Sarangkhed Horse Market : देखण्या, उमद्या अश्वांसाठी चला सारंगखेड्याला...

Article by Chandrakant Jadhav : नंदूरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने दत्त जयंतीच्या काळात भरणारी यात्रा व त्यातील अश्‍वबाजार सर्वदूर प्रसिद्ध आहे.
Horse Market
Horse MarketAgrowon

चंद्रकांत जाधव

Sarangkheda Yatra - Horse Market : जातिवंत अश्‍वांसाठी प्रसिद्ध असलेले सारंगखेडा हे साडे १२ हजार लोकसंख्येचे गाव (ता. शहादा, जि. नंदूरबार) तापी नदीकाठी तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर वसले आहे. शेती हाच गाव परिसराचा मुख्य व्यवसाय आहे. नदीवरील सारंगखेडा बॅरेजमुळे सिंचनाचा शाश्वत स्रोत आहे. गावात एकमुखी दत्त मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

त्यापूर्वी पाच ते सहा दिवस सागंरखेडाच्या प्रसिद्ध यात्रेला सुरवात होते. जयंतीनंतर सुमारे २० ते २५ दिवस ती चालते. यंदा ती २६ दिवस होती. यात्रेनिमित्त अश्‍वबाजार आयोजित करण्याची परंपरा आजही कायम आहे. पूर्वी ही यात्रा बैलांसाठी प्रसिद्ध होती. लाकडी बैलगाड्या, अवजारेही विक्रीस यायचे. मात्र बैलबाजारात सर्वत्र सुरू झाल्यानंतर यात्रेतील बैलांचे महत्त्व कमी झाले. मागील ६० ते ६५ वर्षांपासून बा बाजार अश्वांसाठीच प्रामुख्याने ओळखला जातो. आखाती देशांसह अफगाणिस्तान व अन्य भागातील घोडेही येथे येतात.

यंदाच्या बाजाराची वैशिष्ट्ये

पाच एकरांत अश्व बाजार असून त्यांच्यासाठी स्वतंत्र मंडप व्यवस्था असते. यंदा दक्षिण महाराष्ट्रासह पंजाब, हरियाना, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, केरळ आदी राज्यांमधील उमदे घोडे व सुमारे १५० व्यापारी आले होते. काठेवाडी, नुकरा, रेवाल, मारवार आदी जातीचे घोडे प्रमुख आकर्षण होते.

प्रति अश्वाची किंमत एक लाखांपासून ते १० लाख रुपये होती. मारवार, नुकरा या अश्वांना यंदा अधिक मागणी होती. राजस्थान येथील अश्व लक्षवेधी ठरले. त्यांची किंमत १० ते ५१ लाख रुपयांपर्यंत होती. अश्वांना खुराकात दूध, बदाम, अंडी, डाळी, सकस हिरवा चारा दिला जायचा. काही अश्वांचा खर्च दररोज तीन ते साडेतीन हजार रुपये एवढा होता.

मध्यप्रदेशातील जगदीशभाई यांचा मारवार राजवीर हा १८ लाखांचा अश्व आकर्षक ठरला. तो काळाभोर व देवमन, कंठमन या व्याख्येत बसत होता. त्याचे चारही पाय पांढरे (पंचकल्याण) होते. मध्य प्रदेशातील दीपकभाई यांचा आलम नामक देवमंगल प्रकारातील मारवार जातीचा अश्वही चर्चेत होता. त्याचे डोळे घारे होते. किंमत १५ लाख रुपये होती.

Horse Market
Success Story of Dairy Business : दुग्ध व्यवसायात महिला बचत गटाची आघाडी

या अश्वांना राहिली मागणी

वय चार ते साडेचार वर्षे.

