Fig Farming : दुष्काळात अंजिराची गोड साथ

Article by Manik Rasve : परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर (ता. परभणी) येथील माणिकराव आणि अशोक या खिल्लारे पिता-पुत्रांनी प्रयोगशील वृत्ती जपली आहे. सुमारे सव्वादोन एकरांत त्यांनी अंजीर लागवडीचा प्रयोग करून तो सिंचन व अन्य व्यवस्थापनातून यशस्वी केला आहे.
Manikrao and Ashok Khillare
Manikrao and Ashok KhillareAgrowon

Fig Farming Management : परभणी शहरापासून १५ किलोमीटरवरील सिंगणापूरची भाजीपाला उत्पादक गाव अशी ओळख आहे. येथील शेतकरी केळी, लिंबू, पपई, आवळा आदींसह ऊसही घेतात. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर गावातील शेतकऱ्यांची मदार असते.

मात्र पाणीसाठा कमी झाल्यास अडचणी भासतात. काहींनी शेततळ्यांच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाची व्यवस्था केली आहे. कमी पाण्यात येणाऱ्या फळपिकांकडेही त्यांचा कल असून ठिबक, तुषार आदींचाही ते वापर करतात.

अंजीर पिकाचा शोधला पर्याय

गावातील माणिकराव खिल्लारे यांची १० एकर हलकी ते मध्यम प्रकारची जमीन आहे. दोन विहिरी आहेत. सुमारे पाच एकरांत ऊस, भाजीपाला व केसर आंब्याची काही झाडे आहेत. माणिकराव प्रयत्नवादी व प्रयोगशील वृत्तीचे आहेत. त्यांचा मुलगा अशोक यांनी बी.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली आहे. तेही वडिलांसोबत पूर्णवेळ शेती करतात. पूर्वी खात्रीशीर पाऊस पडायचा.

त्या वेळी मुबलक पाणी उपलब्ध राहायचे. त्यामुळे ऊस, भाजीपाला या पिकांवर भर असे. परंतु अलीकडील वर्षात पावसाचे असमान वितरण होत आहे. शिवाय सिंचनस्रोतांना पाणी उपलब्ध राहत नाही. उसाचे एकरी ४० टनांच्या दरम्यान मर्यादित उत्पादन, भाजीपाल्यांचे नीचांकी घसरणारे दर या समस्या आहेत. त्यामुळे कमी पाण्यात येणाऱ्या व चांगले दर देण्याची क्षमता असलेल्या पिकाच्या शोधात खिल्लारे होते. त्यातून अंजिराचा पर्याय योग्य वाटला. गावातील काही शेतकऱ्यांनी त्याची शेती यशस्वी केल्याची उदाहरणेही समोर होती.

Manikrao and Ashok Khillare
Fig-Sitafal Research Centre : जाधववाडीचे अंजीर-सीताफळ संशोधन केंद्र होतेय लोकाभिमुख

अंजीर शेतीचे नियोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून अंजिराच्या दिनकर वाणाची रोपे आणून २०१७ मध्ये सव्वा एकरांत १५ बाय १२ फूट अंतरावर लागवड केली. अभ्यासपूर्ण व्यवस्थापनातून हा प्रयोग यशस्वी झाला. मग २०१९ मध्ये एक एकर क्षेत्र वाढवले. सध्या एकूण सव्वा दोन एकरांत अंजीर लागवड आहे.

ऑगस्टच्या दुसऱ्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात छाटणी केली जाते. त्यानंतर शेणखत एकरी पाच ट्रॉली याप्रमाणे वापर केला जातो. फळ हंगाम डिसेंबर ते मे-जूनपर्यंत असतो. जानेवारी ते मार्चपर्यंतच्या कालावधीत अधिक उत्पादन मिळते. पाण्याच्या उपलब्धतेनुसार जूनपर्यंत उत्पादनाचे नियोजन केले जाते. कुटुंबातील सर्व सदस्य मजुरांच्या मदतीने फळतोडणी करतात. त्यानंतर प्रतवारी व क्रेटमध्ये कागद व अंजिराची पाने पसरून फळे भरली जातात.

विक्री व्यवस्था केली विकसित

सध्या एकरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळत आहे. माणिकराव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ दररोज सकाळी बसून अंजिरांची थेट ग्राहक विक्री करतात. अर्थात, विक्री- मार्केटिंगची मुख्य जबाबदारी अशोक यांच्याकडे आहे. त्यांनी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व अन्य ग्राहकांचे व्हॉट्‍सॲप ग्रुप तयार केले आहेत.

अंजीर टप्प्याटप्प्याने विक्री व काढणीयोग्य होते. त्यानुसार ग्रुपपद्वारे ‘मेसेज’ देण्यात येतो. त्यानुसार ‘ऑर्डर’ घेऊन अशोक ग्राहकांना अंजिरे घरपोच देण्याची व्यवस्था करतात. रासायनिक २० टक्के व सेंद्रिय ८० टक्के अशी शेती असल्याने गोड, दर्जेदार ग्राहकांकडून मागणी भरपूर असते. जागेवर प्रति किलो १०० रुपये, तर घरपोच १२० रुपये असे त्याचे दर आहेत.

Manikrao and Ashok Khillare
Fig Processing : पौष्टिक अंजिरापासून जाम, जेली, टॉफी

दुष्काळात जगविली फळबाग

सिंगणापूर भागात अलीकडे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. जायकवाडी धरण भरत नाही. अशा परिस्थितीत फळबागांपासून उत्पादन घेण्यापेक्षा त्या जिवंत ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरते. सन २०१९ मध्ये अंजिराची झाडे लहान असताना पाणी कमी पडले.

एप्रिल व मे महिन्यांत प्रति टँकर चार हजार रुपये यानुसार आठ टँकर पाणी विकत घेतले. त्यातून फळबाग जिवंत ठेवली. या वर्षीही पाणीटंचाई आहे. टँकरव्दाद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ येऊ शकते. त्यावर मात करण्यासाठी सिंचन स्रोतांचे बळकटीकरण केले जात आहे. नवीन विहिरीचे कामही सुरू आहे.

बारमाही भाजीला उत्पादन

गावापासून जवळ परभणी शहरात मार्केट आहे. त्यामुळे खिल्लारे टोमॅटो, वांगी, कोथिंबीर, दोडका, कारले आदी भाजीपाल्यांची लागवड बारमाही पद्धतीने करतात. त्यातून दररोज ताजे उत्पन्न सुरु राहते.

बैलजोडी व गाय असून त्यांचे शेण उपलब्ध होते प्रसंगी गांडूळ खत विकत घेण्यात येते. अशोक यांना आई दैवशाला यांची शेतीत मोठी मदत होते. पत्नी विश्रांती यांचीही समर्थ साथ आहे.

अन्य फळबागांचे प्रयोग

खिल्लारे यांनी उत्पन्नस्रोत वाढविण्यासाठी अन्य फळबागांचेही प्रयोग केले आहेत. २०२१ मध्ये एक एकरांत मंत्र्याच्या १८० झाडांची लागवड केली आहे. त्यात चंदनाच्या १०० झाडांचे आंतरपीक घेतले आहे.

संत्र्याचे उत्पन्न लवकरच सुरू होईल. पण चंदनही १२ वर्षांनी उत्पन्न देण्यास सुरुवात करेल. सन २०२२ मध्ये सफरचंदाच्या हिमाचल प्रदेशातील वाणाच्या १०० झाडांची लागवड केली आहे.

अशोक खिल्लारे ७६२०४०९९१७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com