

Agriculture Success Story : सध्या विविध फळांबरोबर बोरांचाही हंगाम तेजीत सुरू आहे. खानदेशातील अवीट गोडी असलेली मेहरुणी बोरे सर्वत्र प्रसिद्ध आहेत. ही बोरे आकाराने लहान, रसाळ व स्वादिष्ट असतात. पूर्वी जळगाव शहरानजीकच्या मेहरूण शिवारात त्यांची शेती केली जायची.
परंतु मेहरूणचा भाग जसा जळगाव शहरात समाविष्ट झाला तशी त्यांची शेती कमी होत गेली. परंतु मेहरूणच्या शिवारातील हे बोर जळगाव तालुक्यातील गिरणाकाठी म्हसावद, बोरनार, जळगाव खुर्द, बेळी, कानळादा, नांद्रा, आव्हाणे, खेडी खुर्द व वडनगरी गावांपर्यंत प्रसारित झाले.
या गावांतील अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर त्याची झाडे आहेत. काही शेतकरी २५ ते ३० वर्षांपासून ही झाडे अत्यंत कष्टाने जतन करून त्यापासून दरवर्षी उत्पादन घेत आहेत. जिल्ह्यातील तापी, गिरणा, पांझरा नदीकाठचे बोर मळे आता लुप्त झाले आहेत.
बोराची बाजारपेठ
जळगाव बाजार समितीत मेहरुणी बोरांची सर्वाधिक आवक होते. येथे बोरांचे चार - पाच अडतदार आहेत. पैकी काही जण शेतकऱ्यांकडे आगाऊ मागणी करून ठेवतात. दिवाळी सण आटोपला की हळूहळू आवक सुरू होते. यंदा अतिपाऊस, ढगाळ वातावरण व ऑक्टोबरमध्ये पाऊस सुरू राहिल्याने हंगाम लांबला. उत्पादन निम्म्याने घटले. साहजिकच आवक कमी झाली.
एरवी नोव्हेंबरमध्ये सुरू होणारी आवक यंदा डिसेंबरमध्ये सुरू झाली. बाजार समितीत मागील १५ ते २० दिवसांपर्यंत दररोज सरासरी १२ क्विंटल आवक झाली. त्यास किमान १५ रुपये तर कमाल २५ रुपये प्रति किलो दर मिळाला. मागील वर्षीही डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आवक टिकून होती. दरही किमान १५ ते २५ रुपये होते.
हातविक्रीतून गुजराण
जिल्ह्यातील आसोदा, नशिराबाद, म्हसावद, एरंडोलातील कासोदा, धरणगाव, पारोळा, भुसावळ, यावलमधील न्हावी, भालोद, किनगाव, चोपड्यातील अडावद आदी भागांतील आठवडी बाजारांतशेतकरी बोरांची हातविक्री करतात. जळगाव शहरातील विविध उपनगरांमध्येही किरकोळ वा थेट विक्री करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो.
या बोरांना प्रति किलो ५० ते ६० रुपये दर सध्या मिळत आहे.बाजार समितीच्या तुलनेत या हातविक्रीतून दोन पैसे अधिकचे मिळतात. काही शेतकरी, मजूर कुटुंबे बोरांची झाडे हंगामात भाडेतत्त्वावर घेऊन त्या बोरांच्या हातविक्रीतून आपली गुजराण करतात.
