Sitaphal Orchard Success Story : निर्यातक्षम सीताफळ बागेची जोपासना

Sitaphal Plantation : बीड जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील गेवराई येथील दाभाडे कुटुंबाने सुमारे १६ एकरांत सीताफळ बाग जोपासली.
Sitaphal Cultivation
Sitaphal CultivationAgrowon
Published on
Updated on

संतोष मुंढे

Beed News : बीड जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील गेवराई येथील दाभाडे कुटुंबाने सुमारे १६ एकरांत सीताफळ बाग जोपासली. सेंद्रिय पद्धतीचा अधिकाधिक वापर, उत्कृष्ट व्यवस्थापन. सिंचनाची भक्कम व्यवस्था यातून त्यांनी निर्यातक्षम दर्जाचे सीताफळ पिकवले आहे. मार्केटिंग द्वारे परराज्यात व बांगला देशात विक्रीद्वारे दरही चांगले मिळवले आहेत. बालानगरच्या डोंगरात नैसर्गिकरीत्या पिकणाऱ्या सीताफळाचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. या दुष्काळी पट्ट्यातील गेवराई येथे रामनाथ व जयश्री हे दाभाडे दांपत्य २५ एकर शेती कसते. त्यांच्या दोन मुलांपैकी रवी हे ‘बीएस्सी’ पदवीधर असून, ते आई-वडिलांसह पूर्णवेळ शेती करतात. अमोल वकिली व्यवसाय करतात. सन २०१० पर्यंत कुटुंबाचा वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय होता. सुमारे ३५ पर्यंत म्हशी होत्या. परंतु पुरेशा मजुरांअभावी व्यवसाय बंद करून सर्व लक्ष शेतीवर केंद्रित केले. आज एक गाय, दोन बैल व एक कालवड आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीताफळाची शेती

दाभाडे यांचे सीताफळ हे आजचे मुख्य पीक आहे. जुलै २०१८ मध्ये त्यांनी सुमारे साडेबारा एकरांमध्ये एनएमके गोल्डन वाणाच्या सीताफळाची बाग १४ बाय ८ फूट अंतरावर लावली. मागील वर्षी चार एकरांवर नवी लागवड केली आहे. आज चार हजारांहून अधिक झाडे आहेत.

व्यवस्थापन

कोणत्याही रासायनिक खताचा वापर नाही. दरवर्षी ५० किलो प्रति झाड शेणखत.

दाभाडे पितापुत्र सातत्याने प्रयोग करतात. सुरुवातीला थोड्या क्षेत्रात तो करायचा. फायदा दिसल्यास जास्त क्षेत्रावर करायचा असं नियोजन असतं. जिवामृताचा वापरही अशाच प्रकारे काही झाडांवर वेगवेगळ्या टप्प्यांत करून पाहिला. आता फळ सेटिंगनंतर तीन वेळा विभागून प्रति झाड दोन लिटरप्रमाणे मडपंप व ट्रॅक्टरद्वारे वापर होतो. बेलाच्या अर्काचाही तसाच वापर.

Sitaphal Cultivation
Agriculture Department : कृषी विभागाच्या इमारतींसाठी आराखडा सादर करण्याचे निर्देश

ऑक्टोबरमध्ये शेंडा खुडणी. त्यामुळे मार्चच्या दरम्यान फळे चांगली लगडतात. त्या काळात आवक कमी झालेली असल्याने दर चांगले मिळण्याचा फायदा होतो असे रवी सांगतात. -मिलीबग वा अन्य किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी रासायनिक कीडनाशकांचा वापर. -लागवडीपूर्वी झाडांना मातीची भर लावण्यासाठी यंत्राचा शोध घेतला. ५० एचपी ट्रॅक्टर ओढू शकेल असं यंत्र हवं होतं. परंतु ते न मिळाल्याने आपल्याला हवं तसं यंत्र बनवून घेतले.

बागेत कुठेही पाणी साचणार नाही यासाठी गादीवाफ्याची (बेड) रचना.

बाग उत्पादनक्षम होईपर्यंत सुमारे तीन वर्षे मिरची, काकडी, हरभरा अशी आंतरपिके घेत उत्पन्न मिळविले.

