Sustainable Agriculture : संगणक अभियंत्याची कृषितील यशोगाथा ; साडेसात एकरांत ४० हून अधिक पिके

Multi Crop Farming : त्रपती संभाजीनगर येथील संगणक अभियंता मुक्तक जोशी यांनी साडेसात एकरांत चाळीसहून अधिक पिके असलेल्या बहुविध पीक पद्धतीचा आदर्श उभा केला आहे. या पद्धतीत ठिबक व तुषार सिंचन पद्धतीने पाण्याचा काटेकोर वापर व बचत करण्याचा प्रयत्न केला आहे.
IT Engineers Farming Success
IT Engineers Farming Success Agrowon
Published on
Updated on

IT Engineers Farming Success : छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्य असलेले सुमारे ४१ वर्षे वयाचे मुक्तक जोशी कॉम्प्युटर सायन्स विषयातील अभियंते आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी या क्षेत्रातील पहिली कंपनी स्थापन केली. विविध ‘सॉफ्टवेअर’ विकसित केली. अभियांत्रिकीची परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत त्यांचे ७६ व्यावसायिक प्रकल्प तयार झाले होते.

त्यांनी सुमारे सात कंपन्या स्थापन केल्या. सन २०१२ ते पुढे काही वर्षे त्यांनी अमेरिकेतही काम केले. मात्र सहा महिने भारतात व उर्वरित सहा महिने अमेरिकेत अशा पद्धतीचे हे काम होते. त्यांची एक कंपनी अमेरिकेतील एका कंपनीने खरेदीही केली.

शेती क्षेत्रात पदार्पण

साधारण २०१९ मध्ये मराठवाड्यातील जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी होण्याच्या संदर्भाने एक अहवाल मुक्तक यांच्या वाचनात आला. रसायनांचा अमर्याद वापर व मातीचे वाळवंटीकरण या विषयाच्या अनुषंगाने मुक्तक गंभीर झाले. त्यांनी माती व शेती सुधारण्याच्या दृष्टीने काम करण्याचे ठरवले. पत्नी श्रुती यांनीही त्यांना साथ देण्याची तयारी दर्शविली.

जोशी दांपत्याने यापूर्वी मातीत कधी हात घातला नव्हता. मात्र सुरुवातीला घरच्या गच्चीवर ॲक्वापोनिक्स पद्धतीने मासे पाळून त्यांचे पाणी ‘सर्क्यूलेट’ करून भाज्या घेण्यास सुरुवात केली. मात्र ही पद्धती खर्चीक असल्याचे लक्षात आल्यावर प्रत्यक्ष शेतात राबण्याचे ठरवले. त्यासाठी महाराष्ट्रापासून ते मध्य प्रदेशापर्यंत फिरून वेगवेगळ्या प्रकारची शेती व त्याची मॉडेल्स अभ्यासली. पुस्तकांमधूनही ज्ञानवृद्धी केली.

IT Engineers Farming Success
Multi Cropping : बहुपीक पध्दतीतून आर्थिक स्थिरता

बहुविध पद्धतीच्या शेतीतील तंत्र

शहरापासून सुमारे १५ ते वीस किलोमीटर अंतरावर साडेसात एकर शेती खरेदी केली. आज २०२२ पासून तेथे बहुविध पीक पद्धतीची शेती केली जात आहे. आज फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या, कडधान्ये, मका, विविध फळे आदा मिळून ४० हून अधिक प्रकारची पिके या शेतात घेतली जात आहेत. त्याचे विविध प्लॉट तयार केले आहेत.

प्रति प्लॉटमध्ये ३६ ते ३२ पर्यंत गादीवाफे (बेड आहेत) दोन बेडमध्ये साडेतीन फूट अंतर आहे. बेडची लांबी १६५ फुटांपर्यंत आहे. काही ठिकाणी एका बेडवर सहा, काही ठिकाणी तीन अशी पिके घेतली जातात. यात एखादी पालेभाजी, मुळा, बीटरूट, वांगी, वेलवर्गीय भाजी, मका, चवळी आदी पिकांची एका बेडवर पद्धतशीर रचना केली आहे.

