Green Peas Farming : परभणी जिल्ह्यात रामभाऊंचा यशस्वी वाटाणा प्रयोग

Green Peas Cultivation : आता चार वर्षांपासून या पिकात सातत्य असून विविध आठवडी बाजारांमधून स्वतः थेट विक्री करून आपल्या वाटाण्यास त्यांनी बाजारपेठ तयार केली आहे. उत्पन्नाचे हुकमी साधन तयार केले आहे.
Green Peas Cultivation
Green Peas Farming Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : सहजपूर-जवळा (ता. जि. परभणी) हे गटग्रामपंचायत असलेले ८०० लोकसंख्येचे गाव परभणी शहरापासून २० किलोमीटरवर आहे. पैठण येथील जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील या गावात केळी, ऊस, टरबूज आदी प्रमुख पिके घेण्यात येतात. अलीकडील वर्षांत बारमाही भाजीपाला घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

गावातील रामभाऊ लक्ष्मणराव लांडगे हे अल्पभूधारक शेतकरी असून, पाच एकर त्यांची मध्यम ते भारी प्रकारची शेती आहे. त्यांचे पितृछत्र बालपणीच हरवले. आई गयाबाई यांनीच त्यांचे संपूर्ण पालनपोषण केले. घरची शेती पाहण्यासाठी वडिलधारी कुणी नसल्यामुळे रामभाऊंनाच मग दहावीच्या शिक्षणानंतर ही जबाबदारी स्वीकारावी लागली. तेव्हापासून आजगायत त्यांचा शेतीतील दांडगा अनुभव तयार झाला आहे.

सिंचनाची शाश्‍वती मिळवली

जायकवाडी डाव्या कालव्याची चारी रामभाऊंच्या शेतातून गेली आहे. त्यामुळे भुईदांडाने प्रवाही पद्धतीने पाणी देता येते. सिंचनासाठी सामाईक विहीर आहे. परंतु कमी पावसाच्या वर्षी पाणी अपुरे पडत असे. धरण न भरल्यास कालव्याव्दारे आवर्तने मिळत नसे. त्या वर्षी उत्पन्नाची शाश्‍वती नसे.

त्यामुळे परभणी शहरात खासगी नोकरी करून कुटुंबाला आधार देताना बोअरची व्यवस्था केली. त्यास चांगले पाणी लागले. आता अन्य पिकांमध्ये ऊस असून त्याचे एकरी ६० टनांपर्यंत उत्पादन मिळते. वांगी, टोमॅटो, कारले, दोडके आदी भाजीपाल्यांसह मधुमक्याचेही उत्पादन घेण्यात येते. वाटाण्याचा प्रयोग

रामभाऊंचे चुलत बंधू अर्जुन भारतीय टपाल विभागाच्या सेवेत कऱ्हाड (जि, सातारा) येथे सेवेत आहेत. ते एकदा तेथून वाटाणा बियाणे घरी घेऊन आले. बंधू मुरलीधर यांच्या मदतीने त्यांनी त्याच्या लागवडीचा प्रयोग केला. रामभाऊंनी मग आपल्या शेतात त्या बियाण्या आधारे २० गुंठ्यांत लागवडीचे धाडस केले.

वास्तविक जिल्ह्यात त्यावेळी हे पीक फारसे कोणी घेत नव्हते. हा नवाच प्रयोग होता. पण मोठ्या कष्टाने व कुशलतेने या पिकाची देखभाल करून १० क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले.

सुमारे तीन महिने कालावधीत कमी खर्चात चांगले दर व उत्पन्नही मिळाल्याने रामभाऊंचा आत्मविश्‍वास वाढला. तेव्हापासून म्हणजे सुमारे चार वर्षांपासून या पिकाची ते दरवर्षी २० गुंठे ते एक एकरावर लागवड करतात.

