
माणिक रासवे
Smart Farming Strategy: मिरखेल (ता.जि. परभणी) येथील अल्पभूधारक शेतकरी राजाराम धामणे यांनी उत्पादक आणि विक्रेता अशी दुहेरी भूमिका निभावत भाजीपाला शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर केली आहे. पाच एकरांपैकी एक एकर क्षेत्र त्यांनी भाजीपाला पिकांसाठी राखीव ठेवले. त्यात ते वर्षभर विविध भाज्यांचे उत्पादन घेतात. अत्यंत संघर्षातून, कष्टांमधून त्यांनी आपले कौटुंबिक जीवन आनंदी, सुखी ठेवले आहे.
परभणी शहरापासून १५ किलोमीटरवर मिरखेल (ता. जि. परभणी) हे भाजीपाला उत्पादक गाव म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात हे गाव येते. कालव्यास आवर्तने सोडली जातात, त्या वेळी सिंचन स्रोतांना मुबलक पाणी उपलब्ध असते. परभणी शहर काही किलोमीटरवर असल्याने गावातील अनेक अल्पभूधारक व मध्यम शेतकरी पाण्याच्या उपलब्धतेनुसार वर्षातील बाराही महिने विविध भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात.
धामणे यांची भाजीपाला शेती
राजाराम नामदेवराव धामणे हे गावातील अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांची पाच एकर शेती आहे. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. कोरडवाहू शेतीतून उत्पन्न मिळत नसे. त्यामुळे सातवीनंतर शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागले. घराला आर्थिक आधार देण्यासाठी तीन वर्षे ते सालगडी म्हणून राबले. आई गयाबाई आणि वडील नामदेवराव यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्यासोबत ते घरची शेती विकसित करू लागले.
बोअरवेल खोदून शाश्वत ओलिताची सुविधा तयार केली. आज पाच एकरांपैकी एक एकर क्षेत्र त्यांनी भाजीपाला पिकांसाठी राखीव ठेवले आहे. त्यात बारमाही वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला ते घेतात. अन्य क्षेत्रात सोयाबीन, हरभरा, ज्वारी, गहू अशी हंगामी पिके असतात.
शेतीतील संघर्ष
आज सिंचनासाठी बोअरची व्यवस्था आहे. अलीकडेच सौर कृषिपंप बसविला आहे. आता दिवसभर अखंडित वीजपुरवठा होत असल्याने सिंचनात अडथळे येत नाहीत. शेती गावापासून दोन किलोमीटरवर आहे. शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. शिवाय वाटेतील ओढ्यावर पूल नाही. ओढ्याच्या पाण्यातून डोक्यावरून भाजीपाला वाहतूक करणे खूप अडचणीचे होते. त्यामुळे प्रामुख्याने हिवाळी व उन्हाळी हंगामातील भाजीपाला उत्पादनावरच भर आहे. गावापासून दूरच्या ओबडधोबड रस्त्याने अडीच ते तीन किलोमीटर अंतर पार करून दररोज मोटरसायकलवर भाज्यांचे क्रेट बांधून शेतातून घरी भाजीपाला आणतात.
शेतीतील नियोजन
दीर्घ काळापासून भाजीपाला उत्पादनाचा अनुभव तयार झाल्याने व थेट विक्री करीत असल्याने बाजारपेठांचाही सखोल अभ्यास व आकलन झाले आहे. त्यानुसार कोणत्या हंगामात कोणती भाजी किती क्षेत्रात घ्यावी याचा पक्का अंदाज आला आहे. त्यानुसार थोड्या थोड्या गुंठ्यात वांगी, टोमॅटो, दोडका, दुधी भोपळा, देवडांगर,काशीफळ आदी शेतमाल घेण्यात येतो. त्यास शेवंतीच्या फुलशेतीची जोड दिली आहे.
पिकाच्या निवडीनुसार गादीवाफे असतात. त्याला ठिबक सिंचनाची सोय असते. वेलवर्गीय पिकांसाठी बांबू आणि तारांचा मांडव तयार करून त्यावर त्याचे वेल सोडण्यात येतात. प्रातिनिधिक उत्पादन सांगायचे, तर २० गुंठ्यांत वांग्याचे सरासरी ५० ते ६० क्विंटल उत्पादन मिळते. सध्या दररोज १० गुंठ्यांवरील वांग्याचा तोडा सुरू आहे. प्रति दिन ४० किलो उत्पादन मिळत आहे.
