
Agriculture Success Story : लातूर जिल्ह्यात लातूर ते बार्शी रस्त्यावर बोरगाव बुद्रुक (काळे) (ता. लातूर) गाव आहे. येथून शिराळा रस्त्यावर धोंडिराम शरणाप्पा माळी यांची सुमारे पावणेचार एकर शेती आहे. शेतात विहीर व बोअरचे मुबलक पाणी आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून ऊस हेच त्यांचे मुख्य पीक राहिले आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर गावात पुढील शिक्षणाची सोय नव्हती.
मुरुड किंवा लातूरला जावे लागत होते. एकुलते एक असल्याने शेती व कुटुंबाची मुख्य जबाबदारी होती. त्यामुळे धोंडिराम यांनी वडिलांना शेतीकामांत मदत करण्यास सुरुवात केली. पाच वर्षांपूर्वीपासून गावातील शेतकऱ्यांनी शेतीला पूरक म्हणून रेशीम शेती सुरू केली. या शेतीत तुती लागवडीपासून अन्य खर्चासाठी अनुदानाची तरतूद आहे.
या शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळू लागल्यानंतर गावातील अन्य शेतकरीही पुढे आले. आज गावात सुमारे १५ शेतकरी रेशीम शेती करीत आहेत. यातच गावाचा समावेश पोकरा योजनेत झाला. त्यातूनही रेशीम शेतीसाठी शंभर टक्के अनुदान होते. धोंडिराम यांनाही अन्य रेशीम उत्पादकांची प्रेरणा मिळाली. दोन वर्षांपूर्वी त्यांची रेशीम शेतीकडे वाटचाल सुरू झाली.
रेशीम शेतीतील प्रयत्न
तुतीची लागवड झाली. कोष निर्मितीसाठी ५० बाय ३० फूट लांबी- रुंदीच्या पत्र्याच्या शेडची उभारणी केली. पायाभूत खर्चासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून बिनव्याजी अडीच लाख रुपये कर्ज मिळाले. मोठे लोखंडे खांब व सिमेंट यांच्यासाठी शेडची पक्की बांधणी केली. त्यासाठी पावणेपाच लाख रुपये खर्च आला. काही किलोमीटरवर असलेल्या गाधवड येथील चॉकी सेंटरमधून शंभर अंडीपुंज आणून कोषनिर्मितीस प्रारंभ झाला दिला.
मात्र पाला खाल्ल्यानंतर अळ्या मृत झाल्याचे दिसून आले. बॅच फेल झाली. या घटनेने व्यथित होऊन न जाता धोंडिराम यांनी त्यामागील कारणांचा शोध सुरू केला. लातूर येथील रेशीम विकास अधिकाऱ्यांनी तुतीची पाने प्रयोगशाळेत पाठवली.
त्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक अंश असल्याने निदान झाले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी एक वर्ष रेशीम कोषांचे उत्पादन न घेता शेतीतील रसायनांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय सुचवले. त्यानुसार तुती काढून न टाकता त्यात आंतरपिकांप्रमाणे धैंचा हे हिरवळीचे खत व मका पीक घेतले. त्यांचे अवशेष जमिनीत गाडले.
यशस्वी उत्पादनास सुरुवात
सुमारे वर्षभरानंतर कोषनिर्मितीस पुन्हा सुरुवात केली. बॅचेस यशस्वी होऊ लागल्या. अनुभव व अभ्यास यातून प्रति शंभर अंडीपुंजांपासून ८० किलोपर्यंत कोषांचे उत्पादन मिळू लागले. लातूर, बीड व रामनगर (कर्नाटक) येथील बाजारपेठांमध्ये विक्री केली. आता गावातील शेतकऱ्यांचा समूह असल्याने एकत्रितपणे मालविक्रीचे नियोजन केले जाते.
