
Agriculture Success Story : कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील केवल महावीर डुम (वय ३७) यांची घरची साडेपाच एकर वडिलोपार्जित बागायती शेती आहे. या भागातील शेतकऱ्यांप्रमाणे ऊस होते. त्यांचे प्रमुख पीक होते. बीकॉम केल्यानंतर त्यांनी ‘संगणक हार्डवेअर’चा अभ्यासक्रम पूर्ण केला. शेती असली तरी नोकरीच करायची असा विचार असल्याने शेतीकडे म्हणावे तसे लक्ष दिले नव्हते.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे गाठले. तेथे तीन वर्षे संगणक संबंधित कंपनीत तो नोकरीस लागले. त्या काळात घरची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली होती. अशावेळी केवल यांना पुण्याच्या नोकरीचा राजीनामा देऊन कायमस्वरूपी गाव गाठावे लागले. स्थानिक ठिकाणीही नोकरी केली. परंतु फारसा फायदा होत नसल्याने पाहून आपल्या शेतीकडेच अधिक लक्ष द्यायचे ठरविले.
प्रतिकूल परिस्थितीत शेतीस सुरुवात
खरे तर पूर्णवेळ शेती करावी लागेल याचा अंदाज नव्हता. त्यामुळे त्यातील अनुभवही नव्हता. परंतु वडील महावीर यांचा अनुभव, आई विमल, बहिणी ऊर्मिला व शर्मिला यांनी प्रोत्साहन व पाठबळ दिले. त्यामुळे शेतीचे शिवधनुष्य पेलता आले. हा काळ होता साधारण २०१६-१७ चा. गावातील प्रगतिशील शेतकरी व तज्ज्ञ मित्रांची मदत घेतली.
उसाव्यतिरिक्त ताजा पैसा मिळवून देणारे पीक म्हणून भाजीपाला घेण्यास सुरुवात कर, दररोज ताजी रक्कम हाती येईल असा सल्ला मिळाला. त्यातून एक एकर दोडका लागवडीचे धाडस केले. चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन व पाण्याची सोय यामुळे उत्पादन चांगल्या प्रकारे होणार अशी आशा होती.
तसा प्लॉटही तयार झाला होता. दरही चांगला म्हणजे ३५ रुपये प्रति किलो सुरू होता. मात्र उत्पन्नाचा श्रीगणेशा होण्यापूर्वीच नोटाबंदीचे संकट आले.३५ रुपये प्रति किलोचा दर वेगाने एक ते दोन रुपयांवर आला. हा केवळ आर्थिक धक्का नव्हता तर उमेदीलाच दणका होता.
जोखीम घेऊन पुढची संधी
पुढचे सहा महिने अतिशय हलाखीत गेले. हाताशी नोकरी नव्हती की रोजच्या खर्चासाठी हाती रक्कम नव्हती. नकारात्मक मानसिकता प्रबळ होत होती. परिणामी, घरातील शांतीही भंग होऊ लागली. अशा परिस्थितीतही धीर खचू दिला नाही. आणखी एक संधी घ्यायचे ठरविले. शेतीवर आठ लाखांचे कर्ज काढले.
पूर्ण भाजीपाला लागवड करण्याचा विचार बाजूला ठेवून आर्थिक स्थिरता देणाऱ्या उसाचा आधार घेतला. कर्जातून पैसा उपलब्ध झाल्याने २०१७ च्या उत्तरार्धात तीन एकरांत ऊस लागवड केली.
पण भाजीपाला लागवडीचा विचार पुन्हा डोके वर काढत होता. मग धोका पत्करून अर्ध्या एकरात कोबी व प्लॉवर यांची लागवड केलीच. पहिल्या वर्षी काही रक्कम हाती आल्याने स्थिरता येऊन उत्पन्न मिळेल. बॅंकेचे हप्ते फेडता येतील असे वाटत असताना पुन्हा एकदा नियतीने परीक्षा पाहिली.
महापुराने भंगले स्वप्न
पश्चिम महाराष्ट्रातील शेतीचे वैभव संपवू पाहणारा महापूर २०१९ मध्ये आला. जसे पाणी सरकत गेले तशी उसाची हिरवाई लोप पावत गेली. डोळ्यादेखत ऊस पूर्ण बुडून गेला. दीड एकर ऊस, अर्धा एकर कोबी-फ्लॉवरचे पीक डोळ्यादेखत पाण्याखाली गेले. उत्पन्नाचे इमले धडाधड कोसळले. पूर ओसरला पण नुकसानीच्या छटा कायम ठेवून गेला.
