
Agriculture Success Story : पुणे शहरापासून सुमारे ३५ किलोमीटरवर पुणे- सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी आहे. तेथील फाट्यापासून सात किलोमीटरवर आळंदी म्हातोबाची (ता. हवेली, जि. पुणे) हे छोटे गाव आहे. येथील विजय सुरेश जवळकर यांची साडेचार एकर शेती आहे.
येथून काही अंतरावरील प्रसिद्ध मल्हारगड दूरवरून खुणावत असल्याचा भास होतो. शेजारीच प्रसिद्ध भुलेश्वर डोंगर परिसर आहे. याच मल्हारगडाच्या पायथ्याशी जवळकरांचे एकूण क्षेत्रापैकी अडीच एकर क्षेत्र आहे. आई- वडिलांकडून चालत आलेला शेतीचा वारसा विजय नेटाने चालवत आहेत.
गॅरेज ते शेतीचा प्रवास
विजय यांनी १९९८ च्या सुमारास गॅरेज व्यवसायात पदार्पण केले. वाहतुकीच्या वाहनांची दुरुस्ती, देखभाल आदी ‘मेकॅनिकल’ कामे ते करीत. या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांची कामे त्यांना मिळत. जवळच्या उरुळीकांचन, लोणी काळभोर, हडपसर आदी भागांत खडतर अनुभव घेत या व्यवसायात त्यांनी कौशल्य हस्तगत केले. व्यवसायात कष्ट भरपूर होतेच. पण कामाच्या वेळा निश्चित नव्हत्या.
काहीवेळा रात्रीही वाहन दुरुस्तीची वेळ येई. त्यातून आरोग्याची हेळसांड होऊ लागली. प्रतिकारशक्ती कमजोर होऊ लागली. चिकनगुनिया, संधीवात जडला. त्यात भर म्हणून की काय स्वतः थाटलेल्या गॅरेजमध्ये आर्थिक नुकसानही झाले. अखेर सुमारे २२ वर्षांचा अनुभव पूर्ण करून २०२० च्या दरम्यान विजय यांनी सहकाऱ्याला गॅरेज हस्तांतरित केले.
या व्यवसायाला कायमचा रामराम ठोकला. पूर्णवेळ शेतीतच झोकून देण्याचे ठरवले. त्यातूनच आर्थिक, कौटुंबिक प्रगतीसह शरीराचे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याचा निश्चय केला. दरम्यान पंजाबातील ‘कॅन्सर ट्रेन’ आणि रासायनिक कीडनाशकांच्या अनियंत्रित वापराचे दुष्परिणाम याविषयी व्हिडिओ व अन्य माहिती मिळाली. शेती करायची तर सेंद्रियच ही खूणगाठ इथे पक्की झाली.
डोंगराळ क्षेत्रात शेतीची रचना
विजय यांच्या शेतीची रचना डोंगराळ असून जमीन हलकी, मुरमाड आहे. उताराच्या दिशेने ठरावीक अंतरावर थोड्या- थोड्या क्षेत्राचे टप्पे तयार केले आहेत. एका टप्प्यात आमराई तर दुसऱ्या टप्प्यात बहुविध पीक पद्धती साकारली आहे.
विजय यांनी सुरुवातीच्या काळात थोड्या- थोड्या क्षेत्रात विविध भाजीपाला केला. आठवडी बाजारांमध्ये छोटे व्यापारी, किरकोळ विक्रेते यांना देण्यासह स्वतः थेट विक्रीही केली. अलीकडील काळात मजूरटंचाई, शेतीची विभागणी अशी आव्हाने तयार झाल्याने कष्ट भरपूर वाढले आहेत.
त्या अनुषंगाने फळबाग केंद्रित शेतीला प्राधान्य दिले. बारामती कृषी विज्ञान केंद्रातून सव्वातीनशे रोपे आणून एकरभर क्षेत्रात जिद्द नावाने आमराई विकसित केली आहे. आजमितीला २९० पर्यंत झाडे असून, पैकी दोनशे केसर, तर उर्वरित बदामी व रायवळ आंब्याची झाडे आहेत.
...अशी आहे बहुविध पीक पद्धती
प्रत्येक पिकाची एक-दोन झाडे. यात शेवंती फुले, पेरू, पपई, सीताफळ, मोसंबी, नारळ, केळी, शेवगा, ॲव्होकॅडो, सफरचंद, बहाडोली व देशी जांभूळ, सीडलेस व कागदी लिंबू.
