
Farming Revolution : पहिले महायुद्ध समाप्तीकडे जाऊ लागले आणि याच दरम्यान भारतामध्ये प्लेगची साथ सुरू झाली. माणसं एकमेकांपासून दूर जाऊ लागली. गाववस्ती सोडून रानावनात आणि निर्मनुष्य नदीकाठी जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला. याच दरम्यान चिपळूण तालुक्यातील कोंढे गावातील काही भूमिहीन कुटुंब ही वाशिष्टी नदीने चहूबाजूंनी वेढलेल्या जुवाड बेटावर पोहोचली.
सुरुवातीला जनावरे चारण्यासाठी आलेली मंडळी गोठे आणि नंतर राहुट्या उभारून राहू लागली. हळूहळू इतर काही कुटुंबे पुढील काही वर्षांमध्ये येथे स्थाईक झाली. जगण्यासाठी थोडीफार शेती त्यासाठी जनावरे, नांगर अशी शेती साधने सोबत घेऊन जगण्याचा प्रवास सुरू झाला. प्लेगचा धोका ओसरल्यानंतर प्रारंभिक रात्र वस्तीला येथे फार कोणी राहत नसे. हळूहळू वस्ती विस्तारित गेली.
अशाप्रकारे या बेटावर पहिले पाऊल हे शंभर वर्षांपूर्वीच पडले होते. या जुवाड बेटावर सध्या १४ कुटुंबांचे वास्तव्य आहे. येथील ग्रामस्थांपुढे रोजगाराचा गहन प्रश्न होता. भातशेती आणि मजुरी हे त्यांचे गुजराण करण्याचे प्रमुख साधन. वाशिष्टी नदीला येणारा पूर हा त्यांच्या पाचवीला पुजलेला. २००५ आणि २०२१ मधील नदीच्या पुराने गावकऱ्यांचे कंबरडे मोडले. महापुराच्या तडाख्यात शेत जमीन, पाळीव पक्षी, पशुधनाचे अपरिमित नुकसान झाले. पुरामुळे आलेला गाळाचा राब, वाळू, रेतीमुळे जमिनीची सुपीकता ढासळली. हे लक्षात घेऊन चिपळूणमधील दिशांतर संस्थेने कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्वातून या गावाला पुन्हा एकदा नवी दिशा देण्याचे ठरविले.
अन्नपूर्णा प्रकल्पाला सुरुवात
मागील एक तपापासून दिशांतर संस्था महिला शेतकरी गटांसमवेत काम करत आहे. या संस्थेने पूर परिस्थितीनंतर वाडी बैठक घेऊन आलेल्या संकटाचा मुकाबला कसा करायचा याची चर्चा केली. यातून पुढे आलेल्या सकारात्मक मुद्द्यांवर अन्नपूर्णा प्रकल्पाची निर्मिती या वस्तीवर करण्याचे निश्चित करण्यात आले. रब्बी हंगामाचे नियोजन गतवर्षीच करण्यात आले. २०२२ मध्ये बारा महिलांचा सावित्रीबाई शेतकरी स्वयंसाह्यता गटाची निर्मिती करण्यात आली. तसेच बारा शेतकऱ्यांना एकत्र करून सावता माळी शेतकरी स्वयंसाह्यता गट बनविण्यात आला.
सावित्रीबाई शेतकरी स्वयंसहाय्यता गटात सध्याधनश्री माळी (अध्यक्षा), विद्या माळी (उपाध्यक्षा), देविका माळी (सचिव), अनिता माळी (खजिनदार), सुमती माळी, राजश्री माळी, सीमा माळी, वृषाली माळी, किशोरी माळी, सुगंधा माळी, सुप्रिया माळी, पार्वती माळी या कार्यरत आहेत. नेरोलॅक कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ विकास व्यवस्थापक संतोष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एक धोरण निश्चित करून टप्प्याटप्प्याने विविध स्तरावर कामे हाती घेण्यात आली.