मेहरुणी बोरांना उठाव
अन्य संकरित किंवा मोठ्या आकाराच्या बोरांच्या तुलनेत मेहरुणी बोरांचे ग्राहक जळगाव, धुळे भागात अधिक आहेत. ज्यांचे जळगावशी नातेवाईक, व्यवसाय, नोकरी आदी कारणांनी संपर्क, संबंध आहेत, असे जवळपास सर्वजण मेहरुणी बोरे सोबत नेतात. काही जळगावकर
मंडळी आपल्या नातेवाइकांना पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई, बंगळूर, नागपूर आदी भागांत पाठविण्यासाठी ही बोरे आवर्जून घेतात. यामुळे बाजार समितीसह किरकोळ बाजारात त्यांना चांगला उठाव असून, दरही टिकून आहेत. यंदाचा हंगाम जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात संपेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कोरडवाहू, आश्वासक पीक
बांधावर असलेल्या बोरांच्या झाडांना सिंचन, खते, फवारण्या या गोष्टींची गरज नसते. वर्षभर फारसा खर्चही नाही. केवळ मे- जूनमध्ये झाडांची छाटणी केली जाते. त्यांना जोमाने फुटवे येतात. चांगला बहर येतो. वेचणी स्वतः शेतकरी करून घेतात. त्यासाठी मजुरी द्यावी लागत नाही.
म्हसावद, बोरनार, कानळदा, बेळी (ता. जळगाव) येथे काही शेतकऱ्यांकडे चार ते १० वर्षे वयाची झाडे असून सध्या दोन दिवसांआड ५० ते ६० किलो दर्जेदार बोरे त्यातून मिळतात. बाजार समितीत सुरुवातीला या बोरांना किलोला १२ ते २२ रुपये दर मिळाला.
आता किमान २५ रुपये दर मिळतो आहे. प्रति झाडापासून प्रति हंगामात किमान तीन ते चार हजार रुपये सहज मिळतात. वाहतूक खर्च मात्र लागतो. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी हे निश्चित आश्वासक व आघाराचे पीक ठरले आहे.
भदाणेंची बोरशेती
कानळदा (ता. जळगाव) येथील सुपडू गबा भदाणे २५ वर्षांपासून मेहरूणी बोरांचे उत्पादन घेत आहेत. त्यांची गिरणा नदीकाठी हलकी, वाळूमिश्रित अशी तीन एकर शेती आहे. ते म्हणाले, की हलक्या जमिनीत कोरडवाहू हंगाम हवा तसा साधत नाही. सिंचनाची सोय नाही.त्यांच्याकडे ज्वारी, तूर, रब्बी दादर (ज्वारी) व बोर अशी पिके आहेत. अन्य पिकांच्या तुलनेत बोरे चांगले उत्पन्न देतात असे ते म्हणतात.
मध्यम काळ्या कसदार जमिनीतील झाडांवर बोरे पक्व होण्यास किंवा खाण्यायोग्य होण्यास अधिकचा वेळ लागतो. पण हलक्या जमिनीत बोरे पक्व होण्याची क्रिया गतीने होते. शिवाय गोडीही चांगली असते. सुपडू हे पत्नी, मुलगा अरुण व सून यांच्या मदतीने शेती व्यवस्थापन पाहतात. पूर्वी त्यांच्याकडे बोरांची ६५ झाडे होती. आता ती ३० पर्यंत शिल्लक आहेत.
यंदाची स्थिती
साधारण २५ ते २६ नोव्हेंबरनंतर बोरांचा हंगाम सुरू होतो. तो जानेवारी अखेरपर्यंत चालतो. यंदा हंगाम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाला. कोरड्या, थंड वातावरण हंगाम जोमात असतो. मात्र मध्यंतरी गारपीट, अधिक काळ ढगाळ वातावरणाचा बोराला फटका बसला. मागील वर्षी त्यांना ४० ते ५० रुपये व सरासरी ३५ रुपये प्रति किलोचा दर मिळाला.
यंदा दर ४० ते ६० रुपये आहे. बाजार समितीत कमी दर मिळत असल्याने सुपडू जळगाव शहरात बळिराम पेठ व त्यालगत थेट विक्री करतात. मजुरी महागल्याने शेतीतील नफा घटला आहे. बोरे वाळवून विक्री केल्यास प्रति क्विंटल १७०० ते १८०० रुपयांपर्यंत दर मिळतो. दरवर्षी ५० ते ६० हजार रुपये या पिकातून सुपडू मिळवतात.
सुपडू भदाणे ९०४९२४३७३४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.