
Agriculture Success Story : सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुका वगळता बहुतेक सर्वच तालुक्यांत उसाचे पीक घेतले जाते. यांत्रिकीकरण, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी ऊस उत्पादकतेत वाढ नेली आहे. कोरेगाव तालुक्यातील एकसळ येथील माजी सैनिक पांडुरंग अंकुश भोसले हे त्यापैकी एक होत.
अकरावीला असतानाच १९९९ मध्ये ते भारतीय सैन्यात भरती झाले. त्या वेळी वडील एसटी खात्यात नोकरी होते. कुटुंबास अवघी दीड एकर जिरायती शेती होती. पांडुरंग यांना शेतीचा नाद लहानपणापासून होता. मुलगा नोकरीस लागल्यानंतर वडिलांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
शेतीचा विकास
सैन्यदलात सेवा बजावताना सन २०१०-११ मध्ये शांतीसेनेच्या रूपाने इस्राईल येथे जाण्याचा योग पांडुरंग यांना आला. तेथील शेतीतील तंत्रज्ञान व प्रगती पाहून ते प्रभावित झाले. आपणही अशी शेती करावी असे त्यांना मनोमनी वाटू लागले. त्या वेळी उत्पन्नातील शिलकी रकमेतून त्यांनी २०११ मध्ये गावात दोन एकर शेती खरेदी केली.
बोअरवेल, पाइपलाइन सुविधा करून क्षेत्र बागायत केले. सन २०१३ मध्ये एक एकर क्षेत्रात आले पीक घेतले. नवी जमीन, कष्ट. तंत्रज्ञान यांचा मेळ घालत त्या वेळी एकरी २५ गाड्या (प्रति गाडी ५०० किलो) उत्पादन मिळाले.
प्रति गाडी उच्चांकी ६० हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. उत्पन्नही घसघशीत मिळाले होते. सन २०१४ मध्येही दोन एकर जमीन खरेदी केली. आता एकूण सुमारे एकूण साडेसहा ते सात एकर जमीन मालकीची झाली. नवी विहीर, पाइपलाइनद्वारे हे सर्व क्षेत्र बागायती केले.
पूर्णवेळ प्रयोगशील शेती
सन २०१८ मध्ये पांडुरंग यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ शेतीत झोकून दिले. ऊस हे प्रमुख पीक ठेवले. त्याची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न व प्रयोग सुरू केले. जमिनीचा पोत वाढवणे, रासायनिक खतांवरील खर्च कमी करणे, लागवड अंतरात बदल करणे, ठिबक सिंचन, आंतरपिके, बेणेमळा व सुपरकेन नर्सरी या बाबींवर भर दिला.
पांडुरंग यांनी घेवडा व ऊस अशी पीकपद्धती मागील चार वर्षांपासून कायम ठेवली आहेत. एप्रिलमध्ये मशागत करून शेत तयार केले जाते. मेमध्ये चार फुटी गादीवाफा (बेड) तयार केला जातो. त्यावरील दोन ओळींमध्ये दोन बियांत नऊ इंच अंतर ठेवून घेवड्याची टोकण केली जाते.
ओल्या घेवड्याचे दोन- तीन तोडे केले जातात. सुमारे ५० दिवसांत घेवडा तोडणीस येतो. ६५ दिवसांपर्यंत पीक संपायला येते. त्या काळात एक आठवड्यापूर्वी सरीत उसाच्यारोपांची लागवड केली जाते. काढणीवेळी घेवड्याचा पाला देखील जमिनीवर पडत असतो. त्याचा सरीत वापर होतो.
ऊस शेतीतील महत्त्वाच्या बाबी
दहा जूनच्या दरम्यान सुपरकेन नर्सरी तयार केली जाते. त्यासाठी घरचाच बेणेमळा असतो. बेणे लावण्यापूर्वी त्यास प्रक्रिया केली जाते. को ८६०३२ ऊस वाणाचा वापर होतो. महिन्यातून एकदा जिवामृत त्याबरोबर जिवाणू खते दिली जातात.
हुमणी नियंत्रणासाठी जूनमध्ये मेटॅरायझियम या बुरशीजन्य कीटकनाशकाचा एकरी दोन लिटर याप्रमाणे वापर होतो. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील उत्पादनांचा तेथील तज्ज्ञांच्या सल्ल्याने तर पाचट कुजवण्याठी वेस्ट डी कंपोजरचा वापर होतो. प्रत्येक क्षेत्राचे तीन वर्षांतून एकदा माती परीक्षण केले जाते. अहवालानुसार खतांचा वापर होतो.
सन २०१२ पासून पाचट कुट्टी केली जाते. कोणत्याही परिस्थितीत पाचट पेटवले जात नाही. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढावा यासाठी तीन वर्षातून एकदा कुजलेल्या शेणखताचा वापर होतो. जमिनीची फेरपालट केली जाते. त्यासाठी खोडवा ऊस तुटून गेल्यानंतर पाचट कुट्टी करून रोटर मारला जातो. त्यानंतर द्विदल धान्यांची लागवड करून ४५ ते ५० दिवसांनी ती शेतात गाडली जातात.
शेताच्या बांधामधून पावसाचे अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज पाइपचा वापर केला आहे. वेळेत खते- कीडनाशके देण्याच्या दृष्टीने शेतात छोटी खोली बांधली असून, त्यामध्ये सर्व निविष्ठा सज्ज ठेवल्या आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची शेतीत साथ असते. व्हीएसआय, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, कृषी विभाग, सहायक कृषी अधिकारी धनाजी फडतरे यांचे सहकार्य होते.
उत्पादन, अर्थकारण
पांडुरंग यांनी लागवड अंतराचे प्रयोग केले. यात साडेचार बाय दोन फूट अंतराच्या लागवडीत एकरी ९० ते ९५ टनांपर्यंत उत्पादन मिळाले. पाच बाय दोन फूट अंतराने दोन वर्षांपूर्वी एकरी १२० टनांपर्यंत, तर खोडव्याचे ७० टनांपर्यंत उत्पादन घेण्यापर्यंत मजल मारली. आता तीस गुंठ्यांत आठ बाय सव्वा फूट असे लागवडीचे अंतर ठेवले असून, एकरी १५० टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
उसासाठी एकरी ९० हजार ते एक लाख रुपये तर खोडव्यासाठी ५० ते ६० हजार रुपये भांडवली खर्च येतो. घेवड्याचे एकरी सरासरी अडीच ते तीन टन उत्पादन मिळते. मागील तीन वर्षांत ४० ते ५० रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. या वर्षी दरांत सुधारणा झाली असून ७० ते ९० रुपयापर्यंत दर मिळाला आहे. घेवडा पिकामुळे उसातील बहुतांश खर्च कमी होतो. यावर्षी तीन एकरांवर घेवड्याची लागवड केली आहे.
पांडुरंग भोसले ७९७२१८८०८४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.