Pearl Farming : शिंपल्याच्या शेतीतून मोतीनिर्मिती

Mussels Farming : कोल्हापूर जिल्ह्यातील सडोली दुमाला (ता. करवीर) येथील दिलीप व दीपा या कांबळे दांपत्याने सात वर्षांपासून टॅंकमध्ये शिंपल्याची शेती करून मोती उत्पादनाची अनोखी वाट शोधली आहे.
Pearl Farming
Pearl Farming Agrowon
Published on
Updated on

Aquaculture Entrepreneurs Success Story : कोल्हापूर जिल्ह्यातील सडोली दुमाला (ता. करवीर) येथील दिलीप कांबळे महावितरण कंपनीत ‘ऑपरेटर’ म्हणून कार्यरत आहेत. नोकरीबरोबरच त्यांना आयुष्यात वेगळे काहीतरी वेगळे करायचे होते. परंतु मार्ग दिसत नव्हता. शोध घेता घेता गडचिरोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शिंपल्याची शेती करून मोती उत्पादन घेतल्याबद्दलची माहिती त्यांच्या वाचनात आली.

त्याबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली. त्याबाबतची ओढ स्वस्थ बसू देईना. मग मिळेल तेथून अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. मनात एकच विचार होता प्रयत्न तरी करून पाहूया. जमलं तर ठीक अन्यथा अनुभव तरी मिळेल. सन २०१५ मध्ये त्यांनी मोतीपालनाचे प्रशिक्षण घेतले.

मोठ्या उत्साहात कामालाही सुरुवात केली. पण पहिली तीन वर्षे अपयशच मिळाले. शिंपले मरून जायचे. मोती तयार होत नव्हते. खर्च मात्र वाढत होता. पण जिद्द, चिकाटी कायम होती. या कठीण काळात त्यांनी स्वतःला पुन्हा सावरले. त्यावेळी जाणवले की घेतलेले प्रशिक्षण पुरेसे नाही.

पुन्हा नव्याने सज्ज झालेला व्यवसाय

अधिक सखोल ज्ञानासाठी दिलीप यांनी भुवनेश्वर (ओडिशा) येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर अक्वाकल्चर ही संस्था गाठली. हे पाऊल त्यांच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉइंट’ ठरले. इथे मोतीपालनातील शास्त्रीय ज्ञान मिळाले. यात शिंपल्यांची काळजी कशी घ्यावी, पाण्याची तसेच मोत्यांची गुणवत्ता कशी सुधारावी यासह विविध बारकावे त्यांनी आत्मसात केले.

प्रशिक्षणानंतर दिलीप अधिक आत्मविश्वासाने नव्या प्रयत्नांसाठी सज्ज झाले. सन २०१९ हे वर्ष त्यांच्यासाठी यशाचे दार उघडणारे ठरले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. एकापाठोपाठ एक, चमकदार, उच्च दर्जाचे मोती तयार होऊ लागले. दिलीप यांना पत्नी दीपा यांची समर्थ साथ मिळाली. आज सहा वर्षांच्या तपश्‍चर्येतून या दांपत्याने व्यवसायात हातखंडा तयार करण्याबरोबर बाजारपेठही हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.

Pearl Farming
Agriculture Success Story : व्यावसायिक पीक पद्धतीद्वारे शाश्‍वतीची दिशा

अशी होते मोतीनिर्मिती

सुमारे प्रत्येकी दहाहजार लिटर पाणी क्षमता असलेले तीन टॅंक. त्यामध्ये चोवीस तास ऑक्सिजन राहील याची दक्षता घेण्यात येते. तशी यंत्रणा बसविण्यात आली आहे.

नदीपात्रातून शिंपले आणले जातात. प्रत्येक टॅंकची तीनहजार शिंपल्यांची क्षमता असली तरी प्रत्यक्षात एक हजार शिंपल्यांची शेती केली जाते. त्यातील सुमारे सातशे शिंपल्यांपासून १२०० च्या दरम्यान मोती मिळतात.