बीड येथे रेशीम कोषांची बाजारपेठ आहे. तेथे विक्री केली जाते. प्रति १५० ते १७५ अंडीपुंजांची एक याप्रमाणे वर्षभरात चार बॅचेस घेतल्या जातात. प्रति बॅचला १३० ते १४० किलो कोषांचे उत्पादन मिळते. त्यासाठी किमान खर्च १० हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत येतो. ऊस शेतीतील पैसे सुमारे चौदा महिन्यांनी हाती यायचे.
काही वेळा दररोजच्या खर्चाला उसने पैसे घेण्याची वेळ यायची. आता रेशीम शेतीतून वर्षाला काही लाखांचे शाश्वत उत्पन्न मिळू लागले आहे. गावातच मार्गदर्शन व प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यामुळे रेशीम शेती सोपी झाली. अन्य शेतकऱ्यांचे अनुभवही उपयोगी ठरले. अनेक वर्षे उसाची शेती केल्याने रेशीमशेती करताना सुरुवातीला कसरत झाली. मात्र आता चांगली गोडी निर्माण झाली आहे.
नेटक्या व्यवस्थापनावर भर
रेशीम अळ्यांना अत्तर, तंबाखू, कीडनाशके यांचा गंध सहन होत नाही. त्यामुळे त्या कमकुवत होतात.त्यामुळे काटेकोर व्यवस्थापन केले जाते. मजुरांना कोणते व्यसन नाही याची काळजी घेतली जाते. शेजारील शेतातून कीडनाशक द्रावणाचे फवारे आपल्या शेतात येऊ नयेत यासाठी दोन्ही बाजूंनी ऊस घेऊन मधोमध तुती लागवड केली आहे.
रेशीम शेडला बाजूने नेट बांधले आहे. त्याला विशिष्ट उंची देऊन हवा खेळती ठेवली जाते. अळ्यांना पोषक वातावरण देण्यासाठी ठरावीक वेळेत नेट खुलेही केले जाते. शेडच्या लोखंडी खांबांच्या खालील भागात प्लेटची रचना केली असून त्यात ऑइल ठेवले आहे. त्याचबरोबर खांबांना ग्रीस लावले आहे.
त्यामुळे रेशीम अळ्यांचा किड्या-मुंग्यांपासून बचाव झाला आहे. रिस्क घेतल्याशिवाय बेनिफिट मिळत नाही, हा उद्योगातील मंत्र उराशी बाळगून हा लॉट घेतला आहे. त्यातून उत्पन्न मिळाले तर तो बोनसच असेल. उसाच्या तुलनेत रेशीमशेती कष्टाची व कसरतीची असली तरी फायद्याची आहे, असे माळी यांनी सांगितले.
शेतीत झाली प्रगती
धोंडिराम सांगतात, की रेशीम शेतीतून वर्षभर हाती पैसा खेळता राहतो आहे. मुलांचे शिक्षण, कौटुंबिक गरजा भागविणे शक्य झाले आहे. बँकेच्या कर्जाच्या हप्त्याची नियमित परतफेड सुरू आहे. पोकरा योजनेतून ट्रॅक्टरची खरेदी केली असून, त्यातून शेतीची मशागत सुलभ झाली आहे. तुतीचा पालाही ट्रॅक्टरच्या साह्याने शेडपर्यंत आणणे शक्य झाले आहे. धोंडिराम यांना पत्नी सुवर्णा यांची शेतीत समर्थ साथ मिळते.
वडील शरणाप्पा व आई गंगाबाई यांचे मार्गदर्शन मिळतो. दोन मुले मुरुड (ता. लातूर) येथे शिक्षण घेत आहेत. येत्या काळात रेशीमशेतीचा विस्तार करून प्रति बॅच दोनशे अंडीपुंजांचे उत्पादन घेण्यासोबत उत्पादन व उत्पन्नाचा टक्का वाढविण्याचे नियोजन असल्याचे धोंडिराम सांगतात.
धोंडिराम माळी ९७६७५९४७२७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.