Broiler Poultry Industry : यवतमाळ स्थित देवेंद्र भोयर विदर्भातील यशस्वी ब्रॉयलर पोल्ट्री उद्योजक म्हणून नावारूपालाआले आहेत. पार्डी (जि. यवतमाळ) हे त्यांचे मूळ गाव. वडील जिल्हा परिषदेत अधिक्षकपदी असल्याने हे कुटुंब यवतमाळला स्थायिक झाले. बी.कॉम, बीपीएड पर्यंत शिक्षण झाल्यानंतर स्थानिकबॅंकेत देवेंद्र यांना नोकरी चालून आली.
परंतु शेतीपूरक उद्योग सुरू करावा असे त्यांच्या मनात होते.त्यामुळे ‘ऑफर’ स्वीकारण्याऐवजी एक लाख रुपये कर्ज दया असा प्रस्ताव त्यांनी ठेवला. हे प्रकरण मंजूर होण्यास वेळ लागेल अशी कल्पना आल्यानंतर स्वतःकडील पैशांच्या बळावर सुरु होऊ शकणाऱ्या व्यवसायाचा शोध सुरु केला. अभ्यास व सर्वेक्षणातून पोल्ट्री उद्योग सार्थ वाटला.
अवघ्या दोनहजारांपासून सुरवात
सन १९९५ चा काळ. खिशात अवघे दोन हजार रुपये होते असे देवेंद्र सांगतात. त्यातून शंभर पक्षांची खरेदी झाली. घराच्या मागील बाजूस तात्पुरते शेड उभारले. काही व्यावसायिकांनी देवेंद्र यांचा उत्साह पाहता पोल्ट्री फिडसाठी उसनवारीवर पैसे देण्याची तयारी केली. पहिल्या बॅचच्या विक्रीनंतर पैसे परत करावे असा व्यवहार होता.
सुरवातीला छ. संभाजी नगर परिसरातील कंपनीकडून १७०० पक्षी घेतले. काही तांत्रिक कारणांमुळे ते दगावले. त्यामुळे उत्साह मावळला. हा उद्योग सोडून गोपालनाकडे वळावे असा विचारही डोक्यात आला. परंतु एका अपयशाने खचून न जाता निर्धाराने पुढे जाण्याचा निर्णय देवेंद्र यांनी घेतला.
उद्योगात बस्तान बसविण्यास सुरवात
छोटेखानी उद्योगात विस्तार अपेक्षित होता. त्यासाठी जागा किंवा शेताची गरज होती. परंतु इच्छा तिथे मार्ग असतोच ! त्या युक्तीनुसार दूधवाल्याचे शेत कराराने घेत घरातील पक्षी तेथील शेडमध्ये स्थलांतरित केले. सुमारे दोन वर्ष हा नित्यक्रम सुरु राहिला.
दरम्यान तरोडा येथे तीन एकर शेत विक्रीसाठी असल्याचे कळाले. स्वमालकीच्या जागेत उद्योगाचे चांगले बस्तान बसवता येईल असे वाटले. मित्राकडून वीस हजार रुपये उसनवारीवर घेतले. उर्वरित रक्कम टप्याटप्याने दिले तरी चालतील असा प्रस्ताव शेतमालकाने ठेवला होता. त्यास होकार देत ही जागाही खरेदी केली. तेथे दोन हजार पक्षांचे संगोपन सुरू झाले.
उद्योगाचा मोठा विस्तार
धाडस, सातत्य, चिकाटी व अभ्यासपूर्ण व्यवस्थापनातून उद्योगात जम बसला. पक्षाचे वजन व गुणवत्ता चांगली मिळू लागली. व्यापाऱ्यांकडून मागणी वाढली. मग येणाऱ्या नफ्यातूनच तरोडा शिवारातच पुन्हा तीन एकर शेती खरेदी केली. तेथे ३२ हजार, पुढील टप्प्यात ६४ हजार पक्षी व तिसऱ्या टप्प्यात माधनी (यवतमाळ) येथे सात एकर शेताची खरेदी करून ६० हजार पक्षांचे संगोपन सुरू केले.
