Chana Farming : मजूरटंचाईसह पाण्याची समस्या झेलत हरभरा केला यशस्वी

Success Story Of Chana Farming : नांदेडपासून सत्तर किलोमीटरवर असलेल्या कामनगाव (ता. भोकर) येथील युवा शेतकरी संदीप देशमुख यांना दरवर्षी मजूरटंचाई व पाणी या दोन समस्या भेडसवतात. मात्र त्यावर मात करण्याचा प्रयत्न करीत खरीप पिकांच्या तुलनेत रब्बीतील हरभरा पिकातून त्यांनी यश संपादन केले आहे.
Chana Farming
Chana FarmingAgrowon

Chana Crop Management : नांदेड जिल्ह्यात मागील दहा वर्षात रब्बी हंगामामध्ये सर्वात महत्त्वाचे पीक म्हणून हरभराच पुढे आले आहे. यापूर्वी शेतकरी रब्बीमध्ये ज्वारी, सूर्यफूल, करडई, गहू या सारखी पिके घेत होते.

परंतु या पीक पद्धतीत शेतकऱ्यांनी बदल केला आहे. खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग यासारखी पिके घेतल्यानंतर शेतकरी हरभरा घेऊ लागले आहेत. जिल्ह्यात मागील काही वर्षात रब्बीचे एकूण क्षेत्र चार लाख हेक्टरपर्यंत पोचले आहे.

त्यापैकी अडीच लाख हेक्टरवर हरभरा पेरणी होते. यामुळे नांदेड जिल्ह्यात भोकर तालुका व त्यातही कामनगाव अवर्षणग्रस्त भाग आहे. कापूस, सोयाबीन, तूर ही इथली खरिपाची मुख्य पिके आहेत.

मात्र अलीकडील वर्षात अतिवृष्टी होऊ लागल्याने ऐन महत्त्वाच्या अवस्थेत तुरीचे नुकसान होऊ लागले आहे. मर रोगाची समस्याही जाणवू लागली आहे. उत्पादकता घटल्याने जिल्ह्यात तुरीचा पेरा खूप कमी झाला आहे. साहजिकच हरभऱ्याकडे ओढा वाढला आहे.

शेती व्यवस्थापनात बदल

कामनगाव येथील संदीप देशमुख यांनीही मजूरटंचाई व पाणी या आपल्या समस्या जाणून त्यानुसार पीक पद्धती व व्यवस्थापनात बदल करून शेतीत यश मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची २९ एकर शेती आहे. खरिपात ते सोयाबीन व त्यात तुरीचे आंतरपीक घेतात. सोयाबीननंतर हरभरा घेतात. पूर्वी हरभऱ्याचे क्षेत्र एक ते दोन एकरच असायचे.

मात्र समस्यांवर उपाय शोधून तसे तुषार सिंचनाचा वापर करून त्यांनी या पिकातील उत्पादकता वाढवण्यास सुरवात केली आहे. अलीकडील काळात हरभऱ्याखालील क्षेत्र १५ एकरांपर्यंत वाढवले आहे. जॉकी ९२१८ हे एकच वाण संपूर्ण क्षेत्रावर निवडतात. भारी ते मध्यम जमिनीत ते चांगले येते. ते अधिक उंच न वाढता पसरट वाढते.

शाखाही चांगल्या येतात असा त्यांचा अनुभव आहे. एकरी सुमारे ४० ते ४२ किलो बियाणे वापरतात. रासायनिक व जैविक अशा दोन्हीही बीजप्रक्रिया करतात. संदीप सांगतात की पाच वर्षांपूर्वी केलेल्या माती परिक्षणात पोटॅश जास्त आढळला होता. त्यामुळे त्याचे प्रमाण कमी करून स्फुरदाचे प्रमाण वाढवले आहे. सोयाबीनमध्ये गंधकाच्या वापरावर अधिक भर दिला आहे.

Chana Farming
Chana Farming : नेमाने झाले हरभरा बीजोत्पादनात ‘मास्टर’

पाण्याचे नियोजन

सुरवातीला रोटावेटरचा वापर करून जमिनीची चांगली मशागत करतात. ट्रॅक्टरचलित यंत्राच्यासाहाय्याने बियाणे पाच ते सहा इंच खोलवर पडेल या अंदाजाने पेरणी होते. बियाणे खोलीवर पडल्याने पुढे त्याचा बराच फायदा होतो.

