
Rural Entrepreneurship Success Story : अमरावती जिल्ह्यातील रामापूर (ता. अचलपूर) येथील संतोष नांदूरकर यांच्याकडे २५ एकर शेती होती. बहुतांश क्षेत्रावर असलेल्या संत्रा लागवडीतून अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. त्यातून शेतीची कामे आणि कुटुंबाच्या गरजा भागविण्याइतकेही उत्पन्न मिळत नसल्याने बॅंकाकडून व काही प्रमाणात खासगी कर्ज घ्यावे लागले. तरीही उत्पन्नाचा ताळमेळ न बसल्याने कर्जाची व त्यावरील व्याजाची परतफेड शक्य होईना. थकीत कर्जाच्या वसुलीचा तगादा सुरू झाला.
कोणताही पर्याय न राहिल्याने १३ एकर शेती विकण्याचा कटू निर्णय घ्यावा लागला. तोपर्यंत त्यांची आयुष आणि अनिमेश ही मुले मोठी होत होती. त्यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी परतवाडा या तालुक्याचे ठिकाणी मुलांना ठेवायचे ठरले.
भाडेतत्त्वावर घर घेण्याऐवजी घराची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी चार एकर शेती विकली. या साऱ्या प्रक्रियेमध्ये मुलानेही स्पर्धा परीक्षेची तयारी सोडून व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण (एमबीए) घेण्याचा निर्णय घेतला. खरेतर कुटुंबाची शेती जपायची, वाढवायची, पण जमीन विकावी लागत असल्याचे अपयश व शल्य मोठे होते.
दोन पूरक व्यवसायातही अजमावले नशीब
शेतीतील अपयशाची भरपाई करण्याच्या उद्देशाने संतोष यांनी प्रथम दुधाळ जनावरांच्या संगोपनाचा निर्णय घेतला. त्याविषयी सांगताना संतोष म्हणाले की, शेड उभारून २० जर्सी गाईंचे पालन सुरू केले. १०० लिटर दुधाचे उत्पादनही सुरू झाले. मात्र पहाटेपासून जनावरांचे संगोपन, पशुखाद्यासह विविध निविष्ठांचे नियोजन आणि दुधाची विक्री व्यवस्था अशा सर्व आघाडीवर एकट्याला खिंड लढवणे शक्य होईना.
त्याला दुधाच्या दरातील चढउतार आणि पशुखाद्याचे वाढत चाललेले दर यामुळे नफ्याचे प्रमाण कमी होत चालले होते. पुन्हा एकदा या व्यवसायातील बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर त्यांनी थोडा खर्च करत गावरान कुक्कुटपालन सुरू केले. परंतु शिवार जंगलालगत असून, वन्य प्राण्यांसोबत चोरांकडूनही कोंबड्या पळवल्या जात असल्याने वैताग वाढला. परिणामी हा व्यवसायदेखील गुंडाळावा लागला.
शेळीपालनातून यशाकडे...
दोन दोन व्यवसायामध्ये अपयशी ठरल्यानंतरही हिंमत न हारता संतोष यांची धडपड सुरूच होती. २०२० मध्ये शेळीपालनाचा निर्णय घेतला. राजस्थानातील हनुमानगढ, श्रीगंगानगर या भागातून बिटलच्या जातिवंत शेळ्यांची खरेदी करण्यात आली. सुरुवातीला दहा शेळ्या तसेच दोन बोकड खरेदी केले.
त्यातील एका बोकडाचे नावाचे शंभु असून त्यांची उंची ४८ इंच आहे. त्याची खरेदी २ लाख ५० हजार रुपयांना करण्यात आली. जातिवंत बोकडापासून मिळणाऱ्या पिल्लांनाही चांगली किंमत मिळते. ही शेळी जात देखणी, दणकट आणि उंच असते. त्यांना मागणी आणि दरही अधिक मिळतो. हळूहळू जम बसत गेल्याने त्यांचा ‘विदर्भ गोट फार्म’ नावारूपाला आला.
