Homemade Cake Processing: केक, चॉकलेट निर्मितीतून तयार झाली ओळख

Chocolate Business Story: पारंपरिक प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीपेक्षा शहरी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन परभणी येथील मनीषा रामचंद्र काळे यांनी केक, चॉकलेट, काजू कतली आदी उत्पादनांना घरगुती स्तरावर निर्मितीला सुरुवात केली.
Cake Business
Cake BusinessAgrowon
Published on
Updated on

Women Entrepreneur Startup Story: पारंपरिक प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीपेक्षा शहरी ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन परभणी येथील मनीषा रामचंद्र काळे यांनी केक, चॉकलेट, काजू कतली आदी उत्पादनांना घरगुती स्तरावर निर्मितीला सुरुवात केली. गुणवत्तापूर्ण घटकांचा वापर, पदार्थांना घरगुती चव यामुळे थेट ग्राहकांकडून उत्पादनांची खरेदी होते. प्रक्रिया उद्योगातून मनीषाताईंनी वेगळी ओळख तयार केली आहे.

परभणी येथील मनीषा रामचंद्र काळे यांनी बाजारपेठेचा अभ्यासकरून गृह उद्योगाच्या माध्यमातून केक, चॉकलेट, काजू कतली आदी उत्पादनांची निर्मिती आणि थेट ग्राहकांना विक्री सुरू केली. दर्जेदार घरगुती उत्पादनांना ग्राहकांची पसंती मिळाली आहे. या उद्योगात त्यांनी आश्‍वासक वाटचाल करत वेगळी ओळख निर्माण केली आहे. मनीषाताई यांचे माहेर किल्ले धारूर (जि. बीड) आहे. त्यांचे वडील डॉ. भगवानराव ठोंबरे हे वैद्यकीय व्यवसाय करतात, आई संजीवनी या गृहिणी आहेत.

मनीषाताई या एम.एम. (इंग्लिश) पदवीधर आहेत.१९९४ मध्ये एरंडेश्‍वर (ता. पूर्णा, जि. परभणी) येथील रामचंद्र काळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सुरुवातीला रामचंद्र काळे पूर्वी रायगड जिल्ह्यात एका खाजगी कारखान्यामध्ये नोकरीस होते.२००७ मध्ये काळे कुटुंब परभणी येथे स्थायिक झाले आहे. सध्या रामचंद्र सर्जिकल डीलर आहेत. एरंडेश्‍वर (ता. पूर्णा) येथे काळे कुटुंबाची दहा एकर शेती आहे. रामचंद्र यांचे बंधू लक्ष्मण काळे हे शेती व्यवस्थापन बघतात.

Cake Business
Women Farmer : महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतमालाची निर्यात प्रेरणादायी

मनीषाताई काळे यांना पूर्वीपासून विविध खाद्य पदार्थ निर्मितीची आवड आहे. पूर्वी त्या घरगुती वाढदिवस, समारंभ तसेच आवडीनुसार केक तयार करत असत. शेजारी, नातेवाइकांना या केक्सची चव पसंत पडली. अलीकडे जन्मदिन, लग्नाचे वाढदिवस साजरे करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घरगुती पद्धतीने तयार केलेले केक, चॉकलेट यांना मागणी आहे. आरोग्याच्या बाबतीत सजग झालेले नागरिकांकडून दर्जेदार आरोग्यदायी घरगुती उत्पादनांना मागणी वाढली आहे. हे लक्षात घेऊन मनीषाताईंनी प्रक्रिया उद्योगाला गती दिली.

प्रक्रिया उद्योगाला सुरुवात

शहरी बाजारपेठेची मागणी विचारात घेऊन मनीषाताईंनी केक,चॉकलेट्स निर्मितीचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपूर्वी भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरणाकडे त्यांनी अव्दैत फुडस् गृह उद्योगाची नोंदणी केली. पुणे येथे त्यांनी केक,चॉकलेट निर्मितीबाबत आठ दिवसांचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून केक,चॉकलेट निर्मितीचे कौशल्य शिकून घेतले. वीस हजार रुपयांची गुंतवणूक करत केक,चॉकलेट आदी निर्मितीसाठी आवश्यक साधन-सामग्री खरेदी करून घरामध्येच प्रक्रिया उद्योग सुरू केला.

ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादने

प्रक्रिया पदार्थ तयार करताना मनीषाताईंनी पहिल्यांदा बाजारपेठेतील उपलब्ध पदार्थ तसेच ग्राहकांची मागणी लक्षात घेतली. त्यानुसार त्यांनी केक, चॉकलेट, काजू कतली या उत्पादनांना सुरुवात केली. लहान मुले आणि ग्राहकांच्या मागणीनुसार मावा केक, टुटीफ्रुटी केक, चॉकलेट केक, ड्रायफ्रूट केक, शुगर फ्री केक निर्मितीला सुरुवात केली. मावा केक दूध, खवा, रबडीपासून बनविला जातो. टुटीफ्रुटी केकमध्ये रवा आणि टुटीफ्रुटी हे प्रमुख घटक असतात. चॉकलेट केकमध्ये गव्हाचे पीठ आणि कोको पावडरचा वापर केला जातो.