आंतरपीक कलिंगडाने दिला फायदा

मागील दोन वर्षांपासून सीताफळाच्या नव्या बागेत पाच ते सात एकरांत कलिंगडाचे आंतरपीक घेण्यात येत आहे. ऑगस्टच्या दरम्यान त्याची लागवड केली जाते. म्हणजे दिवाळीच्या दरम्यान ते विक्रीस येते. मागील वर्षी परभणी येथील मध्यस्थाच्या माध्यमातून दिल्लीच्या व्यापाऱ्याला ते दिले होते. यंदा एकूण क्षेत्रातून सुमारे ८० टन कलिंगडाची विक्री केली आहे. त्यास किलोला साडे १२ रुपये दर मिळाला आहे.

उत्पादन आणि निर्यातही

जुन्या बागेतून २०२१ पहिले उत्पादन घेतले. त्या वर्षी एकूण क्षेत्रातून ४० टन उत्पादन मिळाले. रवी हे सीताफळ उत्पादक व व्यापारी यांच्या व्हॉटस ॲप ग्रुपमध्ये सहभागी आहेत. त्यातूनबंगळूरमधील व्यापाऱ्यांसोबत संपर्क झाला. फळांचा दर्जा पाहून परभणीच्या स्थानिक व्यावसायिकाच्या माध्यमातून तेथे सीताफळ पाठवले. साठ रुपयांपासून ११० रुपयांपर्यंत प्रति किलो दर मिळाला. पुढील वर्षी म्हणजे २०२२ मध्ये एकूण ६८ टन उत्पादन झाले. सोशल मीडियाद्वारेच हे सीताफळही कोलकाता येथील व्यापाऱ्याच्या माध्यमातून बांगलादेशात रवाना झाले. त्यास ६५ रुपयांपासून १४० रुपयांपर्यंत दर मिळाला. यंदाही दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबर अखेरीपासून उत्पादनास सुरवात होईल. मार्चअखेरपर्यंत बाग सुरू राहील. यंदा ९० ते १०० टन उत्पादनाची अपेक्षा आहे.

Sitaphal Cultivation
Processing Industry : कृषी प्रक्रिया उद्योग उभारणी ही काळाची गरज

‘ॲग्रोवन’मधील माहितीतून पाण्याचे नियोजन

यंदा ‘एल निनो’चा प्रभावामुळे पाऊसकाळ कमी राहील याबाबत ॲग्रोवनमधील माहिती वाचनात आली. ॲग्रोवनचे नियमित वाचक असलेले रामनाथ वेळीच सजग झाले. पाण्याच्या सोयीसाठी खर्च करायला मागे पुढे पाहिले, तर पुढे येऊ शकणाऱ्या लाखोंच्या उत्पन्नाला मुकावे लागेल हे जाणवले. त्यामुळे गावशिवारातील स्मशानभूमीजवळ घेतलेल्या जागेत विहीर खोदली. तीस फूट रुंद व ५० फूट खोल खोदलेल्या या विहिरीला चांगलं पाणी लागलं. साडेसात एचपी क्षमतेची मोटरपंप त्या विहिरीवर आज चालते आहे. पाण्यामुळे सीताफळासह अन्य पिकांच्या सिंचनाचा प्रश्‍नही निकाली काढून यंदा प्रतिकूल परिस्थतीत पिके घेणे दाभाडे यांना शक्‍य झाले आहे.

नाला खोली- रुंदीकरण : शेतामधून जाणाऱ्या नाल्यावर २०१६-१७ मध्ये ठरावीक चार टप्प्यांमध्ये हौदाप्रमाणे रचना करून सहा ते सात फूट खोली- रुंदीकरणाचे काम केले. त्यातून मातीसह पाणी संचय चांगल्या प्रकारे झाला. शेतातील तीन विहिरींची पाणीपातळीही टिकून राहण्यात मदत झाली.

मोसंबी बागेची जोपासना

सन २०२२ मध्ये साडेपाच एकरांवर मोसंबी बाग लावली आहे. सुमारे चार एकरांवर ऊस आहे. बांधावर यंदाच्या पावसाळ्यात नारळाची झाडे तर सफरचंदाची १० झाडे लावली आहेत. विविध फळे आपल्या शेतात असावीत आणि संपूर्ण कुटुंबाला त्याचा आनंद घेता यावा अशी दाभाडे यांची भावना असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com