ठिबकद्वारे दिलेले पाणी जसे जसे खाली जाईल तसतसे बेडवरील वेगवेगळ्या पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचते. जास्त कालावधीच्या पिकाचा प्लॉट संपेपर्यंत कमी कालावधीत येणाऱ्या पालेभाज्यांची एकापेक्षा जास्त वेळ लागवड व काढणी होते. आठवड्यातून तीन दिवस प्रति दिवस सुमारे २ तास व २ लिटर प्रति तास ठिबक चालवले जाते.

चार पद्धतींचा वापर

मुक्तक यांनी चार पद्धतींचा वापर शेतात केला आहे. एका पद्धतीत १५० मायक्रॉन वोव्हन मल्चिंग पेपर किंवा शीटने संपूर्ण शेत झाकले आहे. तेथे कोरडवाहू पद्धतीने विविध पिके घेण्यात येतात. दुसऱ्या पद्धतीत केवळ सरींमध्ये या शीटचा वापर केला आहे. ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा तेथे वापर केला आहे.

तिसऱ्या पद्धतीत शेतात तण वाढू दिले असून तेथे लिंबू. सफरचंद. डाळिंब अशी विविध फळे घेतली आहेत. तर चौथ्या पद्धतीत शेतातील गवत कापून त्या जागी कुजवून तेथे पिके घेतली आहेत. या सर्व बहुविध पीक पद्धतीत भेंडी, गवार, वांगी, पडवळ, टरबूज, पपई, केळी आदींचाही समावेश आहे. जर आठवड्याला सर्व मिळून सुमारे साडेसातशे किलोपर्यंत भाजीपाला उपलब्ध होतो. माती व पिके सशक्त होण्यासाठी सेंद्रिय स्लरीची निर्मिती केली जाते.

IT Engineers Farming Success
Multi Cropping : बहुविध पीक पद्धतीतून उत्पन्नाची शाश्‍वती

पाण्याची झाली बचत

मुक्तक सांगतात, की मी वापरत असलेल्या शेती पद्धतीत दिलेले पाणी एकाचवेळी विविध पिकांना मिळते. मल्चिंग पेपरचाही वापर होतो. मातीत ओलावा टिकून राहतो. बाष्पीभवन कमी होते. शेती घेतल्यानंतर पहिल्या वर्षी शेतातील पाणी कोणत्या दिशेने वाहते याचा अंदाज मुक्तक यांनी घेतला त्यानंतर पाणी वाहणाऱ्या दिशेने शेतात बांधाजवळ चर खोदले.

सोबतच संपूर्ण क्षेत्राची बांधबंदिस्ती केली. त्यामुळे शेतातील पाणी शेतातच मुरू लागले. मातीचे वहनही थांबले. उताराच्या विरुद्ध दिशेने असलेल्या चरामुळे पाणी जिरून पुनर्भरणाची सोय झाली. मुक्तक यांची बहुविध पीक पद्धती पाहण्यासाठी असंख्य शेतकरी सातत्याने शेतीला भेट देताना दिसत आहेत.

कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय

शेतीसोबत कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसायही केला जातो. पंधरा कोंबड्यांपासून पूरक व्यवसायास सुरुवात केली. सुमारे साडेचारशेपर्यंत त्यांची संख्या पोहोचली. आज २५० पर्यंत त्यांची संख्या आहे. अंड्यांची ग्राहकांना विक्री होते. सुमारे १८ देशी गाई आहेत. त्यात प्रामुख्याने साहिवाल ब्रीड आहे. बहुतांश दुधाचे रतीब लावले असून उर्वरित दुधापासून पारंपरिक पद्धतीने तूपनिर्मिती केली जाते. त्याचीही विक्री होते.

थेट ग्राहकांना होते विक्री

मुक्तक नैसर्गिक पद्धतीने शेतीमाल पिकवतात. ते थेट ग्राहकांना विक्री करतात. सुरुवातीला मंदिराच्या बाहेर बसून भाजी विकली. नंतर ई- रिक्षा घेतली. ती ‘सोसायटी ते सोसायटी’ फिरवून विक्री केली. आज घराबाहेर शेतीमाल विक्रीचे आउटलेट उभारले आहे. आज शहरातील सुमारे ४०० ते ४५० ग्राहकांचे नेटवर्क त्यांनी उभारले आहे. त्यांच्या माध्यमातून सर्व खरेदी होते. मुक्तक यांच्या पत्नी श्रुती विक्री व्यवस्थेची जबाबदारी सांभाळतात.

मुक्तक जोशी ९७६५४ ०२६९९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com