Khoya Production : खवानिर्मितीतून मिळाली रांजणीला ओळख

रांजणी (ता. जि. नगर) या दुष्काळी पट्ट्यातील गावाने दूध व्यवसाय व खवानिर्मितीतून (Khoya Producto) आपली ओळख निर्माण केली आहे. येथील सुमारे दोनशे कुटुंबे ही या व्यवसायात असून, दररोज अडीचशे ते तीनशे किलो खवा तयार केला जातो.
Milk Product
Milk ProductAgrowon
Published on
Updated on

नगर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील काही अपवाद वगळता बहुतांश गावे दुष्काळी आहेत. डोंगरी म्हणून ओळख असलेल्या आगडगाव, रतडगाव, माथणी, देवगाव यातील रांजणी हे एक दुष्काळी गाव. पारंपरिकरीत्या ज्वारी (Jowar), बाजरी, हरभरा अशी कोरडवाहू पिके घेणारे हे गाव जलसंधारणाची कामे झाल्यामुळे अलीकडे सोयाबीन (Soybean), कांदा, गहू, चारापिके, फळबागांकडे वळले आहे. दूध व्यवसाय, त्यातही खवानिर्मितीतून या गावाचा नावलौकिक झाला आहे.

Milk Product
PDKV Crop Verity : ‘पंदेकृवि’च्या तीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

दोन हजार लोकसंख्या, साधारणपणे तीनशे कुटुंबापैकी सुमारे दोनशे कुटुंबे दूध व्यवसाय आणि खवानिर्मितीवर अवलंबून आहेत. दर्जेदार खव्यासाठी रांजणीची सर्वदूर ओळख निर्माण झाली आहे.

Milk Product
Khoya Production : खवा, पेढे निर्मितीत कमावले नाव

आता तिसरी पिढी सक्रिय

- चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या रांजणीत शेती हलक्या प्रतीची, पाण्याचा तुटवडा यामुळे पावसावरच अवलंबून आहे. पारंपरिक कोरडवाहू अन्नधान्य पिकाला जोड म्हणून साधारण सत्तर- ऐंशी वर्षांपूर्वी येथील शेतकऱ्यांनी पशुपालनाला सुरुवात केली. वाढत्या दूध उत्पादनातून खवा निर्मितीही सुरू केली.

आज त्यांची तिसरी पिढी या व्यवसायात कार्यरत असल्याचे दिसते. त्याविषयी माहिती देताना ईश्‍वर जरे म्हणाले, ‘‘शेतीला पूरक म्हणून गावात दूध व्यवसाय सुरू झाल्यानंतर एक व्यापारी आमच्या गावातून दूध संकलन करू लागला. या संकलनामध्ये माझे आजोबा म्हतारदेव जरे मदत करत. काही वर्षांनंतर शेतकरी स्वतःच खवा तयार करू लागले. त्यात टप्प्याने वाढ होत गेली. दररोज गावांत अडीचशे ते साडेतीनशे किलोपर्यंत खवा तयार केला जातो.’’

Milk Product
Khoya Production : खवा व्यवसायाला धोरणात्मक उभारीची गरज

आता या रांजणीच्या खव्याने ग्राहकांमध्ये विश्‍वास निर्माण केला आहे. गावांतील संतोष चेमटे हे तरुण दररोज खव्याचे रांजणीतून संकलन करून नगर व अन्य ठिकाणी विक्री करतात.कृषी विभागामार्फत या छोट्या प्रक्रिया उद्योजकांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेतून आधुनिक खवानिर्मिती यंत्रे देण्यासंदर्भात प्रयत्नही सुरू असल्याची माहिती कृषी सहायक शेखर काळे यांनी दिली.

व्यवसायाचे गणित असे

कोणत्याही दूध व्यावसायिकाप्रमाणेच ही कुटुंबे सकाळी पाच वाजता गोठ्याची स्वच्छता व दूध काढणी अशी कामे करतात.

- कुटुंबाकडे पाच ते वीसपर्यंत जनावरे आहेत. वीस ते शंभर लिटरपर्यंत दूध उत्पादन होते. बहुतेकांकडे खवा तयार करण्याची भट्टी आहे. दूध काढल्यानंतर सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेळा खवा तयार केला जातो.

