अमित गद्रे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः कोळस, मळवे, महासिर, कानस, शेंगाळी, मळे या नदी, तलावातील स्थानिक मत्स्य प्रजाती. (Local Fish Species) परंतु अनियंत्रित मासेमारीमुळे या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या प्रजातींच्या संवर्धनासाठी आंबा (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील वसुंधरा निसर्ग संवर्धन संस्थेने तीन वर्षांपासून विशेष प्रकल्प हाती घेतला आहे.
या माध्यमातून नष्ट होत चाललेल्या स्थानिक माशांच्या प्रजातीचे हॅचरीमध्ये मत्स्यबीज तयार करून त्यांना मूळ अधिवासामध्ये म्हणजेच नदी, तलावात सोडण्यात येते. या उपक्रमाला गावकऱ्यांची चांगली साथ मिळाली आहे.
याबाबत माहिती देताना वसुंधरा निसर्ग संवर्धन संस्थेचे प्रमुख प्रमोद माळी म्हणाले, की गेल्या तीन वर्षांपासून आम्ही कडवी, कासारी नदी खोऱ्यांतून नष्ट होत चाललेल्या कोळस, मळवे, महासिर या माशांच्या प्रजातीचे संवर्धन करत आहोत. या माशांचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात प्रवाहाच्या विरोधात जाऊन कमी पाण्याच्या ठिकाणी अंडी घालतात. यास ग्रामीण भाषेत ‘चढणीचे मासे’ म्हणतात. जून ते ऑक्टोबर या काळात रात्रीच्या वेळी स्थानिक लोक नदी, ओढ्याच्या काठावर बरचीच्या साह्याने चढणीचे मासे मारतात. मोठ्या प्रमाणात मासेमारी वाढल्याने या प्रजाती येत्या काही वर्षांत नष्ट होतील की काय, अशी शक्यता असल्याने आम्ही लोकांमध्ये जनजागृती सुरू केली.
मत्स्यबीजांसाठी हॅचरीची सोय ः
प्रमोद माळी यांनी गावशिवारात स्थानिक मत्स्य जातींच्या संवर्धनासाठी जनजागृती तसेच मत्स्यबीज संवर्धनासाठी हॅचरी तयार केली. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, की अलीकडे लोकांना स्थानिक मत्स्य जातींच्या संवर्धनाचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळे जेव्हा हे लोक मासेमारी करतात तेव्हा आम्हाला कळवतात. आम्ही लगेच मादी माशाच्या शरीरातील अंडी बाउलमध्ये गोळा करतो. तो मासा त्यांना परत देतो.
मादी माशांच्या बरोबरीने नर मासेदेखील सापडतात. या नर माशाचे वीर्य काढून ते बाउलमध्ये घेतलेल्या अंड्यांवर सोडले जाते. त्यामुळे पुढील ७२ तासांमध्ये त्यांचे फलन होऊन लहान पिले तयार होतात. या पिलांच्या संवर्धनासाठी पातेल्यामध्ये योग्य तापमान राखत नवजात पिल्लांसाठी ऑक्सिजन यंत्राने पुरवठा सुरू ठेवला जातो. या पातेल्यात पाच दिवस पिलांचे संगोपन केले जाते. वीज गेली तर ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ नये यासाठी आम्ही बॅटरीचा वापर करतो, परंतु पिलांची मरतूक होऊ देत नाही. मत्स्यबीज वाढीसाठी आम्ही प्रकल्पाच्या ठिकाणी तीन टाक्यांची हॅचरी तयार केली आहे.
सहाव्या दिवशी पातेल्यातील नवजात पिलांना हॅचरीमधील टाकीत वाढीसाठी सोडले जाते. या हॅचरीमध्ये तीन महिन्यांपर्यंत मत्स्यबीजांचे संगोपन केले जाते. त्यानंतर नदी किंवा ओढ्याच्या संरक्षित परिसरात सोडले जाते. आम्हाला स्थानिक मत्स्य प्रजातींच्या संवर्धनासाठी, तसेच शास्त्रीय पद्धतीने हॅचरी उभारण्यासाठी मत्स्य संवर्धन विभागाच्या सहकार्याची गरज आहे. यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.
...अशी आहे हॅचरी
१) प्रकल्प स्थळावर तीन आयताकृती खड्यांमध्ये प्लॅस्टिक कागद अंथरून टाक्यांची निर्मिती.
२) प्रत्येक टाकीत स्वतंत्रपणे कोळस, महासिर आणि मळवे प्रजातींच्या मत्स्यबीजांचे संगोपन.
३) गरजेनुसार पाणी बदल तसेच यंत्राद्वारे टाकीतील पाण्यात ऑक्सिजनचा पुरवठा.
४) मत्स्यबीजांना दररोज संतुलित खाद्य पुरवठा केल्याने जलद वाढ.
५) गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर या काळात नदी, ओढे धरण परिसरात २५,००० मत्स्यबीज सोडण्यात आले. या वर्षी एक लाख मत्स्यबीज संगोपन करून परत नदी, धरणामध्ये सोडण्याचे नियोजन.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.