
Agriculture Success Story : यवतमाळ जिल्ह्यात दारव्हा-यवतमाळ मार्गावर दारव्हा या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या १२ किलोमीटरवर लाडखेड गाव आहे. पंधरा सदस्यीय ग्रामपंचायत असून, लोकसंख्या सुमारे नऊ हजारांवर आहे. एक किलोमीटरवर दक्षेश्वर महादेवाचे हेमाडपंती मंदिर आहे. देशात काशीनंतर लाडखेडचे हे मंदिर अशी त्याची ख्याती आहे.
खाऊच्या पानांसाठी होते प्रसिद्ध
गावात बहुतांश वस्ती बारी समाज बांधवांची आहे. खाऊच्या पान उत्पादनात त्यांची ओळख आहे. त्यामुळे हे गाव पूर्वी खाऊच्या पानासाठी प्रसिद्ध होते. बहुतांश शेतकऱ्यांकडे पानमळे होते. नंतरच्या काळात एकच पीकपद्धती व अन्य कारणांमुळे किडी-रोगाचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी, पानमळ्यांचे अस्तित्व धोक्यात आले.
कालांतराने ते नामशेष झाले आज या भागात एकही पानमळा शिल्लक नाही. पुढील काळात म्हणजे १९९५ च्या दरम्यान या भागात रताळ्याचे पीक घेतले जाऊ लागले. यवतमाळ बाजारात पुरवठा व्हायचा. पानमळ्यानंतर हेच या भागातील मुख्य पीक झाले आहे.
...अशी आहे रताळ्याची शेती
आजच्या घडीला गाव परिसरात दोन हजार एकराच्या आसपास रताळ्याची लागवड असावी असे गावातील प्रगतिशील शेतकरी सचिन विठोबाजी तायडे सांगतात. आपल्या २५ एकरांपैकी ते तीन एकरांत रताळे घेतात. ते रताळ्याच्या शेतीबाबत ठळक बाबी सांगताना म्हणाले, की जूनमध्ये रोपेनिर्मिती सुरू होते. त्यासाठी घरचेच वेल लावले जातात.
सरासरी दहा गुंठ्यांत ही रोपवाटिका उभारली जाते. तेवढ्या क्षेत्रात ७५ ते ८० वाफे राहतात. एखाद्या शेतकऱ्याला पाण्याअभावी रोपे तयार करणे शक्य नसल्यास किंवा अधिकची गरज भासल्यास प्रति वाफा रोपांची विक्री ५०० रुपयांना केली जाते. ऑगस्टच्या दरम्यान या वेलींची पुनर्लागवड होते. साधारण डिसेंबरच्या काळात प्लॉट सुरू होतो.
मार्च ते एप्रिलअखेरपर्यंत तो चालतो. एकरी व्यवस्थापनावर किमान ३० हजार व त्यापुढेही खर्च होतो. एकरी १५० ते २०० क्विंटलपर्यंत त्याचे उत्पादन मिळते. या पिकातून एकरी सुमारे ७५ हजार ते एक लाखांपर्यंत नफा मिळवण्याची संधी असते असे तायडे यांनी सांगितले. सन १९८४ मध्ये या भागात गोकी धरण प्रकल्प उभारण्यात आला.
परंतु तो सखल भागात तर गाव उंचावर वसले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा कोणताच फायदा झालेला नाही. उलट पाणी पातळीच खालावल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. विहीर व बोअरच्या पाण्यावर भाजीपाला व रताळे यांची सिंचन व्यवस्था होते.
रताळ्याची बाजारपेठ
महाशिवरात्री काळात रताळ्याला मागणी जास्त राहते. या काळात तोडणीला वेग येतो. गावातील मजूर कमी पडतात. त्यामुळे लगतच्या दहा गावांतील मजुरांची मदत घेतली जाते. त्यातून हंगामी रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो. यवतमाळ, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा त्यासोबतच राज्याच्या अन्य म्हणजे संगमनेर भागातील व्यापारी देखील लाडखेडला येत खरेदी करतात. साधारण १२०० ते १५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळतो. मागील तीन वर्षांत हे दर स्थिर असल्याचे तायडे सांगतात.
