
Poultry Health and Food Management :
शेतकरी नियोजन
शेतकरी : अंकुश वाघ
गाव : कहांडळवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक
एकूण पक्षिगृह : २
संगोपनगृह क्षमता : ११ हजार
सिन्नरच्या पूर्व भागात पाणीटंचाई असल्याने शेतीला पूरक व्यवसाय म्हणून वाघ परिवाराने गेल्या आठ वर्षांपासून लेअर कुक्कुटपालन व्यवसायास सुरुवात केली. त्याला दुग्ध व्यवसायाची जोड दिली आहे. वाघ कुटुंबातील नव्या पिढीतील अंकुश वाघ हे शास्त्रीयदृष्ट्या कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत.
व्यवसायाच्या सुरुवातीस अंडी उत्पादन व पक्ष्यांचे संगोपन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्या. या अडचणींवर मात करण्यासाठी अंकुश यांनी प्रयोगशील कुक्कुटपालकांच्या पक्षिगृहांना भेटी देऊन शास्त्रशुद्ध व्यवस्थापनाविषयी माहिती घेतली. आपल्या कुक्कुटपालन शेडमध्ये येणाऱ्या समस्यांवर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन कामात सुधारणा केल्या. त्यातून कामकाजात सुधारणा होत गेली. सुरुवातीला ४ हजार पक्ष्यांपासून सुरू केलेला व्यवसाय आज सुमारे ११ हजार पक्षी क्षमतेपर्यंत पोचला आहे. कुक्कुटपक्ष्यांच्या संगोपनासाठी दोन पक्षिगृहे उभारली आहेत.
जैवसुरक्षेला प्राधान्य
प्रत्येक नवीन बॅच सुरू करण्यापूर्वी संपूर्ण पक्षिगृहाची स्वच्छता केली जाते. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निर्जंतुकीकरणावर भर दिला जातो. संगोपनासाठी १०५ दिवस वयाचे पक्षी आणले जातात. पक्षिगृहात पक्षी आणल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात दोन प्रतिबंधात्मक लसी दिल्या जातात.
खाद्य नियोजन
थंडीच्या दिवसांत किमान तापमान कमी होते. या दरम्यान कोंबड्यांच्या शरीरचनेत बदल होत असतो. त्याचा परिणाम अंडी उत्पादनावर दिसून येतो. हिवाळ्यात पक्ष्यांच्या शरीरात ऊर्जा टिकून ठेवणे गरजेचे असते. यासाठी विशेष काळजी घेतली जाते. निरोगी व अधिक अंडी उत्पादनासाठी शास्त्रीय पद्धतीनेच कामकाज केले जाते. - अंडी उत्पादन वाढीसाठी कॅल्शिअम प्रमाण संतुलित ठेवले जाते.
खाद्यामध्ये सोया, मका यांचा वापर करून शिफारशीनुसार औषधांचे मिश्रण व तांदूळ कणीचा समावेश केला जातो.
पक्ष्यांमध्ये ऊर्जा टिकून टिकवून ठेवण्यासाठी प्रति पक्षी ११५ ग्रॅम प्रमाणे खाद्य दिले जाते.
संगोपनगृहात खाद्य वितरणासाठी सेमी स्वयंचलित खाद्य वितरण व्यवस्था कार्यान्वित केलेली आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळात वेळेत कामकाज करणे शक्य होते.
खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी खाद्य निर्मिती स्वतः करतात. त्यासाठी स्वतंत्र युनिट उभारले आहे. त्यात प्रतिदिन सुमारे ११ क्विंटल खाद्य निर्मिती केली जाते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यासह कुक्कुटखाद्यात स्वयंपूर्णता आली आहे.
गरजेनुसार खाद्य निर्मितीसाठी मका, सोया पेंड खरेदी केली जातो.
अंडी उत्पादन
वाघ यांचे एकत्रित कुटुंब आहे. स्वतः अंकुश यांना भाऊ प्रकाश, चुलत भाऊ स्वप्निल व वैभव हे तिघे कुक्कुटपालनातील कामांमध्ये मदत करतात. दैनंदिन कामांमध्ये प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
सुमारे ११ हजार पक्ष्यांच्या संगोपनातून दररोज सरासरी १० हजार ५०० इतके अंडी उत्पादन मिळते. अंडी संकलित केल्यानंतर ट्रे मध्ये भरून ठेवली जातात.बाजारात व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार अंडी पुरवठा केला जातो. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा करताना दर निश्चित केले जातात.
थंडीच्या काळातील व्यवस्थापन
वाढत्या थंडीच्या दिवसात पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी शेड बंदिस्त ठेवले जाते. बाहेरील बाजूने शेडनेटचा वापर केला जातो. थंड वारे शेडमध्ये प्रवेश करू नयेत यासाठी विशेष काळजी घेतली जाते.
थंडीच्या दिवसात अंडी उत्पादनामध्ये घट दिसून येते. त्यासाठी व्यवस्थापनात फेरबदल करून अंडी उत्पादनामध्ये सातत्य ठेवण्यासाठी दिवसातून किमान तीन वेळा पक्षिगृहात निरीक्षणे नोंदविले जाते. त्यानुसार व्यवस्थापनात आवश्यक ते बदल केले जातात.
महिन्यातून एकदा लासोटा लसीकरण केले जाते. विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरणावर भर दिला जातो.
पक्षिगृहातील वातावरण उष्ण राखण्यासाठी कृत्रिम पद्धतीने उष्णता निर्माण केली जाते. थंडीच्या दिवसात दिवस लवकर मावळत असल्याने पक्ष्यांना उष्णता देण्यासाठी बल्ब लावले जातात. सूर्यप्रकाशाचा जसा परिणाम अंडी उत्पादनावर होतो, तसाच कृत्रिम प्रकाशाचाही होतो. म्हणून रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाश पुरविल्यास अंडी उत्पादन चांगले होते, असे अंकुश वाघ सांगतात.
पक्ष्यांना पिण्यासाठी कोमट पाणी दिले जाते. त्यासाठी पाण्याच्या टाकीमध्ये सकाळच्या वेळी गरम पाणी मिसळले जाते. त्यामुळे संगोपनगृहात दिले जाणारे पाणी कोमट होण्यास मदत होते. पक्ष्यांना स्वच्छ, निर्जंतुक आणि चांगले पाणी पुरविण्यावर भर दिला जातो.
अंकुश वाघ, ९६८९१२२६३६
(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.