असे उभारले शेड
शेळ्यांच्या संरक्षण आणि संगोपनासाठी ९० बाय ५० फूट आकाराचे मुक्त जाळीदार कुंपण केले आहे. त्यावर सुमारे सहा लाख रुपये खर्च झाले. या जाळीदार शेडमध्ये तीन भाग केले आहेत. एका क्षेत्रात विक्रीसाठी योग्य असलेले शेळ्या आणि बोकड ठेवले जातात. दुसऱ्या भागात लहान पिल्लांची सोय केली आहे. तर तिसऱ्या भागात गर्भवती व माता शेळ्या ठेवल्या जातात.
असे होते व्यवस्थापन
पिल्लांसाठी ६० माता शेळ्या कायमस्वरूपी ठेवल्या जातात. एकदा पिल्ले दिल्यानंतर सहा महिन्यापर्यंत त्या गर्भार राहू नयेत, याची काळजी घेतली जाते. ६० शेळ्यांपासून प्रत्येकी दोन याप्रमाणे सरासरी १२० पिल्ले मिळतात. त्यातील २० पिल्लांची काही कारणाने मरतूक गृहित धरली तरी १०० पिल्ले राहतात.
पिल्लांच्या जन्मानंतर त्यांच्या खाद्यांचे योग्य व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे जन्मावेळी असलेले पाच ते सहा किलो वजन तीन महिन्यात २५ ते ३० किलोपर्यंत वाढते. बिटल जातीची शेळी प्रौढ होईतो सरासरी ७० ते ८० किलोची, तर बोकड १०० ते १५० किलोपर्यंत वजनाची होतात.
चारा व पाण्याची सोय
शंभरपेक्षा अधिक शेळ्यांच्या चाऱ्यासाठी त्यांनी सहा एकर क्षेत्रामध्ये रेड नेपीयर, स्मार्ट नेपीयर, तुती, सुबाभूळ, शेवरी आणि मका अशा चारा पिकांची लागवड केली आहे. त्याच प्रमाणे वाळलेला चारा म्हणून तूर आणि हरभरा कुटार यांचा वापर केला जातो. हे खाद्य प्रती ट्रॉली चार ते पाच हजार रुपयात विकत घेतले जाते.
हिरवा चारा आणि वाळलेल्या चारा यांना पौष्टिक खाद्याचीही जोड दिली जाते. त्यामुळे त्यांचे वजन योग्य काळात वाढत असल्याचे संतोष सांगतात. सर्व जनावरांच्या पाण्याच्या सोयीसाठी एक बोअरवेल आहे. तिन्ही विभागांमध्ये शेळ्यांना प्लॅस्टिकच्या टोपल्यांद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध केले आहे.
अशी आहे बाजारपेठ
सामाजिक माध्यमावरून गोट फार्मचा प्रचार व प्रसार करत विक्रीचे नियोजन केले आहे. त्यांचे बहुतांश खरेदीदार थेट ‘विदर्भ गोट फार्म’वरून खरेदी करतात. चार ते पाच महिन्याच्या पिल्लाची विक्री ३० ते ५० हजार रुपयांत होते. दोन दाताचा बोकड ७० हजाराला, तर चार दाताचा बोकड दीड लाख रुपयांपर्यंत विकला जातो.
जातिवंत बिटल बोकडाला त्यांच्या उंचपुऱ्या व देखण्या रूपामुळे आणि ईद सारख्या सणांना मोठी मागणी असते. विक्रीसाठी वेगाने वजन वाढावे, म्हणून बोकडाचे खच्चीकरण केले जाते. त्यामुळे बोकड दीड ते अडीच क्विंटल वजनापर्यंत वाढतो.
मात्र पैदाशीसाठी काही शेतकरी बोकड व शेळ्या मागतात. दरवर्षी अशा सुमारे ३५ ते ४० जातिवंत शेळ्या व मोजक्या बोकडांच्या विक्रीतून ३५ ते ४० लाख रुपये मिळतात. यातून खर्च वजा जाता १५ ते २० लाख रुपयांचा नफा शिल्लक राहतो. यातून त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सावरले आहे. पूर्वीचे सारे अपयश विसरत नव्या जोमाने काम करत असल्याचे संतोष सांगतात.
संतोष नांदूरकर ७७९८०९७४२६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.