Milk Product
Farmer Incentive Scheme : पहिल्या यादीतील २८८ जणांचे आधार प्रमाणीकरण अजूनही बाकी

- गाईंच्या पाच लिटर, तर म्हशीच्या साडेतीन लिटर दुधापासून एक किलो खवा तयार होतो. खव्याला १८० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत दर मिळतो. पूर्वी एक किलो खवानिर्मितीसाठी १६० रुपयांपर्यंत खर्च येई. मात्र आता पशुखाद्याचे वाढते दर, चाऱ्याचा प्रश्‍न इ. मुळे हा खर्च १९० ते २०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

- सध्या गाईच्या दुधाला ३५ रुपयांपर्यंत दर मिळतो तर खव्याला २४० रुपये किलोपर्यंत दर मिळतो. गणेश उत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी, लग्नसराई अशा सणासुदीमध्ये खव्याला मागणी असते. थेट दूध विक्रीपेक्षा खवानिर्मिती आणि विक्रीमुळे प्रति लिटरमागे पाच ते दहा रुपये अधिक मिळतात. शिवाय लोकांच्या विश्वासातून तीन दिवसाला रक्कम मिळते.

- दुधाच्या तुलनेमध्ये नुकसानीचा धोका अत्यंत कमी आहे. अधिक खवा आवश्यक असेल तर अनेक ग्राहक थेट शेतकऱ्यांकडूनच खवा खरेदी करतात. हा विश्‍वास रांजणी गावाने निर्माण केला असून, तोच कायम जपण्याचे आमचे ध्येय असल्याचे सविता चव्हाण व भरत चव्हाण सांगतात.

- दूरवरच्या गावातील नातेवाइकांपर्यंत येथूनच खवा जातो. अगदी येथे पाहुणचारही खवा देऊन केला जातो.

शेणखताचे उपलब्धता

रांजणीत प्रत्येक कुटुंबाकडे आठ-दहा जनावरे नक्कीच आहेत. प्रत्येकाकडे वार्षिक वीस ते तीस टनांपर्यंत शेणखत उत्पादन होते. संपूर्ण गावांत चार हजार टनापेक्षा अधिक शेणखत उपलब्ध होते. बहुतांश शेणखताचा स्वतः शेतीत वापर केल्यानंतर उर्वरित शेणखताच्या विक्रीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नही मिळते. येथील हलक्या जमिनींचा पोत भरपूर शेणखताच्या वापरामुळे सुधारत चालला आहे. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च बऱ्यापैकी वाचत असल्याचे शेतकरी सांगतात.

तोटा तर होत नाही...

‘‘शेतीमध्ये समस्या काही कमी नाहीत. त्यात दुष्काळी पट्ट्यामध्ये तर अडचणींना सुमारच नाही. वाढत्या नुकसानीचा ताण सहन न झाल्याने टोकाचा निर्णय घेणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आमच्या गावकऱ्यांचे उत्तम उदाहरण ठरू शकते’’, असे रामदास जाधव या तरुण शेतकऱ्याने सांगितले.

Milk Product
Agri Tourism : विषमुक्त शेतीतून कृषी पर्यटनाला आधार

साईनाथ बांदल म्हणाले, ‘‘दुधाचे दर सातत्याने कमी जास्त होतात. त्याचा परिणाम खव्याच्या दरावरही होतो. मात्र नफा झाला नाही, तरी तोटा नक्कीच होत नाही. कोरोनाच्या काळात अनेक शेतकऱ्यांना दूध फेकून द्यावे लागले. त्या वेळी खव्याचा दर अगदी शंभर रुपयांवर आला होता. किमान जनावरे तर जगवता आली. व्यवसाय टिकवण्यात आमचे गाव यशस्वी झाले. दूध व्यवसाय, खवा निर्मितीने जगण्याला बळ आणि गावाला नाव दिल्याचा अभिमान आहे.’’

‘‘दुष्काळी स्थितीतही तीन पिढ्यांपासून दूध व्यवसाय, खवानिर्मितीतून रांजणी गावाने सर्वदूर ओळख मिळवली आहे. दर्जेदारपणातून ग्राहकांमध्ये विश्‍वास निर्माण केला आहे.’’

बाबासाहेब चेमटे, (माजी सरपंच), ८७८८५४७००१

जनावरांची काळजी घेण्यापासून दूध उत्पादन आणि पुढे खवानिर्मितीमध्ये आमच्या घरातील महिलांसह प्रत्येक सदस्य आपली जबाबदारी उचलतो. कोरोनाच्या अडचणीमध्येही आम्ही हा व्यवसाय जपला. नुसत्या दुधाच्या तुलनेमध्ये हा व्यवसाय अधिक शाश्‍वत ठरतो.

ईश्‍वर जरे, (दूध व खवा उत्पादक), ९४०५४०२००३

नगर हे जिल्‍ह्याचे ठिकाण गावापासून दूर आहे. प्रत्येकाने तिथपर्यंत जाऊन विक्री करण्यात सर्वांचाच वेळ आणि कष्ट वाया जाऊ नयेत, या उद्देशाने मी गावांतून दररोज खव्याचे संकलन करून नगरमध्ये मागणीनुसार विक्री करतो. आमच्या दोघांसाठीही ही फायद्याची बाब ठरत आहे.

- संतोष चेमटे (खवा विक्रेते), ९४०५४०१९९८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com