
एकनाथ पवार
Indian Agriculture : कुडाळ तालुक्यातील माणगाव-कांदोळी मार्गावर कर्ली नदी काठी वसलेले कालेली हे गाव. या शिवारात आंबा, काजू, नारळ, सुपारीची चांगल्या प्रमाणात लागवड आहे. काही शेतकऱ्यांनी बांबू पिकाची देखील नियोजनबद्ध लागवड केली आहे. याच गावात मथुरा राऊळ यांची शेती बागायती आहे. राऊळ पतीपत्नी मुंबईत नोकरी करत होते. परंतु गावी जाऊन शेती करण्याचे दोघांचेही स्वप्न होते. त्यांचे मूळ गाव तेंडोली आहे. वीस वर्षांपूर्वी त्यांनी कालेली येथे टप्प्याटप्प्याने आठ एकर जमीन खरेदी करून कुटुंब बागायतीमध्ये स्थायिक झाले.
नारळ, सुपारी लागवड
कालेली येथे किरकोळ नारळ लागवड आणि बहुतांशी पडीक असलेली आठ एकर जमीन खरेदी केल्यानंतर ती वहिवाटेखाली आणण्याचा संकल्प केला. जमिनीत भरपूर झाडेझुडपे होती. या जमिनीची एकाच वेळी करणे स्वच्छता त्यांना करणे शक्य नव्हते. त्यामुळे टप्प्याटप्प्याने जमिनीची मशागत करत नारळ, सुपारी लागवड सुरू केली. दोन वर्षांत त्यांनी संपूर्ण आठ एकर जमीन आंबा, काजू, नारळ, सुपारी लागवडीखाली आणली.
पूर्वी दोघेही मुंबईला राहत असल्यामुळे पीक व्यवस्थापनाची तितकीशी माहिती त्यांना नव्हती. परंतु मथुरा यांनी नारळ, सुपारी, आंबा,काजू या लागवडीविषयी परिसरातील बागायतदार, कृषी तज्ज्ञांशी चर्चा करून माहिती घेत टप्प्याटप्प्याने संपूर्ण जमीन लागवडीखाली आणली. राऊळ यांनी चार वर्षांपूर्वी बागेत आठ नीरफणस कलमांची लागवड केली आहे. या फणसांची ६० ते १०० रुपये प्रति फळ या दराने थेट विक्री करतात.
पालेभाज्या, फळभाज्यांची लागवड
फळझाडांची लागवड केल्यानंतर किमान पाच वर्षे उत्पादन मिळण्यासाठी जातात. या कालावधीत अर्थकारण काहीसे डबघाईला येते. त्यामुळे मथुरा यांनी काही गुंठ्यांत पालेभाज्या, फळभाज्या लागवडीवर भर दिला. लाल भाजी, मुळा, दोडके, काकडी, कारली, पडवळ लागवडीतून त्यांना काही प्रमाणात उत्पादन सुरू झाले. दर्जेदार उत्पादन मिळायचे पण विक्री कशी करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. कालेली गावात सगळ्या भाजीपाल्याची विक्री होईल अशी स्थिती नव्हती.
अखेरीस त्यांनी कुडाळ शहरात जाऊन भाजीपाला विक्रीस सुरुवात केली. दर्जेदार भाजीपाल्यामुळे ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. थेट विक्रीमुळे भाजीपाल्यास अपेक्षित दर देखील मिळू लागला. राऊळ यांच्या फळबागेत झाडांची विविधता आणि आल्हाददायक वातावरण आहे. त्यामुळे परिसरातील शाळांच्या सहली, अधिकाऱ्यांची सहली येथे येतात. येत्या काळात फळबाग ही कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचे त्यांनी नियोजन केले आहे.
भाजीपाला, फळांची थेट विक्री
मथुरा राऊळ यांनी प्रयोगशील शेतकरी तसेच तज्ज्ञांच्या सल्याने फळबागेचे चांगले व्यवस्थापन ठेवले आहे. सेंद्रिय खतांच्या वापरावर त्यांचा भर आहे. शिफारशीनुसार कीडनाशकांचा मर्यादित वापर करतात. हापूस आंब्याची कुडाळ, सावंतवाडी शहरात जाऊन थेट विक्री केल्यामुळे अपेक्षित दर मिळतो. याशिवाय भाजीपाला,चिकू, अननस, कणगराची थेट ग्राहकांना विक्री करतात.