Cake Business
Women Agriculture Success Story: ऊस रोपवाटिकेत एका महिलेचे यश; सारिका लठ्ठे यांचा प्रेरणादायी प्रवास

शुगर फ्री हेल्दी केकमध्ये गहू आणि गूळ हे घटक वापरले जातात. ड्रायफ्रूट केकसाठी गव्हाचे पीठ, बदाम, काजू, मनुका, खजूर, अक्रोड आदीचा घटकांचा उपयोग केला जातो. मनीषाताई केकमध्ये अंडी आणि मैदा यांचा वापर करत नाहीत, त्याऐवजी गव्हाचे पीठ, घरच्या गाईचे दूध, दही, साखर, गूळ या घटकांचा वापर करतात. केक ५०० ग्रॅम आणि एक किलो वजनामध्ये तयार केला जातो. मागणीनुसार त्यापेक्षा जास्त वजनाचे केक बनवून दिले जातात. छोट्या आकाराचे कप केकचे वजन ८० ग्रॅम असते.

चॉकलेटमध्ये १८ प्रकार आहेत. यामध्ये प्रामुख्याने मिल्क चॉकलेट, गुलकंद चॉकलेट, टुटीफ्रुटी, डेट्‌स अॅन्ड नट्‌स, कुनाफा, बाउंटी बार, रस मलाई, पान चॉकलेट आदी प्रमुख प्रकार आहेत. मागील नऊ वर्षांपासून मनीषाताई खास दिवाळी सणाच्या काळात काजू कतली आणि बदाम कतली तयार करून विक्री करतात. पारंपरिक प्रक्रिया पदार्थांपेक्षा नावीन्यपूर्ण पदार्थांच्या निर्मितीवर त्यांचा भर आहे. केक निर्मितीसाठी गहू, दूध, तूप आदी घटक घरचेच वापरले जातात. बाजारातून चॉकलेटसाठी कोको पावडर आदी सामग्री, ड्रायफ्रूट, साखर खरेदी केली जाते. सेंद्रिय गूळ उत्पादकांकडून गूळ खरेदी केला जातो.

स्वत:ची विक्री व्यवस्था

मनीषाताई सुरुवातीला शेजारी, नातेवाईक आदींना मागणीनुसार केक बनवून देत असत. परभणी शहरात आयोजित महिला स्वयंसाह्यता गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी जिल्हास्तरीय प्रदर्शन,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये त्यांनी स्टॉल लावून उत्पादनांची विक्री सुरू केली.यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना केक तसेच चॉकलेट आदी उत्पादनाबद्दल माहिती झाली.

त्यामुळे मागणी वाढू लागली.शेतकरी, अधिकारी यासह इतर व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून दररोज मागणीनुसार केक, चॉकलेटची घरपोच विक्री केली जाते. याबरोबरीने घरातूनही विविध उत्पादनांची विक्री होत असते. प्रक्रिया उद्योग सुरू केल्यावर पहिले चार महिने कमी प्रतिसाद मिळत होता. परंतु आता क्रीम केकपेक्षा मैदा, अंडी विरहित केकसाठी मागणी वाढली आहे. सध्या दररोज चार केकची विक्री होते. महिनाभरात सरासरी ८० ते ९० केक्सची विक्री होते. केकच्या किमती प्रकारानुसार प्रति किलो ६०० ते ८०० रुपयापर्यंत आहेत.

प्रति दिन चॉकलेटच्या तीन बॉक्सची विक्री होते. साध्या चॉकलेटचे दर प्रति किलो एक हजार रुपये आणि तर डिझाइनर चॉकलेटचा दर प्रति किलो बाराशे रुपये आहे. पाउच पॅकिंगमध्ये १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, ५०० ग्रॅम वजनामध्ये चॉकलेट विक्री केली जाते. बॉक्स पॅकिंगमध्ये ६,१२,१८ नग यानुसार पॅकिंग तयार केले जाते. दरवर्षी दिवाळीच्या कालावधीमध्ये २५ किलो काजू कतली तसेच बदाम कतली विक्री होते.

केक्स, चॉकलेट बनविण्यासाठी मनीषाताईंकडे एका महिलेची मदतनीस आहे. तर घरपोच उत्पादने पोहोचविण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली आहे. प्रक्रिया उद्योगात पती रामचंद्र तसेच मुलगी गार्गी आणि मुलगा आदिनाथ यांची चांगली साथ मिळाली आहे. परभणी येथे आयोजित यशस्विनी महिला उद्योजिका संस्थेतर्फे आयोजित प्रदर्शनामध्ये मनीषा काळे यांचा उत्कृष्ट महिला उद्योजक म्हणून पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.

- मनीषा काळे ९४२३४२८०९३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com