
Agriculture Success Story : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा-आंबोली मार्गावर विलवडे (ता. सावंतवाडी) हे निसर्गाच्या कुशीत वसलेले सुमारे १३८० लोकवस्तीचे गाव आहे. या गावातून प्रसिद्ध तेरेखोल नदी वाहते. भात, नाचणी यांच्यासह फळपिकांमध्ये काजू ही इथली प्रमुख पिके आहेत. फळबाग लागवडीखाली प्रत्येक शेतकऱ्याकडे सरासरी दोन ते चार एकर तर भातशेतीखाली २० गुंठ्यांपासून चार पाच एकरांपर्यंत जमिनी आहेत.
गावातील शेतकरी पूर्वी बहुतांश खरीप हंगामाच शेती करायचे. त्यामुळे शेतीचे अर्थकारण मर्यादित स्वरूपाचे होते. शासनाने काही वर्षांपूर्वी उपसा सिंचन योजना गावासाठी मंजूर केली. यात ३० अश्वशक्तीचे दोन पंप तेरेखोल नदीवर बसविण्यात आले. योजनेच्या माध्यमातून गावातील १०० एकर क्षेत्र ओलिताखाली आले. खऱ्या अर्थाने गावात कृषिक्रांती तेव्हापासूनच सुरू झाली. त्यानंतर काही वर्षांनी विलवडे लघू सिंचन प्रकल्प उभारण्यात आला.
या योजनांच्या माध्यमातून कित्येक हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत झाली. योजना ५५ वर्षांपासून आजगायत सुरू आहे. या योजनेमुळे पाण्याची शाश्वती लाभली. त्यानंतर भौगोलिक रचना, जमिनीचा पोत, पाण्याची उपलब्धता आणि बाजारपेठा या मुद्यांच्या आधारे गावातील शेतीत बदल घडण्यास सुरुवात झाली. गावचे क्षेत्र ६४१ हेक्टर असून, पैकी ५२२ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली तर १०० एकर क्षेत्र ओलिताखाली आहे. सुमारे २२५ कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत.
भाजीपाला शेतीस चालना
आपल्या गावासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराघरांत पोहोचणारा भाजीपाला राज्याच्या अन्य भागांमधून येतो. तो आपल्याच गावातच पिकविला तर त्याबाबत स्वयंपूर्ण होऊ व अर्थकारणही वाढीस लागेल असा विचार इथल्या शेतकऱ्यांनी केला. त्यावर एकमत झाले. मग लाल माठ, मुळा, दोडका, पडवळ, काकडी, चिबुड, मिरची आदीचे उत्पादन घेण्यास सुरुवात झाली. गाव परिसरातील अन्य तरुण शेतकऱ्यांनाही त्याची प्रेरणा मिळाली.
उत्पादित भाजीपाल्याची विक्री सुरुवातीला गाव परिसरात व्हायची. पुढे नजीक असलेल्या बांदा, सावंतवाडी आदी बाजारपेठांमध्ये तो जाऊ लागला. सेंद्रिय पद्धतीवर भर देत तो पिकवला असल्याने ग्राहकांकडूनही मागणी वाढू लागली. आज गावातील शेतकऱ्यांना गोव्याची बाजारपेठही उपलब्ध झाली आहे. भाजीपाल्यासह कणगर, काकडी, कलिंगड यांना मोठी मागणी आहे.
शेतीतील प्रयोगशीलता
गोवा बाजारपेठेमध्ये कंदमुळांना अधिक मागणी असून, दरही चांगला मिळत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. मग काही शेतकऱ्यांनी कणगर लागवडीस प्रारंभ केला. टप्प्याटप्प्याने त्याखालील क्षेत्र वाढत गेले. बहुतांशी विक्री गोव्यातच होते. विलवडेतील काही शेतकरी सातत्याने शेतीत विविध प्रयोग करतात. काहींनी ड्रॅगनफ्रूटचा प्रयोग केला आहे. तर काहींनी व्हिएतनाम येथील फणसाच्या जातीची लागवड केली आहे. कुळीथ, कलिंगड, पपई ,केळी, नारळ, सुपारी, काजू, आंबा, कोकम अशी विविधता गावशिवारात दिसून येते.
गाव सुधारले, अर्थकारण उंचावले
शेतीतून अर्थकारण उंचावल्याने शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण करता आले. पॉवर टिलर, पॉवर विडर, ग्रास कटर, ट्रॅक्टर, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, पॅक हाउस आदी सुविधा गावशिवारात दिसून येतात. शासकीय अनुदानाचा आधारही झाला आहे. सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा लाभ घेतला आहे.
शेतीतून गावाची आर्थिक उलाढाल चार ते पाच कोटींपर्यंत पोहोचली आहे. तीस ते ३५ शेतकरी दुग्ध व्यवसायात गुंतले आहेत. दररोज १५० लिटरपर्यंत एकूण दूध संकलन होते. छत्रपती शिवाजी महाराज दूध संस्थेला त्याचा पुरवठा होतो.
विलवडे ग्रामपंचायतीला तंटामुक्त अभियान, हागणदारीमुक्त अभियान, निर्मल ग्राम आदी पुरस्कार मिळाले आहेत. कोकणातील बहुसंख्य तरुण नोकरीसाठी मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूरसह विविध शहरांकडे धाव घेत असतो. परंतु विलवडेतील युवा शेतकरी शेतीत स्थिरावतो आहे ही समाधानाची बाब आहे.
शेतीतून आली समृद्धी
गावातील प्रमोद दळवी प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना २०१५ चा शेतीनिष्ठ पुरस्कार लाभला आहे. ते म्हणतात, की भविष्याचा वेध घेऊन गावाने शेती, पीक पद्धतीत बदल केला आहे. माझे आजोबा सहदेव राघोबा दळवी यांनी ५० वर्षांपूर्वी ऊस शेतीचा प्रयोग केला. त्यावरच न थांबता गुऱ्हाळ सुरू केले.
आम्हीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून प्रयोगशील झालो आहोत. आमचे एकत्रित कुटुंब असून तीस एकर शेती कसतो. त्यात काजू, नारळ, सुपारी, काकडी, केळी, कलिंगड आदी पिके घेतो. शेतीतूनच दुमजली घर बांधले. टेम्पो, चारचाकी व दुचाकी वाहने खरेदी केली. कुटुंबातील सर्व मुलांना चांगले शिक्षण देत आहोत.
प्रकाश राजाराम दळवी ९४०४२९५८७८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.