Rose Farming : गुलाब शेतीने बहरले शेतकऱ्यांचे अर्थकारण

Floriculture : नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील मोहाडी, जानोरी भागांत गुलाब शेतीचे क्लस्टरच तयार झाले आहे. संघर्ष, संकटे, नुकसान झेलत इथल्या शेतकऱ्यांनी अभ्यास, तंत्रज्ञान वापर व व्यवस्थापनाच्या बळावर गुलाब शेतीत प्रगतीचे विविध रंग भरले आहेत.
Floriculture
Rose Farming Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : नाशिक शहरात पूर्वी तपोवन, वडाळा परिसरात फुलशेती प्रसिद्ध होती. याच प्रेरणेतून दिंडोरी तालुक्यातील जानोरी, मोहाडी येथील अभ्यासू शेतकऱ्यांनी फुलशेतीला प्रारंभ केला. साधारण ४५ वर्षांपूर्वीचा काळ. कै. पुंजा रामचंद्र गोवर्धने यांनी खुल्या पद्धतीने व्यावसायिक वाणाची खुल्या क्षेत्रात लागवड केली.

त्यानंतर कै. भीमराव दगू गोवर्धने फुलशेतीत आले. त्यांनी वाणबदलासोबत आधुनिक तंत्राचा वापर केला. सन २००७ मध्ये पोपट निवृत्ती काठे, त्यानंतर ज्ञानेश्‍वर काठे यांनी पॉलिहाउसमध्ये गुलाबाचा प्रयोग केला. परिसरातील द्राक्ष, भाजीपाला पिकांतील अल्पभूधारक हे स्थित्यंतर अभ्यासत होते.

जिरायती शेती, नैसर्गिक आपत्ती, त्या तुलनेत मिळणारे उत्पन्न यामुळे त्यांनाही गुलाबशेतीतून पीकबदल साधावासा वाटला. सुरुवातीला कष्ट वाट्याला आले. बँकांचे उंबरे झिजवून अर्थसाह्य मिळवले. कुशल मनुष्यबळ, दळणवळणाच्या सुविधा नव्हत्या. मात्र सूक्ष्म अभ्यास, तंत्रज्ञानाची जोड, काटेकोर व्यवस्थापन, बाजारपेठांचा अभ्यास यातून गुणवत्तापूर्ण उत्पादनात शेतकऱ्यांनी हातखंडा तयार केला.

अनेकांच्या जमिनी जिरायती तर कमी मूल्यांकनाच्या असल्याने पॉलिहाउससाठी कर्जपुरवठा होत नव्हता. मात्र आर्थिक शिस्तीतून कर्जाची परतफेड केल्याने अनेक शेतकऱ्यांनी बँकांचा विश्‍वास मिळवला. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आदींच्या योजनांचा लाभ मिळाला.\

Floriculture
Rose Farming : व्हॅलेंटाइन नंतर लग्नसराईचा हंगाम साधण्यासाठी गुलाब फूल उत्पादकांची लगबग

गुलाबाचे तयार झाले क्लस्टर

औद्योगिक क्षेत्रात ज्याप्रमाणे सर्वत्र कारखाने पाहण्यास मिळतात त्याप्रमाणे मोहाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर पॉलिहाउसेस दिसतात. मागील वीस वर्षांत जानोरी, मोहाडीसह, आंबे, शिवनई आदी गावांमध्ये खुल्या व संरक्षित पद्धतीने तीनशे एकरांच्या दरम्यान गुलाब शेती विस्तारली आहे.

वीस गुंठे ते सहा एकर असे प्रत्येकाचे सरासरी क्षेत्र आहे. नैसर्गिक आपत्तीत वादळ वाऱ्याने कागद फाटणे, पॉलिहाउस पडणे आदी समस्याही शेतकऱ्यांनी झेलल्या. कोरोनामुळे बाजारपेठ प्रभावित झाली; मात्र येथील जिद्दी शेतकऱ्यांनी संकटातूनही वाटचाल कायम ठेवली.

Floriculture
Polyhouse Rose Farming : हरितगृहातील गुलाब लागवड फायदेशीर होण्यासाठी...

मोहाडी परिसरातील गुलाबशेती (ठळक बाबी)

  • गुलाबशेतीतील मुख्य गावे व क्षेत्र- मोहाडी ११० एकर, जानोरी ५० एकर, शिवनई ८ एकर, आंबे १५ एकर.

  • १२५ हून अधिक कुटुंबे या शेतीत गुंतलेली. तरुणांची संख्या सर्वाधिक.

  • सुमारे एक हजार मजुरांना वर्षभर रोजगार

  • निविष्ठा, सिंचन साहित्य, वाहतूक, कोरूगेटेड बॉक्स व अन्य साहित्य विक्रीतून झाली रोजगारनिर्मिती.

