Team Agrowon
देशांतर्गत तसेच देशाबाहेरील बाजारात दर्जेदार गुलाब फुलांना चांगली मागणी असते. त्यासाठी हरितगृहातील गुलाब फुलशेती फायदेशीर ठरणार आहे.
व्हॅलेंटाइन डे, ख्रिसमस आदी सण तसेच लग्नसमारंभ यांचा विचार करून सप्टेंबर ते फेब्रुवारीदरम्यान बाजारात फुले विक्रीस येतील यादृष्टीने गुलाबाची लागवड करावी. कमीत कमी १० ते २० गुंठे क्षेत्रावरील लागवड फायदेशीर ठरते.
निर्यातीसाठी गुलाबाची उपलब्धता सप्टेंबरपासून असावी लागते यासाठी मे-जून महिन्यामध्ये लागवड करावी.
गादीवाफे बनविण्याआधी सर्व मातीचे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. वाफसा आल्यानंतर अपेक्षित मापांप्रमाणे गादी वाफे तयार करून त्यावर रोपांची लागवड करावी.
परदेशी बाजारपेठेसाठी हायब्रीड टी प्रकार - फर्स्ट रेड, पॅशन, अप्पर क्लास, बोर्डो (लाल), टॉपलोस, नोबलेस तर देशांतर्गत बाजारपेठेसाठी डबल डिलाइट, सुपर स्टार, फेअरी पोर्च, ओक्लाहोमा, लॅडोरा या जातींची निवड करावी.
लागवडीनंतर दरवर्षी प्रतिचौरस मीटर क्षेत्रासाठी शेणखत २ किलो अधिक निंबोळी पेंड २०० ग्रॅम याप्रमाणात द्यावे.
फांद्या वाकविणे (बेंडिंग), कळ्या खुडणे (डिंसबडिंग), शेंडा खुडणे (टॉपिंग) अशी कामे करावीत त्यामुळे फुलदांड्याची व फुलांची गुणवत्ता सुधारते.