जागेचा पुरेपूर वापर होण्यासाठी फुलझाडांमध्ये मिरची, बीट रूट, राजमा.-एकूण शेतीत चंदनाची सुमारे १८० झाडे. पैकी बहुविध पद्धतीच्या प्लॉटमध्ये ८० झाडे. त्यांना होस्ट म्हणून आंब्याचा वापर. आमराईत देशी, सुगंधी कढीपत्ता.
काही ग्राहकांना सॅलेडमध्ये लाल चिंच लागते. मुलांना गोड चिंच आवडते. त्या दृष्टीने लाल, गोड स्वादाची व मोठ्या आकाराची अशा तीन प्रकारच्या चिंचेची लागवड.
शहाळ्यासाठी तसेच खोबरे व तेल या कारणांसाठी तीन प्रकारचे नारळ. यातील एक वाण केरळहून आणले आहे. आयुर्वेदिक वनस्पतींना वाढलेली मागणी लक्षात घेऊन गुळवेल व कोरफड लावला आहे. स्वतःची विक्री व्यवस्था असल्याने येत्या काळात कोरफडीची पाने ग्राहकांना देण्याचा प्रयत्न.
घरापुरते कांदा बीजोत्पादन व हरभरा.
डाळिंब लागवडीचे नियोजन.
स्वयंपूर्ण शेती
कृषी विभाग- आत्मा विभागातर्फे केरळ तसेच बदलापूर येथे नैसर्गिक- सेंद्रिय शेतीचे प्रगतिशील शेतकरी राजेंद्र भट यांच्या शेतात विजय यांनी दहा दिवसांचे निवासी प्रशिक्षण घेतले आहे. अशा विविध प्रशिक्षणांद्वारे नैसर्गिक- सेंद्रिय पध्दतीचा अंगीकार केला आहे. निंबोळी पेंड, करंज तेल अशा मोजक्या निविष्ठा वगळल्यास बहुतांश निविष्ठा (उदा. दशपर्णी अर्क, कडुनिंब अर्क, घन जिवामृत) ते शेतातच बनवितात.
दोन देशी गायी व वासरू आहे. त्यातून शेण-गोमूत्राची गरज पूर्ण होते. शेतातील तण- पालापाचोळा जागेवरच कुजवून त्याचे खत तयार केले जाते. त्यातून मातीतील सेंद्रिय कर्ब वाढण्याला चालना मिळत आहे. आमराईत मधमाश्यांचे पोळे तयार झाले आहे. रासायनिक कीडनाशकांचा न होणारा वापर हे त्याचे प्रतीक आहे.
स्वतःची उभारली विक्री व्यवस्था
केवळ शेवंती फुलांची गुलटेकडी बाजार समितीत विक्री होते. बाकी स्वतः थेट विक्रीचे उद्दिष्ट असल्याने थोड्या थोड्या क्षेत्रावरच प्रत्येक मालाचे उत्पादन घेण्याचे तंत्र स्वीकारले आहे. दोन- तीन वर्षांपासून सेंद्रिय- नैसर्गिक स्वादाच्या केसर आंब्याची थेट विक्री विजय करतात.
कृषी विभाग- आत्मा यांच्या वतीने त्यांना पुणे- कृषी भवन येथे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला. ‘सनबर्निंग’ किंवा अन्य कारणांमुळे फळांवर डाग येऊ नयेत झाडावरील प्रत्येक फळाला पॉलिथिन बॅगेचा वापर केला. त्यातून फळाची गुणवत्ता टिकवून मनासारखा दर मिळवला. तीन प्रकारात आंब्याचे ग्रेडिंग करून २८०, ३०० रुपयांपासून ४०० रुपये प्रति किलो दराने विक्री केली.
जिथे ‘एसटी डेपो’ तेथे आंबे
कृषी- आत्मा विभागाचे निवृत्त संचालक डॉ. दशरथ तांभाळे व अधिकारी क्रांती चौधरी यांच्यामुळे आंब्याला मुंबईचे ग्राहक मिळाले. नैसर्गिक- सेंद्रिय शेतीचे व्हॉट्सॲप, सोशल मीडिया ग्रुपद्वारे राज्यभरातील ग्राहकांकडून आंब्याला ऑर्डर्स मिळाल्या. जेथे एसटी डेपो तेथे जिद्द आमराई फार्ममधील आंबे असे ब्रीदवाक्यच तयार केले होते. पाच डझनाचा बॉक्स तयार करून कुरियरमार्फत ‘होम डिलिव्हरी’ दिली.
