Goat Farming: शेळीपालनात तयार झाली नवी ओळख

Business Success Story: गुगळवाड (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील महिलांनी ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून प्रेरणा महिला उत्पादक गट तयार केला. या माध्यमातून व्यावसायिक पद्धतीने शेळीपालन आणि प्रक्रिया उत्पादनांच्या निर्मितीला सुरुवात केली. याचबरोबरीने सेंद्रिय शेतीला देखील गती दिली आहे.
Prerna Women Producers Group
Prerna Women Producers GroupAgrowon
Published on
Updated on

Women Entrepreneurs India: मालेगाव तालुक्यातील गुगुळवाड हा दुष्काळी पट्टा. गावशिवारातील महिलांना रोजगारासाठी शेतीकामाशिवाय दुसऱ्या पर्यायांची उपलब्धता अत्यंत कमी; मात्र महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) माध्यमातून महिलांना उपजीविकेच्या संधी उमगल्या. त्यातूनच २०१७ साली साईकृपा महिला समूहाची स्थापना झाली. पुढील टप्प्यात सावित्री महिला ग्रामसंघ तयार झाला. त्या वेळी अवघ्या १२ महिला होत्या. पुढे महिलांनी व्यावसायिक बाजू अभ्यासून प्रेरणा महिला उत्पादक गट तयार केला.

या गटात १७ सदस्या आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात १,१०० रुपये प्रति सदस्य स्वहिस्सा जमा झाला. हे भांडवल जमा करून सुरुवातीपासून बँकेत व्यवहार ठेवल्याने आर्थिक व्यवहारामध्ये शिस्त लागली. या वाटचालीत मालेगाव पंचायत समितीअंतर्गत ‘उमेद’अभियानाचे तालुका अभियान समन्वयक नीलेश मानकर यांच्या मार्गदर्शनामुळे दिशा मिळाली. सुरुवातीच्या टप्प्यात शेळीपालन हा व्यवसाय निवडण्यात आला. त्यातूनच वाटचाल सुरू होऊन महिलांच्या इच्छाशक्तीने परिवर्तन घडले.

Prerna Women Producers Group
Goat Farming : आजोबांनी दिली शेळी अन् झाले धन

शेळीपालनाला चालना

पाच वर्षांपूर्वी गटातील अल्पभूधारक व भूमिहीन महिला सदस्यांचे एकविचाराने काम सुरू झाले. शेळीपालनासाठी सुरुवातीच्या टप्प्यात दोन लाख रुपये कर्ज घेऊन गटाने २० शेळ्या खरेदी केल्या. त्या वेळी एकत्रित पद्धतीने संगोपन केले जायचे. बोकड विक्रीतून गटाने एका वर्षात कर्ज फेडले. त्यानंतर महिलांनी स्वतंत्रपणे कौटुंबिक पातळीवर शेळीपालनास सुरुवात केली. प्रत्येकीकडे तीन ते चार शेळ्यांचे संगोपन होते.

२०२१ मध्ये मंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय उद्योजकता विकास संस्था (अहमदाबाद) यांच्या माध्यमातून ‘शेळीपालन संगोपन व संधी’ याबाबत प्रशिक्षण घेतले. यामध्ये शेळ्यांचे संगोपन, आरोग्य व खाद्य व्यवस्थापन, दूध मूल्यवर्धन आणि उत्पादन विकासाबाबत मार्गदर्शन मिळाले. त्यातूनच बाजारपेठ, ग्राहकाची मागणीअभ्यासून शेळी दुधापासून साबण उत्पादनास सुरुवात केली.

सेंद्रिय शेतीचा अवलंब

बचत गटातील महिला अल्पभूधारक तर काही भूमिहीन आहेत. बचत गटांच्या माध्यमातून प्रगती साधत काही सदस्यांनी शेतजमीन विकत घेतली. गटाने रसायन अवशेषमुक्त शेतीमाल उत्पादनासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. गटातर्फे जिवामृत, दशपर्णी अर्क, गांडूळ खत निर्मिती केली जात आहे. मागील वर्षी गटातर्फे ५०० लिटर जिवामृत, दशपर्णी अर्क निर्मिती करण्यात आली होती. ही उत्पादने स्वतः सदस्य विकत घेतात तसेच मागणीनुसार शेतकऱ्यांना विक्री करतात. जिवामृत ८० रुपये लिटर, दशपर्णी अर्क ९५ रुपये लिटर, डी कम्पोझर ४० रुपये लिटर आणि गांडूळ खत १० रुपये किलो जागेवर तर बाहेर विक्रीसाठी २० रुपये किलो असा दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रास्त दरात सेंद्रिय निविष्ठांची उपलब्धता होते. यातून गटाची उत्पन्नवाढ झाली आहे. गटाने निविष्ठा विक्रीतून एक लाखांपर्यंत उलाढाल केली आहे. आगामी काळात कृषी विभागाकडे सेंद्रिय शेती गट नोंदणी प्रस्तावित आहे.

