Jalgaon News : खानदेशात या आठवड्यात मोठ्या काबुली किंवा डॉलर (मेक्सिको) हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. यंदा पेरणी स्थिर होती तसेच नैसर्गिक समस्यांनी पीक हवे तसे नव्हते. यामुळे आवक रखडत होईल, असे संकेत आहेत. आवकेला सुरुवात झाली असून सध्या कमाल दर १३ हजार रुपयांपर्यंत असल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांनी सांगितले.
मोठ्या काबुली हरभऱ्यास खानदेशात डॉलर किंवा मेक्सिकोदेखील म्हटले जाते. त्याचा आकार मोठा व रंग बासुंदी रंगांचा आहे. मोठ्या काबुलीची मागील तीन दिवसांत खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांत प्रतिदिन सरासरी २५० क्विंटल आवक झाली आहे. सर्वाधिक ९० ते १०० क्विंटल आवक चोपडा बाजार समितीत झाली. यासह धुळ्यातील शिरपूर व अमळनेर (जि. जळगाव) येथेही काबुली हरभऱ्याची आवक होत आहे.
अन्य बाजार समित्यांत अपवादानेच मोठ्या काबुली हरभऱ्याची आवक होत आहे. मागील हंगामातही खानदेशात चोपडा व शिरपूर येथेच आवक अधिक झाली होती. कारण चोपडा व शिरपूर भागात त्याची पेरणी अधिक केली जाते. चोपड्यातील तापी व अनेर काठ मोठ्या काबुलीसाठी प्रसिद्ध आहे.
त्यात अजंतीसीम, वढोदा, विटनेर, वाळकी, मोहिदे, दगडी, गणपूर, माचले, गोरगावले, कुरवेल, सनपुले, गरताड, घुमावल, खडगाव, शिरपुरातील भावेर, तरडी, होळनांथे, जापोरा, घोडीसगाव, अर्थे, कुवे, निमझरी आदी भागांत त्याची पेरणी केली जाते. जळगाव जिल्ह्यात जळगाव यावल, रावेर व जामनेरातही मोठ्या काबुलीची पेरणी केली जाते.
अनेक शेतकऱ्यांनी कांदेबाग केळीची काढणी ९० ते ९५ टक्के पूर्ण झाल्यानंतर त्यात मोठ्या काबुली हरभऱ्याची डिसेंबरमध्ये टोकण पद्धतीने लागवड केली होती. कमाल शेतकरी आपल्या घरातील मोठ्या काबुली हरभऱ्यावर बीज पक्रिया करून त्याची लागवड करतात. त्याचे उत्पादन सध्या काही भागात कमी तर काही भागात एकरी पाच ते सहा क्विंटल एवढे आल्याची माहिती आहे.
दर १३ हजारांपर्यंत
मोठ्या काबुली हरभऱ्यास खानदेशात कमाल १३ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहेत. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा दर बरा आहे. परंतु सध्या आवकेची सुरुवात आहे. यामुळे दर अधिक असल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. चोपडा बाजार समितीत मागील तीन दिवस मोठ्या काबुली हरभऱ्यास सरासरी १२ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे.
एवढाच दर शिरपूर व अमळनेरात आहे. चोपडा बाजार समितीत बुधवारी (ता. २१) मोठ्या काबुली हरभऱ्याची ९० क्विंटल आवक झाली. किमान ११ हजार ९०१ व कमाल १२ हजार ९४९ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जळगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर, यावल आदी बाजार समित्यांत सध्या आवक नसल्याचे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.