विजय भुदरगड शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य आहेत. त्या माध्यमातून देशभर व परदेशात आंबा निर्यातीचे उद्दिष्ट आहे. आंबा निर्यातीसाठी अपेडाकृत नोंदणी प्रमाणपत्रही त्यांनी मिळवले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, मंडळ कृषी अधिकारी गणेश धस, कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळुंजकर व कृषी सहायक सौ. सौरभ जाधव यांचे सहकार्य त्यांना लाभते.
सामाजिक कार्य
विजय यांनी १७ वेळा रक्तदान केले आहे. मृत्युपश्चात अवयवदान करण्याचाही त्यांचा मानस आहे. देवाची आळंदी येथील वारकरी संस्थेसाठी आपल्या आमराईतील पाच झाडे त्यांनी आजीवन दान देऊन सामाजिक दातृत्व निभावले आहे. त्या झाडांचा एकही आंबा ते स्वतःसाठी घेत नाही. पाचही झाडांचे आंबे दरवर्षी आळंदीला पुरवतात.
ऑक्सिजन पार्क उभारणार
विजय सांगतात, की अलीकडील काळात शहरी लोक घरी व वाहनांमध्ये ‘एसी’ लावून बसतात. वाहनांचे व अन्य वायूंचे प्रदूषणही खूप वाढले आहे. शुद्ध ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे पुढील काळात शहरी ग्राहकांसाठी आमराई व तुळशीच्या सान्निध्यात ऑक्सिजन पार्क उभारण्याचा मानस आहे. या पार्कमध्ये डीजे, त्यावर आधारित संगीत- नृत्य या बाबी असणार नाहीत. शहरी लोकांना खऱ्याखुऱ्या कृषी पर्यटनाचे समाधान, मनसोक्त आंबे व अन्य शेतीमाल प्रत्यक्ष बागेत खायला देण्याचा आनंद देणार असल्याचेही विजय म्हणाले.
असे समाधान कुठे मिळणार?
कोणताही मजूर न ठेवता विजय आणि पत्नी वर्षा असे दोघेच जण शेतात राबतात. शाळेत शिकणाऱ्या वैष्णवी आणि मनस्वी अशा गोंडस मुली त्यांना आहेत. शेतीतून सुखी-समाधानी असलेले त्यांचे कुटुंब आहे. विजय म्हणतात, की समाधान मानण्यावर असते. आज एक लाख रुपये मिळाले की मग दोन लाख, ते साध्य केले की चार लाख अशी अपेक्षा वाढत जाते. त्याला अंत नसतो. त्या धावपळीत आपण आरोग्य, मनःशांती हरवून बसतो.
आज सेंद्रिय पद्धतीत उत्पादन तुलनेने कमी असेल. पण रासायनिक खते, कीडनाशके यांच्यावरील १०० टक्के खर्च कमी केला आहे. मातीची सुपीकता वाढते आहे. कष्टांचे चीज होत असल्याचे समाधान आहे. बाहेरून शक्यतो काही आणावे लागत नाही. घरी खाण्यापुरता भाजीपाला, कांदा, लसूण, हरभरा वा अन्य माल पिकवून शेती स्वावलंबी केली आहे. येत्या काळात बहुतेक सर्व फळांचे बारमाही उत्पादन सुरू होऊन शाश्वत शेतीला बळकटी मिळणार आहे.
झाडाखाली शांत झोप लागते
पूर्वी गॅरेज व्यवसायात पैसा चांगला कमवीत होतो. पण जडलेल्या व्याधींवरील उपचारांसाठी महिन्याला खर्चही भरपूर व्हायचा. आज शेतीने व्याधींमधून बरे केले आहे. वयाच्या चव्वेचाळिशीत कोणतीही गोळी सुरू नाही. कसले व्यसन नाही. सकाळी सहाला शेतात जातो. संध्याकाळपर्यंत तिथे राबतो. झाडांच्या सान्निध्यात शुद्ध ऑक्सिजन व दुपारची शांत झोप घेता येते यापेक्षा दुसरे समाधान ते कसले? अशी आनंदी प्रतिक्रियाही विजय देतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.