...अशी आहे बागायती
आठ एकरामध्ये नारळ २००, सुपारी ८४०, हापूस आंबा ८०, काजू १५० कलमे. याशिवाय चिकू, कोकम, मिरी, बांबू लागवड.
काही क्षेत्रात लालभाजी, मुळा, दोडके, काकडी, कारली, अननस, कणगर लागवड.
सुपारी, आंबा, काजू, नारळ, भाजीपाला, बांबू तसेच कुक्कुटपालन व्यवसायातून वार्षिक चार लाखांची उलाढाल.
शेतीमधील गुंतवणूक
शेती, पोल्ट्री शेड, बागायतीला पाणीपुरवठा आणि इतर कामांसाठी बँकेकडून पाच लाख रुपयांचे कर्ज.
स्वगुंतवणुकीतून घरालगत ३० फूट गोलाईची विहीर खोदाई.
संपूर्ण लागवडीमध्ये पाइपलाइन. नारळ, सुपारीला पाणी पुरवठ्यासाठी नदीवरून उपसा करून पाइपलाइन.
कुक्कुटपालनासाठी १५० फूट बाय ३० फूट शेड.
गाईंसाठी २५ फूट बाय ५० फूट लांबी रुंदीची शेड.
कुटुंबाची मिळाली साथ...
मथुरा राऊळ या २०१७ ते २०२२ या कालावधीमध्ये कुडाळ पंचायत समितीच्या घावनळे मतदार संघाच्या सदस्या होत्या. या कालावधीत त्यांनी अतिशय उत्तम काम केले आहे. पंचायत समिती सदस्य असताना देखील त्यांनी शेतीकडे दुर्लक्ष केले नाही. शेतीमाल विक्री त्यांनी सोडली नाही. त्यामुळे अनेकांना त्यांचा हेवा वाटतो. याचबरोबरीने त्यांनी गावातील दहा महिलांचा स्वामिनी स्वयंसाह्यता गट स्थापन केला आहे.
या माध्यमातून परसबागेतील कुक्कुटपालनास त्यांनी चालना दिली आहे. शेती व्यवस्थापनामध्ये त्यांना पती गोविंद याबरोबरीने मुलगा विकास, प्रज्ञेश यांची मदत होते. शेती, बागायतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून टप्प्याटप्प्याने राऊळ यांनी फळबागायती लागवड वाढविली. तसेच दोन्ही मुलांना उच्चशिक्षण दिले आहे. शेतीला आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी देखील त्यांनी केली आहे.
कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसायाची जोड
शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली तर चांगला फायदा होतो हे लक्षात आल्यानंतर मथुरा राऊळ यांनी कुक्कुटपालन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक मोठी शेड उभारली. यामध्ये त्यांनी दोन भाग केले. एका भागामध्ये कॉन्ट्रक्ट फार्मिंगच्या स्वरूपात बॉयलर कोंबडीपालन आणि दुसऱ्या भागामध्ये त्या गावठी कोंबडीपालन त्या करतात. गावशिवारात गावरान कोंबडी २०० ते ३०० रुपये आणि ५०० ते ७०० रुपयांना कोंबड्यांची विक्री होते.
सध्या त्यांच्याकडे साहिवाल, गीर, गावठी अशा पाच गायी आहेत. घरातील वापराला दोन लिटर वगळून उर्वरित पाच लिटर दुधाची त्या ४० रुपये लिटर दराने विक्री करतात. जनावरांचे शेण, कोंबड्यांच्या विष्टेचा वापर सेंद्रिय खत निर्मितीसाठी करतात. त्यांनी गांडूळ खत निर्मिती सुरू केली आहे. हे खत भाजीपाला, फळझाडांसाठी वापरले जाते.
मथुरा राऊळ, ८९९९३२८०८१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.