Horse Market : चला येवल्याला, देशातील प्रसिद्ध घोडेबाजाराला

Yeola Horse Market : नाशिक जिल्ह्यातील येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर मंगळवारी भरणारा घोड्यांचा बाजार सर्वदूर प्रसिद्ध आहे.दसऱ्याच्या आधी येणाऱ्या मंगळवारी भरणारा हा बाजार देशातील प्रमुख घोडे बाजारांपैकी सर्वांत मोठा मानला जातो. देखण्या, ऐटबाज, विविध जातींच्या घोड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी येथे मोठी गर्दी होते.
Horse Market
Horse Market Agrowon
Published on
Updated on

Yeola Famous Horse Market : मागील दहा दिवस सुरू असलेला नवरात्री आणि दसरा या सणांचा जल्लोष नुकताच संपला. नाशिक जिल्ह्यातील येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दसऱ्याच्या आधीच्या मंगळवारी भरणारा घोडे (अश्‍व) बाजार म्हणजे नवरात्रातील मुख्य आकर्षण असतो. देशातील प्रमुख घोडे बाजारापैकी तो सर्वांत मोठा मानला जातो. तसा हा बाजार दर मंगळवारीच भरतो. राजे रघुजी बाबा शिंदे यांनी येवले शहर वसविले. त्यानंतर सुरू झालेला हा बाजार ३५० वर्षांपासून सुरू असल्याचे संदर्भ आहेत. पूर्वी तो येवला गावात भरे. सन १९६८ पासून तो येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात भरत आहे. देशभरातील अश्‍वप्रेमी, व्यापारी येथे मोठ्या संख्येने सहभागी होतात. शेतकऱ्यांनी संगोपन केलेल्या घोड्यांची रास्त दरात खरेदी विक्री हे येथील वैशिष्ट्य आहे. राज्यासह पंजाब, हरियाना, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील अश्‍वप्रेमी येथे आवर्जून येत असतात.

वैशिष्ट्यांनुसार लाखांपर्यंत दर

अश्‍व क्रीडा प्रकार, शर्यती, टांगाशर्यती, लग्न किंवा कार्यक्रमासाठी घोडा व बग्गी मिरवणूक, मेंढपाळांसाठी बिऱ्हाड वाहतूक तसेच हौस किंवा छंद म्हणून अशी वेगवेगळ्या कारणांसाठी घोड्यांना मागणी असते. शरीररचना, ठेवण, लांबी, रुपडे, स्वभाव, गुण, खुणा, रंग, चाल, रपेट, नाचकाम, रुबाबदारपणा आदी वैशिष्ट्यांनुसार घोड्यांचे दर ठरतात. घोड्याचा नखरा हे त्याच्या सौंदर्याचे प्रतीक असते. ऐटबाज चाल आणि धावण्याची पद्धत याचीही प्रात्यक्षिके केली जातात. काही हजार रुपयांपासून ते काही लाख रुपयांपर्यंत विक्री केली जाते. मागील वर्षी उदयपूर येथील राजेशाही घराण्यात वाढलेल्या घोड्याचा वंश असलेली घोडी बाजारात दाखल झाली होती. त्यावेळी तब्बल ६१ लाख रुपये किमतीला तिची बोली लावण्यात आली.

Horse Market
Horse Exhibition : सर्वात उंच घोडा ठरला हिवरगाव अश्व प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण

विविध जातींच्या घोड्यांचा समावेश

दर मंगळवारी सुमारे शंभर तर दसऱ्याच्या पूर्वी मंगळवारी भरणाऱ्या वर्षभरातील सर्वांत मोठ्या बाजारात एकाच दिवशी एक हजारांपर्यंत लहान-मोठे घोडे पाहायला मिळतात. सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत बाजार समितीचा आवार गर्दीने फुललेला असतो. पंजाब, मारवाड, काठियावाडी, सिंधी, स्टॅलिन, भीमथडी, गावठी आदी जातींचे व देवमन, पंचकल्याण, चार पाय सफेद, अबलख, सफेद नुखरा असे घोडे येथे पाहण्यास मिळतात.

सिने अभिनेता निर्माता महेश मांजरेकर यांनाही या बाजाराचा मोह आवरता आला नव्हता. त्यांनीही ऐटबाज घोडा खरेदी केला होता. यंदा दसऱ्यापूर्वी भरलेल्या मंगळवारच्या (ता. ८) बाजारात इगतपुरीच्या मारवाड जातीच्या सफेद नुकरा घोड्याची शहरातील अरुण गांगुर्डे यांनी खरेदी केली. सुमारे साडेतीन लाखांची बोली विक्रेत्याने लावली होती. मात्र अडीच लाखांत सौदा पक्का झाला. छत्रपती संभाजीनगर येथील सौरभ पूरकर यांच्याकडील श्यामकर्ण जय मंगल सफेद घोडीची दीड लाखांत विक्री झाली.

साहित्याची बाजारपेठ

बाजारात घोडे सजावटीसाठी व शर्यतीसाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याचीही दुकाने थाटण्यात येतात. काठी, गळ्याचा पट्टा, घुंगरमाळ, मलाकोडे, हंटर, लगाम, चमकीची झुल आदी विविध सामग्री येथे पाहण्यास मिळतात. चारा विक्रीसाठीही परिसरातून अनेक जण येतात. त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. या बाजारातून येवला कृषी उत्पन्न बाजार समितीलाही उत्पन्न मिळते असे सभापती सविता पवार व सचिव कैलास व्यापारे यांनी सांगितले.

कैलास व्यापारे, सचिव, बाजार समिती, येवला, ९४२३४७७३१३

Horse Market
Sarangkhed Horse Market : देखण्या, उमद्या अश्वांसाठी चला सारंगखेड्याला...

घोडे बाजाराची प्रातिनिधिक उलाढाल

वर्ष घोड्यांची आवक विक्री उलाढाल (रु.)

२०२१-२२ १६०८ ४२७ ५०,८७,६०२

२०२२-२३ २२६६ ४२५ ४५,७७,८००

२०२३-२४ २०७३ ३१५ ३०,५५,४००

यंदाची आवक ७०० घोडे.

(स्रोत - येवला कृषी उत्पन्न बाजार समिती)

नवरात्रीमध्ये भरणारा हा एकदिवसीय बाजार तीन दिवसांचा होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. बाजाराची व्याप्ती वाढण्यासाठी शासनाच्या पाठबळाची गरज आहे.
ॲड. शाहू शिंदे, अश्‍वप्रेमी, येवला
येवला येथील घोडे बाजारात भीमथडी जातीच्या घोड्यांची उपलब्धता जास्त असते. शामिगोंडा म्हणजेच एक बैल- एक घोडा शर्यतीसाठी किफायतशीर दरांत येथे घोडे मिळतात.
ऋषिकिरण रविकिरण चव्हाण, ९९६०४१७४३२ अश्‍वपालक व प्रभारी-अश्‍वक्रीडा विभाग, मुकेशभाई पटेल सीबीएससी स्कूल, शिरपूर, जि. धुळे
आम्ही मेंढपाळ व्यवसाय करतो. त्यामुळे बिऱ्हाड वाहून नेण्यासाठी सशक्त, जातिवंत घोड्यांची गरज असते. चाळीस वर्षांपासून बाजारात येत असून किंमत व पसंत यांची सांगड घालून घोड्यांची खरेदी करतो.
प्रकाश बबडू कोळपे ८९७५५६९८७५ ढवळपुरी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com