दुधी भोपळा, देवडांगर यांचे उपलब्ध क्षेत्रात ७ ते ८ क्विंटल उत्पादन मिळते. दोडक्याचे दररोज १० किलोपर्यंत उत्पादन मिळते. विक्रीसाठी नेण्याच्या आदल्या दिवशी भाजीपाला काढणी केली जाते. सायंकाळी स्वच्छता व प्रतवारी केली जाते. माल सुकून जाऊ नये म्हणून तागाच्या पिशव्या क्रेटमध्ये भरल्या जातात. त्यामुळे भाज्यांचा दर्जा टिकून राहतो. ताजेपणामुळे ग्राहक आकर्षित होतात. त्यातून दरही चांगले मिळतात.
थेट ग्राहक जोडले गेले
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वसमत रस्त्यावरील प्रवेशद्वाराजवळ दररोज सकाळी सहा ते दहा या वेळेत भाजीपाला बाजार भरतो. परिसरातील गावांमधील शेतकरी आपला शेतीमाल येथे विक्रीसाठी आणतात. त्यांना येथे थेट ग्राहकांना विक्री करता येते. राजाराम देखील दररोज या ठिकाणी बसून आपल्या भाज्यांची विक्री करतात. दर्जेदार व ताजा वैविध्यपूर्ण भाजीपाला मिळत असल्यामुळे अनेक वर्षांपासून परभणी शहरातील ग्राहक राजाराम यांच्याशी जोडले गेले आहेत.
मिरखेल गाव परभणीपासून सुमारे १५ किलोमीटरवर आहे. मात्र शेतात स्वतः राबणे, काढणी करणे, माल क्रेटमध्ये भरणे व मोटसायकलवरून तो बाजारपेठेत दररोज वाहून आणणे असा रोजचा संघर्ष राजाराम अथकपणे करीत असतात. प्रत्येक भाजी २० किलो या दराने दररोज किमान पाच ते सहा भाज्या म्हणजे एक क्विंटलहून अधिक मालाची वाहतूक राजाराम यांना करावी लागते.
उन्हाळ्यामध्ये लग्नसमारंभ अधिक असतात. अशावेळी विशिष्ट भाज्यांचा जास्त उठाव होतो. काही वेळा दिवसाला चार हजार रुपये मिळकत होते. तर काही वेळा ती कशीबशी एक हजार रुपयांच्या दरम्यान होते. राजाराम सांगतात, की थेट विक्रीमुळे उत्पन्नात दीड पट ते दुपटीने वाढ होते. उदाहरण द्यायचे तर बाजारात व्यापारी वांग्याला किलोला पाच ते १० रुपयेच दर देतो. त्या तुलनेत थेट विक्रीत ग्राहकांना हेच वांगे २० रुपये दराने विकता येते.
सध्या दुधी भोपळा प्रति नग १० रुपये, तर देवडांगरची किलोला १५ ते २० रुपये दराने विक्री होत आहे. काशीफळाला प्रति किलो २० रुपये, तर दोडक्याला प्रति किलो ४० रुपये दर मिळत आहे. खर्च आणि उत्पन्न यांचा ताळेबंद काढल्यास ५० टक्के नफा मिळतो. काही वेळा नफ्याचे प्रमाण अगदीच नगण्य राहते. मात्र कष्टाला पर्याय नसल्याचे राजाराम सांगतात.
शेतीतून साधली प्रगती
राजाराम यांना शेतीत पत्नी निर्मला यांची समर्थ साथ आहे. म्हणूनच शेतीचा भार हलका झाला आहे. शेतीतूनच या दांपत्याने अर्थकारण उंचावले. चांगले पक्के घर बांधले. ठिबक, तुषार सिंचन, पाइपलाइन आदी सुविधा तयार केल्या. मुलांना उच्चशिक्षण दिले. सध्या मुलगी अंजली फूड टेक्नॉलॉजी विषयात परभणी येथे बी टेकचे शिक्षण घेत आहे. तर मुलगा माणिक देखील याच शहरात अकरावीचे शिक्षण घेत आहे. राजाराम यांच्या काकी सीताबाई धामणे या देखील भाजीपाला तोडणीची कामे करतात.
राजाराम धामणे ७२४९२४३८९७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.