Green Peas Cultivation
Agriculture Success Story : प्रयोगशील शेतीमुळे नाईक बनले आदर्श शेतकरी

...असे असते पीक व्यवस्थापन

दरवर्षी नोव्हेंबरमध्ये पहिली व पंधरा दिवसांच्या फरकाने दुसरी अशा दोन टप्प्यांमध्ये होते लागवड.त्यातून अधिक काळ ताज्या, कोवळ्या, दर्जेदार शेंगांची विक्री करत राहता येते.

बाजारपेठेतील मागणीनुसार तीन वैशिष्ट्यपूर्ण वाणांची निवड.

दोन ओळींत १० इंच अंतर ठेवून बैलचलित किंवा ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राव्दारे पेरणी. एकरी ४० किलो बियाणे लागते. त्याचवेळी खते देण्यात येतात. कोळपणीव्दारे आंतरमशागत.

रसशोषक प्रतिबंधक कीटकनाशक व बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया.

प्रवाही पद्धतीने पाच ते सहा पाणी पाळ्या देण्यात येतात.

पेरणीनंतर ७० दिवसांनंतर शेंगा तोडणीस येतात. प्रत्येक शेंगेत दहा ते बारा दाणे. एकूण तीनपर्यंत होतात तोडे. दुसऱ्या तोड्यास सर्वांत जास्त शेंगा मिळतात.

हिरव्या शेंगांचे एकरी ३० क्विंटलपर्यंत मिळते उत्पादन.

स्वतःची तयार केली विक्री व्यवस्था

अन्य भाजीपाल्याची परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना विक्री होते. परंतु वाटाण्याची विक्री रामभाऊ आठवड्यातील विविध आठवडी बाजारांत स्वतः बसून करतात. त्यासाठी दररोज सकाळी लवकर मोटरसायकलवरून माल वाहून नेण्याची कसरत झेलावी लागते. दररोज सुमारे ८० ते १०० किलो शेंगांची विक्री होते. गावापासून १५ ते ३० किलोमीटर परिघात गावे आहेत.

पैकी ताडकळस (ता.पूर्णा) येथे रविवारी, पोखर्णी नृसिंह (ता.परभणी) येथे मंगळवारी, रामपुरी बुद्रूक (ता.मानवत) येथे गुरुवारी असे हे बाजार असतात. हिवाळा, जानेवारी (मकर संक्रांत), फेब्रुवारीत वाटाण्यास मोठी मागणी असते. प्रति किलो सरासरी ५० ते ६० रुपये दर मिळतात.

Green Peas Cultivation
Success Story : शेतकऱ्याच्या घरातून डॉक्टरपर्यंतचा यशस्वी प्रवास

ताज्या शेंगांच्या विक्री व्यतिरिक्त प्रतवारीतून वेगळ्या झालेल्या निबर शेंगा वाळवून किराणा दुकानदारांना प्रति किलो ६० ते ७० रुपये दराने त्यांची विक्री होते. मागील वर्षी या पिकाने खर्च वजा जाता एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिल्याचे रामभाऊ म्हणाले. आमच्या जिल्ह्यात किंवा भागात एखादा दुसरा अपवाद वगळता वाटाणा हे पीक फार अभावाने घेतले जाते. केळी, ऊस हीच प्रमुख पिके आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर कमी कालावधीत चांगले पैसे मिळवून देणारे वाटाणा हे पीक ठरल्याचेही ते म्हणाले.

कुटुंब राबते शेतात

रामभाऊंकडे बैलजोडी नाही. मामांकडून ती आणून किंवा भाडेतत्वावर ट्रॅक्टर आणून शेतीकामे केली जातात. आई गयाबाई, पत्नी आशामती देखील रामभाऊंसोबत मशागत, लागवडीपासून ते काढणी पर्यंतची सर्व कामे करतात. त्यातून कामांची विभागणी होते. मजुरांवरील खर्चात बचत होते. भाजीपाला तोडणीसाठी मात्र तीन-चार मजुरांची मदत घ्यावी लागते. बारावी झालेला मुलगा स्वप्नील देखील शेतीत शक्य ती मदत करतो.

रामभाऊ लांडगे ७६२०९८८०६५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com