Poultry Farming : हायजेनिक ‘चिकन शॉपी’, थेट ग्राहक विक्री

Poultry Business : स्वतःची ‘चिकन शॉपी’, ॲप, प्रभावी विपणन व वितरण व्यवस्था तयार करून थेट ग्राहकांची सशक्त बाजारपेठ तयार करून विक्रीचा प्रश्‍न त्यांनी सोडवला आहे.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon
Published on
Updated on

Poultry Industry : नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात घारापूर गाव आहे. येथील सदानंद ढगे यांची सुमारे २० एकर शेती आहे. सन २००५ मध्ये परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून त्यांनी एमएस्सीची पदवी प्राप्त केली. शेती व त्याला पूरक व्यवसाय हेच त्यांचे पुढील उद्दिष्ट होते. त्यादृष्टीने शेती विकसित करण्याबरोबर २०१९ मध्ये त्यांनी पाचशे ब्रॉयलर पक्ष्यांच्या बॅचपासून पोल्ट्री व्यवसायाला सुरुवात केली.

टप्प्याटप्प्याने वाढ करूनही क्षमता पाच हजार पक्ष्यांपर्यंत नेली. हिमायतनगरचे तत्कालीन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय मादळे यांचे मार्गदर्शन मिळाले. व्यवसाय सुरळीत होत असतानाच कोरोनाचे संकट आले. यात कोंबड्याचे खाद्य, चिकन यांच्याविषयी अफवा पसरू लागल्या. त्यामुळे दोन बॅचेसमध्ये मोठ्या प्रमाणात खूप नुकसान झाले.

व्यवसाय आला आकाराला

नुकसानीतून खचून न जाता ढगे यांनी संयमाने व हिमतीने मार्ग काढण्याचे ठरवले. उत्पादनासोबत विक्रीचे कौशल्य आत्मसात करून आपले स्वतःचे ग्राहक तयार करायचे त्यांनी ठरवले. त्यातून मध्यस्थांना टाळून नफा वाढणार होता. झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्याची संधी होती. दोन भावांची मदतीने त्यादृष्टीने ‘मार्केटिंग’ची दिशा पक्की केली. एकूणच मार्गदर्शन घेण्यासाठी परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क केला.

Poultry Farming
Poultry Farming : ‘पोल्ट्री’ला हवा मदतीचा हात

सोबतच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू), नागपूर अंतर्गत २०२० मध्ये कुक्कुटपालन- रोजगाराच्या संधी ही चारदिवसीय ऑनलाइन कार्यशाळा पूर्ण केली. आज २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या काळात ढगे यांनी आपल्या पोल्ट्रीचा चांगला विस्तार केला आहे. सध्या प्रत्येकी दोन हजार पक्ष्यांचे एक अशी पाच शेड्‌स असून, एकूण दहा हजार पक्ष्यांचे संगोपन केले जात आहे.

वर्षाला चक्राकार पद्धतीने सुमारे सहा बॅचेस घेतल्या जातात. पक्षी उत्पादनात प्रतिजैविकांचा शक्य तितका कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. ढगे यांचे धाकटे बंधू सुनीलकुमार ढगे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. त्यांच्या सल्ल्याने रसायनमुक्त व आयुर्वेदिक घटकांचे खाद्य देण्यात येते.

थेट विक्री व्यवस्था

ग्राहकांना थेट विक्री करायची तर चिकनची गुणवत्ता उत्कृष्ट हवी हे जाणून त्या दृष्टीने डॉ. रूपेश वाघमारे यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत विकेल ते पिकेल या योजनेचेही विक्री व्यवस्था बळकट करण्यासाठी पाठबळ मिळाले. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनीही ढगे यांच्या पोल्ट्रीला भेट देत चिकन शॉपी सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले.

पशुसंवर्धन विभाग अधिकारी, पशुसंवर्धन विद्यापीठ यांच्या सहकार्यातून एक जुलै, २०२१ रोजी कै. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी थेट विक्रीचा उपक्रम सुरू करण्यात आला. ‘एसडी चिकन शॉपी’ असे विक्री केंद्राचे नामकरण केले आहे. ढगे सांगतात, की दररोज सरासरी १००, १५० पासून ते २०० पर्यंत ग्राहकांकडून चिकनची खरेदी होते. तर फोनवरून अनेक ग्राहक देखील घरपोच सेवेची मागणी करतात. त्यासाठी शॉपीच्या फलकावर संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

योग्य व सुरक्षित पॅकिंगमधून त्यांना वेळेवर पोहोच दिली जाते. शॉपीमध्ये चिकन व्यतिरिक्त अंडी, विविध प्रकारचा मसाला, ताजा भाजीपाला, आदींचीही विक्री होते. प्रति जिवंत पक्षी ७०, ८० रुपयांपासून ते कमाल १४० रुपयांपर्यंत दर मिळतो. प्रति किलो सरासरी दहा रुपयांपर्यंत नफा मिळतो. अर्थात, अनेक वेळा तो कमीही होतो. शॉपीच्या माध्यमातून तीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे.

Poultry Farming
Poultry Farming : दोन हजारांच्या गुंतवणुकीतून कोट्यवधीची उड्डाणे

दर्जा व सेवेत उत्तम

ग्राहकांच्या रोजच्या संपर्कासाठी ‘ॲग्रीकॉस एसडी चिकन’ नावाचे ॲप विकसित केले आहे. त्याआधारे ग्राहकांना ‘ऑर्डर’ देणे शक्य होते. उत्पादनाचा दर्जा टिकविण्याने नेहमीचे ग्राहक तयार झाले आहेत. त्यामुळे विक्रीत आता फारशा अडचणी येत नाही. दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढत असल्याने ढगे समाधानी आहेत.

विक्रीपश्‍चात काही अडचणी आल्यास त्यांची तत्परतेने सोडवणूक केली जाते. ग्राहकांचे ‘फीडबॅक’ व मागणी लक्षात घेऊन तशा सुधारणा केल्या जातात. व्यवसायामध्ये घरच्या सर्व सदस्यांची मदत होते. पोल्ट्री व्यवसायातील कार्याची दखल घेत ‘माफसू’तर्फे २०२२ मध्ये राष्ट्रीय शेतकरी दिनादिवशी ढगे यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला आहे.

व्यवसायाच्या पुढील कक्षा

पुढील टप्पा म्हणून सुमारे १६ हजार पक्षी क्षमतेचे ३५० बाय ४० फूट आकाराचे वातावरण नियंत्रित (ईसी) पोल्ट्री युनिट उभारण्याचे काम जवळपास पूर्णत्वास गेले आहे. त्यासाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये भारतीय कंपनीसोबत कंत्राटी पद्धतीने कामकाज केले जाणार आहे.

या इसी युनिटमध्ये दक्षिण बाजूला पडदे व जाळी यांच्याऐवजी भिंतीची रचना करून वातावरण नियंत्रणाचा वेगळा प्रयोग ढगे यांनी केला आहे. सदानंद यांचे बंधू श्यामसुंदर देखील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कृषी पदवीधर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली ॲग्रीकॉस शेतकरी उत्पादन कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

सदानंद ढगे ८६६८२२१९५७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com