Prerna Women Producers Group
Goat Farming: शेळीपालन उद्योगातील संधी

साबण विक्रीतून मोठी उलाढाल

गटातील महिलांकडे तीसहून अधिक शेळ्या आहेत. साबणनिर्मितीसाठी सदस्यांकडून प्रतिलिटर ६० रुपये प्रमाणे शेळीचे दूध खरेदी केले जाते. दूध कमी पडल्यास बाहेरून खरेदी केली जाते. या दुधापासून दररोज सरासरी ३०० साबणांचे उत्पादन होते. गटाने वर्षाला एक लाख नग साबण उत्पादनाचा आकडा गाठला आहे. गुलाब, मोगरा आणि चंदन अशा तीन सुवासांच्या साबणांची निर्मिती केली जाते. साबणाची विक्री प्रदर्शन स्टॉल आणि परिसरातील बाजारपेठेत केली जाते. यासह नाशिकसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नंदुरबार येथील प्रदर्शनात गटातील

महिला सहभागी होऊन साबणाची विक्री करतात. गेल्या चार वर्षात ग्राहकांची साखळी जोडल्याने विक्रीव्यवस्था सक्षम झाली आहे. ग्राहकांना कुरिअरमार्फत उत्पादने पाठवली जातात.

५० ग्रॅम साबण ४० रुपये आणि १०० ग्रॅम

साबणाची ८० रुपये दराने विक्री होते. साबण उत्पादनातून गटाची वार्षिक सुमारे साठ लाखांची उलाढाल होते.

नीमतेल निर्मिती

ग्राहक मागणी, स्थानिक स्रोतांपासून उत्पन्नवाढीसाठी गटातर्फे निमतेल उत्पादन केले जाते. यासाठी कडुनिंब पाला, निंबोळीचा वापर केला जातो. हे तेल सांधेदुखी, केस गळती तसेच मालिश करण्यासाठी वापरले जाते. १०० मिलि तेलाची ९० रुपये दराने विक्री होते. या तेलाच्या विक्रीतून वार्षिक ७५ हजारांची उलाढाल होते.

धूप कांडी, सुगंधी धूप कप

गटातील महिलांकडे पाच देशी गाई आहेत. या महिलांनी शेणापासून धूप कांडी, सुगंधी धूप कप निर्मितीला सुरुवात केली आहे. गाईच्या शेणासह गोमूत्र, तूप, भिमसेन कापूर आणि नैसर्गिक औषधी वनस्पतींचे मिश्रण करून धूप कांडी, सुगंधी धूप कप निर्मिती होते. दरवर्षी ५० हजार धूप कप निर्मिती होते. प्रती डझन १०० रुपये दराने विक्री होते. दरवर्षी ५० किलो धूप कांडी उत्पादन घेतले जाते. त्याची प्रति किलो २,००० रुपये प्रमाणे विक्री होते. या उत्पादनातून पाच लाखांची वार्षिक उलाढाल होते.

गटातून साधली प्रगती

गटाच्या अध्यक्ष ज्योती राजेश निकम, सचिव संगीता दत्तू निकम यांच्याकडे गटाच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी आहे. ग्रामीण भागात संघटितपणे कामकाज, व्यावसायिक दृष्टिकोन रुजल्याने आत्मविश्वास वाढून महिला स्वावलंबी झाल्या आहेत.गटातील महिला दररोज चार तास प्रक्रिया उत्पादन निर्मितीसाठी वेळ देतात. गटाच्या वाटचालीबाबत ज्योतीताई म्हणाल्या, की मी भूमिहीन होते, मात्र आता आर्थिक बचतीतून दोन एकर जमीन विकत घेतली. संगीताताईंचे घराचे स्वप्न साकार होत आहे. गटातील सदस्यांची मुले चांगले शिक्षण घेऊन नोकरी करत आहेत.

प्रेरणा उत्पादक गटाचा गोदाई जिल्हास्तरीय प्रदर्शनात मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सन्मान झाला. अहमदाबाद येथे ‘जी-२०’निमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात उत्पादनांची मांडणी करण्यासह मान्यवरांना माहिती देण्याची आम्हाला संधी मिळाली. या वाटचालीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, ‘उमेद’ प्रकल्प संचालिका प्रतिभा संगमनेरे, जिल्हा व्यवस्थापक श्री. कासार, क्षमता बांधणी व्यवस्थापक श्रीकांत सूर्यवंशी आदींचे मार्गदर्शन मिळत आहे.

- ज्योती निकम, ७६२०४५३५०९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com