भाजीपाला पीक पद्धती फायदेशीर
अलीकडील काळात रताळ्यासह लाडखेडमध्ये बरबटी (चवळी), भेंडी, मेथी, कांदा आदी भाजीपाला घेण्यावरही येथील ग्रामस्थांचा भर आहे. त्यातून गावचे अर्थकारण समृद्ध होण्यास मदत झाली आहे. एखाद्या भाजीपाल्याला अपेक्षित दर न मिळाल्यास दुसऱ्यातून त्याची भरपाई होते. त्यामुळे ही पीक पद्धती शेतकऱ्यांसाठी पोषक ठरल्याचे सांगितले जाते.
आपला अनुभव सांगताना गावातील जगन्नाथ महादेव वरखडे म्हणाले, की अडीच एकर शेती असून बारमाही भाजीपाला पिके घेतो. यात वाल, बरबटी, भेंडी, मिरची, पालक, कोथींबीर यासारखी पिके घेण्यात सातत्य राखले आहे. पत्नीसोबत राबत असल्याने मजुरीवरील खर्च कमी केला आहे. नीलेश राऊत यांनी वांगी व अन्य भाजीपाला घेण्यात सातत्य राखले आहे.
पंकज दुधे यांचा हंगामी पिकांसह उन्हाळी तीळ लागवडीवर भर आहे. या वर्षी त्याचा एकरी पाच क्विंटल उतारा मिळाला. प्रति क्विंटलला ९ हजार रुपयांपासून १३ हजार रुपयांपर्यंत दर त्यांना मिळाले आहेत. प्रमोद दुधे यांनीही भाजीपाला शेतीतून अर्थकारण सुधारले आहे. शेतात ६० वर्षांपूर्वी आजोबांनी घेतलेली अष्टकोनी आकाराची विहीर वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे ते सांगतात.
मजुरांवर मात करीत शेतीत प्रगती
गावातील प्रगतिशील शेतकरी सचिन तायडे सांगतात, की दहा वर्षांपूर्वी आमच्या गावातूनच यवतमाळला बहुतांश भाजीपाला जायचा. नंतरच्या काळात मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली. दरांच्याही समस्या जाणवू लागल्या. भाजीपाला कमी झाला. मग अधिक भिस्त रताळे पिकावरच राहिली.
पूर्वीच्या सोयाबीन, कापूस या पिकांना रताळ्याचा पर्याय मिळून आमच्या आजच्या शेती पद्धतीतून आम्ही आर्थिक सक्षमता मिळवली आहे. महाशिवरात्रीच्या काळात रताळ्याला अधिक दर मिळत असल्याने त्या काळात कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न होऊन जाते.
गावातील बहुतांश शेतकऱ्यांकडे विहीर, रताळे धुण्यासाठी हौद पाहण्यास मिळते. घर बांधणे, मुलांचे शिक्षण, ट्रॅक्टर व यंत्रे घेणे शक्य झाले. आजही मजुरांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. मात्र लागवडीपासून ते काढणीपर्यंत आम्ही ट्रॅक्चटरचलित यंत्रांचा वापर करू लागलो आहे. ठिबक, स्प्रिंकलर यांच्या माध्यमातून पिकांना सिंचन केले जात आहे.
ब्रिटिश काळातच शैक्षणिक सुविधा
गावात शिक्षणाच्या सुविधा ब्रिटिश काळातच निर्माण झाल्या होत्या. त्यामध्ये १८६८ मध्ये मराठी शाळा व त्यानंतर उर्दू शाळा आणि याच दरम्यान पोलिस कार्यालयाचीही उभारणी झाली. ब्रिटिशांकडूनच शाळांचे व्यवस्थापन होत असावे. देश स्वतंत्र झाल्यावर पुढे जिल्हा परिषदेकडे शाळेची सूत्रे आली असे ऐकिवात असल्याचे गावातील ज्येष्ठ नागरिक भगवान दुधे यांनी सांगितले.
सचिन तायडे (शेतकरी) ९९२१८७०९०२
जगन्नाथ वरखडे (शेतकरी) ९९२१६८६१६४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.