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर, पीक पोषणासाठी जिवामृत, गांडूळ खत, दशपर्णी अर्क निर्मिती आणि वापराबाबत प्रशिक्षण देण्यात आले. ‘आत्मा’चे व्यवस्थापक पंकज कोरडे यांचे मार्गदर्शन मिळाले. गावठी वांगी, मिरची रोपांची निर्मिती सुरू झाली. गावातील शेतकऱ्यांना स्थानिक रोपवाटिकेतून बारा हजार विविध भाजीपाला पिकांची रोपे देण्यात आली. समूह आणि वैयक्तिक शेतीसाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विविध प्रकारच्या बियाण्यांचे वितरण करण्यात आले. यामध्ये भेंडी, काकडी, मिरची, विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, मका बियाण्याचा समावेश आहे.
पीक उत्पादनात वाढ
महिला बचत गट सुरू करण्यापूर्वी जुवाड बेटावरील ग्रामस्थ मजुरी आणि शक्य असेल तेव्हा भाजीपाला उत्पादन आणि विक्री व्यवसाय करत होते. परंतु भाजी विक्रीतून तेवढा नफा मिळत नव्हता. त्यामधून कुटुंबाचा रहाटगाडा चालवणे शक्य होत नव्हते. महापुरानंतर सामाजिक संस्थांचा मदतीमुळे महिला तसेच पुरुष बचत गट स्थापन झाला. या गटांना पहिल्या वर्षी एक लाख रुपये भाग भांडवल मिळाले. तसेच कंपनीकडून रोपे, खते, नदीवरील पाणी शेतापर्यंत नेण्यासाठी पाइप उपलब्ध करून देण्यात आले.
महिला गटाने खरीप हंगामानंतर पाच एकर जमीन भाडेतत्त्वावर घेऊन त्यामध्ये विविध भाजीपाला पिकांची लागवड सुरू केली. गुंतवणुकीसाठी पैसे मिळाल्यामुळे मोठा आधार गटाला मिळाला. पालेभाजी, फळभाजी, कडधान्य विक्रीतून गटाने गेल्या वर्षी पाच लाख रुपये वार्षिक उलाढाल केली. गटामुळे वाडीतील महिलांना रोजगार उपलब्ध झाला. पहिल्याच वर्षी प्रत्येकीला ४० हजार रुपये नफा मिळाला, असे गटाच्या उपाध्यक्ष विद्या माळी यांनी सांगितले.
भाजीपाला विक्रीचे नियोजन
जुवाड येथील महिला गट आणि पुरुष गटातील सदस्य उत्पादित भाजीपाला चिपळूण शहरातील चिंचनाका, पानगल्ली येथे नियमित विक्रीसाठी दुकानात पाठवतात. त्याचबरोबर लोटे, शृंगारतळी, खेर्डी, आवाशी येथील आठवडी बाजारात भाजीपाला विक्री होते. भाजीपाल्याची थेट ग्राहकांना विक्री केल्याने चांगला दर मिळतो, असे महिला गटाचे मार्गदर्शक अनिल माळी यांनी सांगितले.
जुवाड बेटावरील उपक्रमासाठी नेरोलॅक कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ विकास व्यवस्थापक संतोष देशमुख, लोटे येथील मनुष्यबळ विकास व्यवस्थापक नंदन सुर्वे, वर्क्स मॅनेजर जयवर्धन यांच्यासह दिशांतर संस्थेचे राजेश जोष्टे, सीमा यादव, शर्वरी कुडाळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन गावकऱ्यांना मिळत आहे.
असे झाले बदलपरसबाग निर्मिती
शेती आणि पूरक व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक घराजवळ परसबागा समृद्ध करण्यासाठी विविध फळे, फुलझाडांच्या रोपांचे वितरण करण्यात आले.
शेतीपूरक साहित्य
जिवामृत निर्मितीसाठी बॅरल, सेंद्रिय खत निर्मिती, कंपोस्ट खत निर्मितीसाठी टाक्या, २० किलो गांडूळ बीज, जल व्यवस्थापनासाठी पाईप, फवारणी पंप, भाजीपाला साठवणुकीसाठी सब्जी कुलरची व्यवस्था करण्यात आली.
शेती सर्व्हेक्षण
प्रत्येक शेत आणि शेतकरी निहाय सर्व्हेक्षण करण्यात आले. सोमनाथ पाटणकर यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. त्यानुसार पीक पद्धतीत बदल करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.