म्हणता म्हणता उद्योगातील अनुभवाला आज पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. आजमितीला यवतमाळपासून ७० किलोमीटर परिघात देवेंद्र यांची ठिकठिकाणी (यवतमाळ व अमरावती हद्दीत) सुमारे ४५ पक्षी संगोपन शेडस आहेत. पश्चिम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हरियाना, दिल्ली आदी ठिकाणच्या व्यापाऱ्यांचे ‘नेटवर्क’ तयार झाले आहे.
त्यांना पक्षांचा पुरवठा जागेवरच होतो. प्रति किलो ५० पासून १०० रुपयांपर्यंत दर मिळतो. अवघ्या दोन हजारांच्या गुंतवणुकीपासून सुरू झालेल्या या उद्योगाची उलाढाल आज कोट्यवधींच्या घरात पोचली आहे. पत्नी सारिका व मुले साकेत व दिव्यांशू असा देवेंद्र यांचा परिवार आहेत
देवेंद्र यांच्या उद्योगातील ठळक बाबी
सुमारे ४५ शेडसपैकी बहुतांश वातावरण नियंत्रित ( ईसी). यात सेन्सर्स बसविले आहेत. स्वयंचलित खाद्य- पाणी यंत्रणा. एकूण मिळून सहा लाखांवर पक्षी संगोपन क्षमता. पक्षी विक्रीयोग्य होण्यापर्यंतचा कालावधी सुमारे ४२ दिवसांचा. त्यावेळचे वजन सव्वा ते अडीच किलोपर्यंत. वर्षाला सुमारे पाच बॅचेस.
हॅचरी
ब्रॉयलर कुक्कुटपालनात एक दिवसाच्या पक्षांची खरेदी करून त्यांचे संगोपन करावे लागते. मात्र या पक्षाच्या दरात सातत्याने चढउतार होतात. परिणामी नफ्याचे मार्जिन कमी होते, ही बाब लक्षात घेऊन सुलतानपूर (ता. नांदगाव खंडेश्वर) या मामाच्या गावी शेत घेऊन तेथे स्वतःचाच पक्षी ब्रीडर फार्म आणि हॅचरी उभारली आहे. हॅचरीची क्षमता आठवड्याला ६० हजार पक्षी अशी आहे. गरजेनुसार सुमारे ४० हजारांपर्यंत उत्पादन घेण्यात येते.
‘फीडमील’ ची ‘हायटेक’ यंत्रणा
‘पोल्ट्री फीड’चे दर सातत्याने कमी- जास्त होतात. त्याचा उत्पादन खर्चावर परिणाम होतो. मजूरटंचाईचाही मोठा प्रश्न आहे. त्यादृष्टीने दोन फीड मिल्स उभारल्या आहेत. दीड कोटी रुपये खर्चून संगणकीकृत ‘हायटेक फीड प्लांट आहे. तासाला पाच टन पॅलेट फीड अशी क्षमता आहे. या यंत्रणेतून खाद्य थेट फीड लोडर’ मध्ये येते. ‘लोडिंग’ साठी केवळ एका मजुराची गरज भासते. मनुष्यबळावरील खर्च वाचतो. ४२ दिवसांत पक्षाचे अडीच ते तीन किलो पर्यंत वजन मिळेल असा खाद्य ‘फॉर्म्युला’ तयार केला आहे.
कुशल व्यवस्थापन
वाजवी पशुखाद्यात पक्षांचे अधिक वजन मिळवण्याच्या दृष्टीने आपल्या कामगारांना व्यवस्थापन कार्यात कुशल केले आहे. शेडमधील विजेसंबंधीची पॅनेल्स हे कामगारच तयार करतात. ग्रामीण भागात विजेची मोठी समस्या असल्याने पर्याय म्हणून दोन जनरेटर्स तसेच पोल्ट्री शेडच्या वरील बाजूस सौर पॅनेल बसविले आहे. त्यातून विजेवरील खर्चातही बचत होणार आहे. उद्योगातून गावस्तरावरील १२५ व्यक्तींना रोजगार मिळाला आहे.
देवेंद्र भोयर ९४२२१६५१९८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.