीतून वार्षिक पाच ते सहा लाखांची उलाढाल करण्यापर्यंत यशस्वी पल्ला गाठला आहे.

पारंपरिक वाण संवर्धन

सावंत यांना पारंपरिक वाणांचे संवर्धनही करण्याचाही छंद आहे. त्यांनी वालाच्या स्थानिक सात वाणांचे संवर्धन केले असून त्यांचे उत्पादनही ते घेतात. भाताचे पारंपरिक पाटणी वाणही त्यांच्याकडे आहे. सावंत भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत. संघाच्या बियाणे बॅंकेची जबाबदारी देखील त्यांच्याकडे आहे. या बॅंकेत सुमारे ८० ते ८५ प्रकारचे विविध वाण पाहण्यास मिळतात. संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याचीही सावंत यांची धडपड असते. कुडाळ येथे शेतीमाल बाजार सुरू करणाऱ्यांपैकी त्यांचाही मुख्य सहभाग होता.

यांत्रिकीकरण

काही वर्षे टर्नर फिटर म्हणून व्यवसाय केल्याने यांत्रिकीकरणात त्यांनी कुशलता मिळवली आहे. त्यातूनच तीन अवजारांची निर्मिती केली आहे. तीन फाळ, सरी फाळ, गादीवाफा फाळ आदींचा त्यात समावेश आहे. त्याची दखल कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्राने घेतली आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना सावंत यांच्या प्रक्षेत्रावर नेऊन यासंदर्भातील प्रात्यक्षिके कृषी विभागाने घेतली आहेत. या अवजारांमुळे शेतकऱ्यांचा वेळ व कष्ट यामध्ये बचत झाली आहे. कोकणातील हवामान, भौगोलिकता आदींना पूरक अशा पिकांची निवड करण्याकडे सावंत यांचा कल असतो. सलग दोन- तीन वर्षे भंगसाळ नदीला पूर येऊन त्यांच्या कणगर पिकाचे एकूण काही लाखांचे नुकसान झाले. तरीदेखील यावर्षी जागा बदलून त्याची लागवड करण्याचा निर्धार केला आहे.

तानाजी सावंत ९४०४९४३४७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com