रानडुकरांपासून होणारा त्रास कमी होतो. उगवण चांगली होते आणि सरतेशेवटी पाण्याची गरज कमी पडते असे संदीप सांगतात. चांगल्या उगवणीसाठी जमीन खोलवर भिजवावी लागते. त्यासाठी सुरवातीला पेरणी झाल्यानंतर आठ तास तुषार सिंचनाच्या साहाय्याने पाणी देतात. त्यामुळे सर्व क्षेत्रात एकसमान पद्धतीने एकाच वेळेला चांगल्या उगवण क्षमतेने पीक येते. तसेच जमिनीला चांगल्या प्रकारे वाफसा येतो.

शिवाय मर रोगाचे प्रमाणही कमी होते असे संदीप सांगतात. दुसरे पाणी २० ते २५ दिवसांनी दिले जाते. यावेळी मात्र ते आठ तासांच्या ऐवजी पाच ते सहा तास दिले जाते. तिसरे पाणी घाटे अवस्थेत दिले जाते. योग्य वेळी ताणही दिला जातो. पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे घाटे लागण्याची संख्या भरपूर वाढते.

संदीप सांगतात की हरभऱ्याचे काही शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्याचे कारण म्हणजे घाटे अवस्थेत पिकाला कमी पडलेलं पाणी आणि अन्न. पीक जसजसे मोठे होत जाते तसतशी त्याची तहान, भूक वाढत जाते.

आमच्या भागात सिंचनाचे अपुरे प्रमाण असल्याने पिकाच्या नंतरच्या टप्प्यात एखादे पाणी देण्याचं टाळलं जातं. त्याचबरोबर पाटाचे किंवा रानपाणी देण्यापेक्षा तुषार सिंचनाचा वापरच अधिक फायदेशीर ठरतो.

दोन पाईपमधील अंतर चाळीस फूट असते. तुषार संच बसवताना दोन्ही लाइन्स मधील नोझल एकमेकांसमोर न येता झिगझॅग पद्धतीने लावले तर एकाच ठिकाणी पाणी जास्त होण्याचा धोका टाळता येतो. कोळपणी, निंदणी करून तणांचेही तितकेच नियंत्रण करणे गरजेचे आहे. पीक चांगले असूनही तणनियंत्रणाच्या अभावामुळे अपेक्षित लाभ मिळत नाही असे संदीप सांगतात.

संदीप देशमुख ५२५३५४४५

Chana Farming
Chana Varieties : हरभरा लागवडीच्या सुधारित पद्धती

एकरी उत्पादनात वाढ

संदीप सांगतात की पूर्वी एकरी सात क्विंटलपर्यंतच उत्पादन मिळायचे .आता सुधारित व्यवस्थापनातून एकरी १० ते ११ क्विंटल उत्पादन साध्य होत आहे. दाण्याचा टपोरा आकार आणि चांगल्या गुणवत्तेमुळे दरही चांगला मिळत आहे.

भोकर येथे विक्री होते. प्रति क्विंटल ५५०० रुपये दर मिळत आहे.घरच्या अर्थकारणाला या पिकातून बळ मिळाल्याचे संदीप सांगतात. यंदा हरभऱ्याचे क्षेत्र कमी असल्याने आवक कमी होऊन दर थोडे वाढतील असा अंदाज असल्याचे ते म्हणाले.

त्यांनी सोयाबीनचे कमी कालावधीत येणाऱ्या वाणाचे यंदा एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे. हरभऱ्याचा बेवड सोयाबीनला फायदेशीर ठरतो असे ते म्हणाले. उन्हाळ्यात जमिनीला विश्रांती दिली जाते.

हळदीचे क्षेत्र केले कमी

संदीप सांगतात की आमच्या भागात मजूर मिळत नसल्याची मोठी समस्या आहे. तसेच दोन विहिरींवरच शेतीची भिस्त असते. त्यामुळे प्रयोगांवर मर्यादा येतात. मागील पाच वर्षे हळदीचे पीक घेतले होते. पण याच समस्यांमुळे यंदा हळद घेण्याचे टाळले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com