कुजलेल्या पीक अवशेषांबरोबर मन थिजत गेले. दोन वर्षे पुन्हा निराशेत काढली. नोकरीचाही प्रयत्न केला. पण त्यातही मन रमेना. दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा शेतात काही तरी करू असे विचार येऊ लागले. वर्गमित्र व शेतीतील तज्ज्ञांनी मोठा मानसिक आधार दिला. भाजीपाला पिकात मिळेल पैसा, तू पुन्हा प्रयत्न कर असा दिलासा दिला.
कोमेजू लागलेल्या मनाला पुन्हा आशेचे किरण सापडू लागले. पण परीक्षाही ठरलेलीच होती. सन २०२२ मध्ये पुन्हा महापूर आला. उन्हाळी हंगामातील टोमॅटोला चांगला दर मिळतो हे गृहीत धरून २०२३ ला लागवड केली. पण अति उन्हाळ्यातरोपे करपली. उत्पन्न सुरू होण्याआधीच नुकसान झाले.
जोमाने सुरुवात
या वेळी घरच्यांनी पुन्हा एकदा धीर दिला. केवल यांनी २०२४ मध्ये टोमॅटोऐवजी वांगी लावली. त्यातून चांगला फायदा देखील झाला. सन २०२४ मध्ये पुन्हा टोमॅटोचे नियोजन केले. या वेळी किलोला कमाल दर दोनशे रुपयांवर गेला होता. मात्र पूर्ण लक्ष पिकावरच केंद्रित व्हावे म्हणून क्षेत्र एक एकरामवरून अर्ध्या एकरांवरच आणले. अति उष्णतेत टोमॅटो पीक आलेच नाही. नुकसानीचा आलेख पुन्हा उंचावला.
बॅंकेतून थकबाकी असल्याची पत्रे, दूरध्वनी येत होते. पण पैसे भरणार कुठून हा प्रश्न निर्माण झाला. काही प्रमाणात ऊस असल्याने थोडी रक्कम येत होती. भाजीपाला घेतला तरच ताजा पैसा येणार हाच विचार डोक्यात होता.
मग उसाबरोबर भाजीपाल्याला प्राधान्य देऊन २०२५ मध्ये पुन्हा अर्धा एकर दोडका तर काकडी अर्धा एकर घेतली. आज दोन्ही पिके चांगल्या प्रकारे सुरू आहेत. काकडीचा दररोज ३०० ते ४०० किलो माल मिळत असून किलोला २५ ते ३० रुपये दर सुरू आहे. आतापर्यंत तीन- चार टन माल बेळगावला पाठवला आहे.
आशादायक वाटचाल
पूर्वीच्या अनुभवातून केवल डुम खूप काही शिकले आहेत. ते म्हणजे एकच भाजीपाला न घेता उसासाठी निम्मे क्षेत्र राखीव ठेऊन एकावेळी दोन ते तीन पिके घेण्याचे प्रयत्न आहेत. डोक्यावरचे कर्ज हलके करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. बापू जाधव, कीर्तिकुमार भोजकर यांच्यासह अन्य प्रगतिशील शेतकऱ्यांच्या संपर्कात केवल सातत्याने असतात. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने प्रतिकूल हवामानातही भाजीपाला टिकविण्याची कसरत सुरू आहे.
शेतवाटेवर संपूर्ण चिखल झाल्याने पंचवीस किलोचे भाजीपाल्याचे पॅकिंग एक- दीड किलोमीटर डोक्यावरून वाहून मुख्य रस्त्यावर आणावे लागते किंवा छोट्या वाहनाद्वारे वाहतूक करावी लागते. सध्या कोल्हापूरसह बेळगाव बाजारपेठेतही माल पाठवला जात आहे. दररोज शेतात सात ते आठ मजूर कार्यरत असतात.
पट्टणकोडोली हे या भागातील धार्मिक क्षेत्र असल्याने बिरोबा मंदिर परिसरात दररोज बाजार भरतो. भाजीपाला काढल्यानंतर तो सायंकाळी मंदिर परिसरात विक्रीसाठी आणतात. दररोज दोडक्याची सुमारे २५ किलो, काकडीची २० किलो, तर टोमॅटोची ४० किलोची विक्री होते. जनावरे नाहीत, उदरनिर्वाहाचे अन्य पर्याय नाहीत. हिंमत न हारता धैर्यातून शेतीची बिकट वाट सुकर करण्याचा निश्चय करून केवल यांची वाटचाल सुरू आहे.
- केवल डुम ९९७०९५१००८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.