  • अनेक फूल उत्पादकांकडे शीतकरण व्यवस्था. वाहतुकीसाठी स्वमालकीची वाहने.

  • छोटी- मोठी हॉटेल्स, मंगल कार्यालये, समारंभामध्ये सजावटीसाठी येथील आकर्षक, रंगीबेरंगी गुलाबांना मागणी. त्याच उद्देशाने लाल, सफेद, पिवळा, गुलाबी, केशरी वाणांची लागवड.

  • मुंबई, नागपूरसह दिल्ली, गुजरात, राजस्थान, पंजाब, कर्नाटक राज्यातील विविध भागांत फुलांना मिळाली बाजारपेठ.

  • गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, नवीन वर्ष, लग्नसराई आणि व्हॅलेंटाइन डे या वेळी मागणी अधिक.

  • वीस फुलांचा बंडल यानुसार विक्री. वर्षभर प्रति फूल एक ते कमाल १२ रुपयांपर्यंत दर. सरासरी दर ३.५ रु. बाजारात तेजी मंदी सुरू असते. पण काम वर्षभर सुरूच राहते.

व्हॅलेंटाइन डे मार्केट

व्हॅलेंटाइन डेसाठी फूल काढणीयोग्य होण्यासाठी जानेवारी मध्यापर्यंतचा कालावधी लागतो. जानेवारी अखेर टप्प्याटप्प्याने मागणीनुसार तोडणी व शीतकरण प्रक्रिया सुरू होते. पॉलिहाउसमधील गुलाबाला १० ते १५ दिवसांपर्यंत टिकवणक्षमता असल्याचे शेतकरी सांगतात. व्हॅलेंटाइन डेसाठी १० ते १५ रुपये प्रति फूल दर मिळतो.

सामाजिक, आर्थिक प्रगती

पूर्वी अनेकांच्या कोरडवाहू जमिनी होत्या. कोणी रोजंदारीने कामाला जायचे. बागायती क्षेत्र तुटपुंजे असल्याने उत्पन्न नावापुरते होते. गुलाब फुलशेतीने मात्र त्यांच्या आयुष्यात बदल घडवला. अनेक वेळा शेतकरी अडचणीत आले. कर्जबाजारी झाले. मात्र जिद्द सोडली नाही. त्यांनी जीवनात समृद्धी आणली. लहानशा घरांचे टुमदार बंगल्यात रूपांतर झाले. पूर्वी गरिबीमुळे शिकता आले नाही; मात्र मुलांना उच्च शिक्षण दिले. आता अभ्यासक, तज्ज्ञ मोहाडी परिसरातही अभ्यासाला येतात.

Floriculture
Rose Export : गुलाबाच्या ७५ लाख फुलांची निर्यात ; यंदाचे पुणे जिल्ह्यातील चित्र

घडले सन्मानही

येथील तरुणांनी पॉलिहाउस तंत्रज्ञान विषयात कृषी पदविका, पदवी मिळवली आहे. फुलशेती व बाजारपेठांतील मागणीनुसार ‘हायटेक’ तंत्रज्ञानाचा अभ्यास शेतकरी करतात. येथील अनेक शेतकरी उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत. त्यांच्या प्रगतीत कृषी, जलसंपदा विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र यांचाही मोठा वाटा आहे.

सिंचन स्रोत केले बळकट

मोहाडी, जानोरी परिसरात सिंचन सुविधा मर्यादित होत्या. सन २०१६ मध्ये दुष्काळामुळे बागायती क्षेत्र कमी झाले होते. अशावेळी टाक्या, शेततळ्यांची उभारणी झाली. वाघाड धरणातून पाण्याचे वितरण होत असल्याने हक्काचे पाणी मिळाल्याचा मोठा फायदा झाल्याचे शेतकरी सांगतात. विहिरी, कूपनलिका आहेतच. शिवाय पाण्याचा काटेकोर वापर होण्यासाठी सूक्ष्मसिंचन पद्धतीचा अवलंब होतो.

सुरुवातीच्या काळात संघर्ष वाट्याला आला. जमीन धारणा कमी होती. मात्र प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल सुरू ठेवली. गुलाब शेतीवर पूर्ण लक्ष केंद्रित करून त्यातून प्रगती साधल्याचे आज समाधान आहे.
- जालिंदर राणू गोवर्धने (मोहाडी), ९४२३५५७४६५
पूर्वीच्या काळी रोजंदारीवर काम केले. वाहतूक व्यवसाय केला, कृषिपंप दुरुस्त केले. त्याच वेळी व्यावसायिक दृष्टिकोनातून गुलाब शेती सुरू ठेवली. आज या शेतीतून इतरांना रोजगार देण्याची क्षमता तयार केली आहे.
- विजय बाळासाहेब मौले (मोहाडी), ९१५८०१४५३०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com