उंची ६५ ते ६४ इंच, डोळे भुरसट

अतिशय देखणा

देशभरात विविध ठिकाणच्या अश्‍वदौड स्पर्धांमध्ये सहभागी

चारही पाय खुरांनजीक पांढरे शुभ्र, नाकापासून डोळ्यांपर्यंत पांढरा पट्टा

अश्‍व ७२ खोडी व ३६ गुणांचा मानला जातो

मारवार, सिंधी, नुकरा या जातींना अधिकची मागणी

‘चेतक फेस्टिवल’ची रंगत

सहा वर्षांपासून चेतक फेस्टिवलचे आयोजन यात्रेनिमित्त केले जाते. येथील जयपालसिंह रावलयासंबंधीच्या समितीचे प्रमुख आहेत. शासनाने १० वर्षांसाठी हा महोत्सव व अन्य बाबींसाठी तरतूद केली आहे.

अश्‍वांबाबत संशोधन, अभ्यासाला चालना मिळावी यासाठी अश्व संग्रहालयासही मंजुरी मिळाली आहे. यावेळी अश्व पोस्टर स्पर्धा, अश्व नृत्य, दौड आदी उपक्रम घेण्यात आले. विजयी मंडळींना बक्षिसे देण्यात आली.

Horse Market
Banana Industry Success Story : आखाती देशांपर्यंत नावाजलेला केळी उद्योगातील ‘स्टार’

अवजारांनाही मागणी

सारंगरखेड्याच्या यात्रेत कुदळ, फावडे, विळा, हातोडा, वखर, नांगर, लोखंडी बैलगाडे आदी सामग्रीही विक्रीसाठी येते. सात एकरां शेतीउपयोगी साहित्यासह भांडी विक्रीचा बाजार यंदाही होता. पितळी, तांब्याची विविध भांडी, बैल, पशुधनाच्या सजावटीचे साहित्यही विक्रीस आले होते.

खानदेशातील अनेक तालुके, मध्य प्रदेशातील मिळून दोन हजारांपेक्षा अधिक विक्रेते यात्रेत दाखल झाले होते. अश्वबाजाराची सुमारे चार कोटी तर एकूण उलाढाल २४ कोटी रुपयांपर्यंत झाली. यात अवजारे, पशुधन, अश्व सजावटीचे साहित्य, गृहोपयोगी वस्तू, भांडी, खाद्यपदार्थ यांचा समावेश होता. यंदाची उलाढाल अनेक वर्षांमधील उच्चांकी राहिली.

पर्यटनासाठी सारंगखेड्याचे महत्त्व

सारंगखेडा नजीक दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले प्रकाशा (ता.शहादा) हे तीर्थस्थळ आहे. सातपुड्यातील थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ (ता.धडगाव,जि.नंदुरबार) व अस्तंभा, रावलापाणी (जि.नंदुरबार) हा भागही सागंरखेडानजीक आहे.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या केवडिया (जि.नर्मदा, गुजरात) येथील नर्मदा नदीवरील जगातील सर्वात उंच पुतळ्याकडे जाण्यासही सारंगखेडा येथून मार्ग आहे. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने सारंगखेड्यास महत्त्व आले आहे.

सारंगखेडा व अश्व हे समीकरण आहे. अश्व हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. उत्तम आरोग्यासाठी तो महत्त्वाचा मानला आहे. पणजोबांच्या काळापासून आमच्या घरी अश्वपालनाची परंपरा आहे.
ज्ञानेश्वर पाटील, सारंगखेडा
दाराशी अश्व असल्यास समृद्धी नांदते असे मानतात. आमच्याकडे मारवार जातीचा अश्व असून तो कुटुंबाचा भाग झाला आहे. सारंगखेड्याच्या यात्रेतूनच तो आणला आहे.
पवन पुंडलिक पाटील, दापोरी, ता. एरंडोल, जि.जळगाव

रवींद्र पाटील, : ७९७२७५०३६० (उपाध्यक्ष, श्री दत्त मंदिर ट्रस्ट, सारंगखेडा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com