Multi Cropping : बहुविध पीक पद्धतीतून उत्पन्नाची शाश्‍वती

Mix Crop Method : सातारा जिल्ह्यातील व्याजवाडी (ता. वाई) येथील ज्ञानेश्‍वर पिसाळ यांनी दीर्घ कालावधीची नगदी पिके व वर्षभर विविध भाजीपाला अशी बहुविध, मिश्र पिकांची शेती यशस्वी केली आहे.
Agriculture Success Story
Agriculture Success StoryAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात सर्वाधिक हळद पीक घेतले जाते. तालुक्यात पाचवड व वाई रस्त्यावर व्याजवाडी (ता. वाई) हे छोटे गाव आहे. येथील ज्ञानेश्‍वर पिसाळ हे प्रगतिशील शेतकरी असून, त्यांची १२ एकर बागायती शेती आहे. बारावीचे शिक्षण झाल्यानंतर वडील महादेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेतीला सुरुवात केली. पाण्याची उपलब्धता असल्याने ऊस, हळद, आले यांसारख्या दीर्घ कालावधीच्या नगदी पिकांना प्राधान्य दिले.

कृषी विभागाच्या सहलीतून भाजीपाला पीक पद्धतीची संकल्पना पुढे आली. टोमॅटो, वांग्याचे उत्पादन यशस्वी झाले. हंगामाचा विचार करून लागवडीचे नियोजन केल्यास उत्पन्न चांगले मिळते हे लक्षात आले. भाजीपाल्याचे ‘प्लॉट’ उत्कृष्ट केल्याने खासगी कंपन्यांनी ‘डेमो प्लॉट’ घेण्यास सुरुवात केली. त्यातून उत्साह येत भाजीपाला पिकांखालील क्षेत्र वाढवत नेले. प्रयोगशीलतेतून टप्प्याटप्पाने शेतीत बदल सुरू केले.

पिसाळ यांची शेती व वैशिष्ट्ये

बारा एकरांपैकी सुमारे दीड एकरांत हळद, एक एकर आले व चार एकरांपर्यंत ऊस अशी दीर्घ कालावधीची पिके. तर उर्वरित क्षेत्रात टोमॅटो, कोबी, मिरची या प्रमुख पिकांसह वांगी, काकडी, दोडका, शेवगा, कारली, टरबूज कलिंगड ही पिके थोड्या थोड्या क्षेत्रात घेतली जातात. काही उसात तर काही आले पिकात आंतरपिके.

Agriculture Success Story
Agriculture Technology : बहुपीक पद्धतीतून मिळू शकेल अधिक उत्पादकता

वाडवडिलांपासून हळदीची परंपरा. तंत्रज्ञानात बदल करत उत्पादनात केली वाढ. एकरी १० ट्रेलर शेणखताचा वापर. लागवडीसाठी चार फुटी बेड, दोन ओळींत एक फूट अशी पद्धत. सततची भांगलण टाळण्यासाठी भरीची संख्या वाढविली जाते. शेणखत, लेंडी खत व जिवामृताचा जास्त वापर. त्यातून रासायनिक खतांचा वापर केला कमी.

सहा महिने कालावधीसाठी प्रगती तर नऊ महिने कालावधीसाठी सेलम वाणाचा वापर.

सहा महिन्यांत एकरी १२ ते १३ टन तर नऊ महिन्यांत एकरी वाळवून ३० ते ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन. ऑनलाइन विक्री उद्योगातील आघाडीच्या कंपनीद्वारे ओल्या हळदीची होते विक्री. त्यास किलोला ८० ते १०० रुपयांपर्यंत मिळतो दर.

उसाच्या को ८६०३२ वाणाची पाच बाय दोन फूट अंतरावर लागवड. हळदीप्रमाणेच शेणखत, लेंडीखताचा वापर होत असल्याने तसेच स्वतःच्या ट्रॅक्टरद्वारे मशागत केल्याने खते व मजुरी खर्चात बचत. सरासरी एकरी ८० ते ८५ टन उत्पादन.

शेतीला पेरू व पपई या फळपिकांचीही जोड. दहा गुंठे क्षेत्रावर तैवान पिंक पेरू. मागील वर्षी फिरत्या विक्रेत्यांना विक्री करून चांगला दर व दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळवले. सध्या १०० रुपये प्रति किलो दराने विक्री.

आल्याचे एकरी २८ ते ३० गाड्या (प्रति गाडी ५०० किलो) उत्पादन. त्यात झेंडू, मिरची, गवार यांसारखी आंतरपिके. आल्याला प्रति किलो ८० ते ९० रुपये दर मिळतो. खोडवा घेतला जात नाही.

यांत्रिकीकरणावर भर दिल्याने वेळेत दर्जेदार कामे होतात. काही यंत्रांमध्ये सोयीनुसार बदलही केला आहे.

बाजारपेठांतील दरांवर लक्ष ठेवून भाजीपाला लागवडीचे नियोजन. भाजीपाल्याचे दर ज्ञानेश्‍वर ठरवतात. त्यानुसार किलोला ८० ते १०० रुपये किंवा मार्केटपेक्षा २० टक्के दराने भाजीपाल्याची विक्री.

Agriculture Success Story
Multi Cropping : बहुपीक पध्दतीतून आर्थिक स्थिरता

दुग्ध व्यवसायास चालना

शेती हाच कुटुंबाचा मुख्य आर्थिक स्रोत असल्याने पिसाळ यांनी शेतीला पूरक म्हणून घराजवळच्या शेडमध्ये पाच गायींचे संगोपन सुरू केले. सन २०२३ मध्ये घरामागील जागेत बंदिस्त गोठ्याची उभारणी केली. यात गव्हाण, चारा- पाणी, मिल्किंग मशिन, गारव्यासाठी फॅन आदी सर्व सुविधा केल्या.

आज संकरित गायी असून दहापर्यंत संख्या आहे. कुट्टी करूनच खाद्य देण्यात येते. पहाटे पाचपासून सकाळी सात व सायंकाळी पाच ते सात या वेळेत गोठ्याचे व्यवस्थापन पाहिले जाते. दररोज ६० लिटरच्या पुढे दुधाचे संकलन असून फॅट व एसएनएफ नुसार लिटरला २७ ते २८ रुपये दर मिळतो.

शेतीत झालेली प्रगती

पिसाळ यांनी शेतीतील उत्पन्नातूनच चार एकर शेती खरेदी केली. तीन ट्रॅक्टर, अवजारे, पाण्यासाठी टँकर, पॅकहाउस या सुविधा केल्या. पुण्यात फ्लॅट घेतला. नीरज व आदित्य ही मुले अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. ज्ञानेश्‍वर यांच्या आईचे निधन झाले आहे. वडिलांचा त्यांना मोठा आधार असून वय वर्षे ८५ मध्येही ते शेतीत सक्रिय असतात. पत्नी आश्‍विनी घर सांभाळून शेतात पतीच्या बरोबरीने राबतात. काही आर्थिक व्यवहार आज मुलांवरही सोपवले आहेत. कृषी अधिकारी, प्रगतिशील शेतकऱ्यांनी पिसाळ यांच्या शेतीला भेटून कौतुक केले आहे. कृषी विभाग, आत्मा विभागाच्या योजनांचा मोठा फायदा झाला आहे.

ज्ञानेश्‍वर पिसाळ, ९७६७४३९२०६, ९४२०५९४९१६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com