Chana Farming : हरभरा बीजोत्पादनात देशमुखांचे नाव खात्रीचे

Success Story of Chana Farming : अलीकडील वर्षांमध्ये हवामान बदलाचे फटके शेतकऱ्यांना बसत आहेत. अशावेळी कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब होतो, त्यापैकीच प्रयोगशील शेतकरी म्हणजे मंगेश देशमुख हे आहेत.
Chana Crop
Chana CropAgrowon

Chana Production : पूर्वी खात्रीशीर पाऊस पडणारा जिल्हा अशी परभणीची ओळख होती. परंतु अलीकडील वर्षांमध्ये हवामान बदलाचे फटके शेतकऱ्यांना बसत आहेत. अशावेळी कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत प्रयोगशील शेतकरी हवामानुकूल शेती करीत आहेत. परभणीपासून १५ किलोमीटरवरील पेडगाव (ता. जि. परभणी) येथील युवा प्रयोगशील शेतकरी मंगेश देशमुख त्यापैकीच एक आहेत. बारावीनंतर डी. एड. पदविका व त्यानंतर बीसीए (संगणक विषय) पदवीच्या दुसऱ्या वर्षापर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर घरची शेतीच करण्याचा निर्णय घेतला.

शेतीचे नियोजन

देशमुख यांची १८ एकर मध्यम प्रकारची जमीन आहे. चार एकर ते भाडेतत्वावर करतात. दोन विहिरी व विंधन विहिरी आहेत. शेताच्या परिसरातील उंच भागातून वाहत येणारे पावसाचे पाणी तीन शेततळ्यांमध्ये वळते केले जाते. त्यातून विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. मंगेश यांचे वडील प्रतापराव देखील शेतीच करायचे. तेही पूर्वी सरकारी बियाणे कंपनीसाठी सोयाबीन, मूग, ज्वारी, हरभरा यांचे बीजोत्पादन घेत. मंगेश यांनीही ८ ते १० वर्षांपासून सोयाबीन व हरभरा यांच्या बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे.

Chana Crop
Seed Production : कृषी विद्यापीठाच्या बीजोत्पादनामुळे दर्जेदार बियाणे शक्य : डॉ. पाटील

हरभरा बीजोत्पादन

मंगेश दरवर्षी सुमारे १८ एकरांवर हरभरा बीजोत्पादन घेतात. मागील वर्षी सात तर यंदा तीन वाण त्यांनी घेतले. सरस ठरलेल्या वाणांची निवड करून पुढील वर्षी त्याचा विस्तार करतात. यंदा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (परभणी) सेमी काबुली बीडीएन जीके ७९८ तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (राहुरी) फुले विक्रांत वाण घेतले आहे. नवी दिल्ली येथील पुसा मानव या वाणाचाही प्रयोग केला आहे. मात्र हे वाण बीजोत्पादनासाठी नाही.

हरभरा बीजोत्पादन- ठळक बाबी

ट्रॅ्क्टरचलित पेरणीयंत्राद्वारे पेरणी. दोन ओळींमध्ये १६ इंच अंतर.

एकरी ३० ते ३२ किलो बियाणे वापर.

कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार रासायनिक कीडनाशके व जैविक घटकांची बीजप्रक्रिया.

दोन वर्षे बीबीएफ पद्धतीने पेरणी केली. परंतु त्यातून एकरी झाडांची संख्या कमी राहून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे मंगेश म्हणतात.

पेरणीसोबत ९- २४- २४ एकरी ४० किलो व गंधक एकरी ५ किलो. दुसरे पाणी देताना (३५ ते ४० दिवसांनी) एकरी २० किलो युरिया. युरियामुळे वाढ जोमाने होते. परंतु फळफांद्या वाढविण्यासाठी वाढ नियंत्रकाची फवारणी.

जमिनीत उपलब्ध ओलाव्यावर पेरणी. त्यानंतर ४ ते ५ दिवसांनी तुषार संचाद्वारे पाणी. पुढील पाणी ३५ ते ४० दिवसांनी व घाटे भरण्याच्या

अवस्थेत पुढील पाणी. सौर कृषी पंपामुळे भारनियमनाच्या काळात पाणी देण्यासाठी अडचणी येत नाहीत.

बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया असल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत नाही.

किडींची आर्थिक नुकसान पातळी ओळखून शिफारशीनुसार घाटेअळीसाठी कीटकनाशकांच्या फवारण्या. ट्रॅक्टरचलित पंपाद्वारे फवारणी. त्यामुळे श्रम आणि वेळेची बचत.

कोळपणी व दुसरे पाणी दिल्यानंतर मजुरांच्या मदतीने खुरपणी करतात. त्यामुळे पीक तणमुक्त राहते.

फुले विक्रम, पीडीकेव्ही कनक हे वाण ‘हार्वेस्टर’च्या साह्याने काढणीसाठी योग्य आहेत. अन्य वाणांची मजुरांकरवी काढणी होते.

Chana Crop
Spice Crop Cultivation : कोरडवाहूसाठी कमी पाण्यात येणाऱ्या मसाला पिकांचा विचार करा

उत्पादन, बियाणे प्रक्रिया व दर

एकरी ९ ते १२ क्विंटल बीजोत्पादन मिळते. त्यासाठी खर्च २० हजार रुपयांपर्यंत येतो. सरकारी बियाणे कंपनी अंतर्गत बीजोत्पादन कार्यक्रम आहे. त्यामुळे विशिष्ट वाणांच्या बियाण्याची शुद्धता राखण्यासाठी बीज प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे शेतावर येऊन तपासण्या केल्या जातात. ‘स्पायरल सेपरेटर’द्वारे प्रतवारी होते. संबंधित यंत्रणेकडून बियाण्याची आनुवंशिक शुद्धता चाचणी घेतली जाते. त्या निकषात पात्र ठरलेल्या बियाण्याचे चुकारे अदा केले जातात. बाजार समित्यांतील कमाल सरासरी दरांपेक्षा २५ ते ३० टक्के जास्तीचा दर बीजोत्पादनास मिळतो.

उच्च दर्जाच्या बियाण्यासाठी बोनस रक्कमही दिली जाते. मागील वर्षी संबंधित कंपनीकडून प्रति क्विंटल ५६५० रुपये दर मिळाला. शिवाय बोनसही मिळाला. त्या वेळी खुल्या बाजारात हाच दर ४२०० रुपये तर शासनाचा हमीभाव ५३३५ रुपये होता.
मंगेश देशमुख, ९९६०३१०३५८

सोयाबीनचेही उल्लेखनीय बीजोत्पादन

मंगेश दरवर्षी सुमारे १८ एकरांवर सोयाबीन बीजोत्पादनही घेतात. यात गादीवाफा, जोडओळ पद्धत व बीबीएफ यांचा वापर होतो. पारंपरिक पद्धतीत त्यांना एकरी ७ ते ८ क्विंटल उत्पादन मिळायचे. आता ते १६ ते १८ क्विंटलपर्यंत मिळते. संरक्षित सिंचनामुळे दुष्काळी वर्षांतही एकरी साडेआठ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे.

विद्यापीठाच्या मंडळावर सदस्य

मंगेश परभणीच्या कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, पीक पैदासकार यांच्या नेहमी संपर्कात असतात. त्यातून आधुनिक ज्ञान तंत्रज्ञान जाणून घेत त्याचा अंगीकार करतात. नवीन वाणांची चाचणी प्रात्यक्षिके त्यांच्या शेतावर होतात. या विद्यापीठांतर्गत कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून त्यांची निवड झाली आहे. झेंडू, टरबूज,पपई आदींचेही प्रयोग केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com