मोतीनिर्मिती प्रक्रियेत शिंपल्याच्या आत छोटा मोतीबीज टाकला जातो. त्याचा शिंपल्याला त्रास होऊन तो स्वतःच्या संरक्षणासाठी कॅल्शिअम कार्बोनेटचा थर जमा करतो. जो मोत्यात रूपांतरित होतो. ही संपूर्ण प्रक्रिया एक वर्ष ते १८ महिने चालते. या काळात शिंपल्यांना पोषणासाठी शेवाळ, पोषकद्रव्ये यांचा पुरवठा केला जातो.

ठराविक कालावधीनंतर शिंपल्यातून मोती वेगळे केले जातात. पांढरा, फिका गुलाबी, सोनेरी, तपकिरी असे त्याचे रंग असतात.

दहा गुंठे क्षेत्रात कमी उत्पादन खर्चात चांगले उत्पन्न मिळवून देण्याची व्यवसायाची क्षमता. प्रति टॅंक सुमारे चाळीस हजार रुपयांपर्यंतचा येतो खर्च.

दिलीप सांगतात की शिंपल्याच्या सुमारे ५२ प्रजाती आहेत. पैकी तीन प्रजातींपासून मोती निर्मिती केली जाते. सध्या यातील दोन प्रजातींचा वापर आम्ही करतो आहोत. मोतीबीजाची स्वतः निर्मिती केली जाते.

शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने दिलीप यांच्या सहकार्यातून व मार्गदर्शनातून गोड्या पाण्यातील मोती संवर्धन, संशोधन आणि उत्पादन केंद्र सुरू केले आहे. सध्या पाचशे मोत्यांची बॅच घेणे सुरू आहे. केंद्रात शिंपल्यांची शेती कशी करावी याविषयी संशोधन केले जाते.

प्रशिक्षण देण्यात येते. विद्यापीठातील काही विद्यार्थी या विषयावर पीएच.डी.देखील करीत आहेत. विविध महाविद्यालये व अन्य संस्थांचेही दिलीप मार्गदर्शक आहेत. सुलभ मोत्यांची शेती या नावाने दिलीप यांचे पुस्तकही प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

Pearl Farming
Agriculture Success Story: महिला शेतकरी कंपनीपर्यंत रेवतीताईंचा प्रवास...

प्रशिक्षक म्हणून ओळख

दिलीप यांनी स्वतःपुरते मोतीउत्पादन न करता शेतकऱ्यांनाही त्यासाठी प्रेरित केले आहे. त्यासाठी ते प्रशिक्षण आणि मार्गदर्शनही करतात. कृषी विभाग आत्मासह सुमारे दोनशेहून अधिक शेतकऱ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिले असून १५ हून अधिक मोती उत्पादन प्रकल्प सुरू करण्यास मदत केली आहे.

या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख झाली आहे. मत्स्यपालन क्षेत्रातील तज्ज्ञ, व्यापाऱ्यांसोबतही चांगले संबंध निर्माण केले आहेत. या ‘नेटवर्किंग’ मुळे नवे ग्राहक मिळण्यासही मदत झाली आहे. भविष्यात प्रशिक्षण वर्गाच्या दृष्टीने इमारतीचे बांधकामही सुरू आहे.

मोत्यांची गुणवत्ता, विक्री, बाजारपेठ

दिल्ली, पश्‍चिम बंगाल, बिहार व हरियाना येथे व्यापारी आहेत. त्यांना मोत्यांचे छायाचित्र पाठवले जाते. त्यांच्याकडून पसंती आल्यानंतर कुरिअरद्वारे मोती रवाना केले जातात. मोत्यांची गुणवत्ता आणि किंमत अनेक गोष्टींवर तपासण्यात येते. यात जाडी, पृष्ठभाग, आकार, रंग, चमक आदी निकष असतात. त्यानुसार दर मिळतात.

कांबळे दांपत्याने देशांतर्गत बाजारपेठ मिळवलीच. शिवाय निर्यातक्षम गुणवत्ता तयार करून परदेशातही विक्री केली. मागणीनुसार गणपती, ओम किंवा कोणत्याही आकाराचे किंवा डिझाईनचे मोतीबीज वापरून तसे मोती तयार केले जातात. त्यांना बाजारात अधिक किंमत मिळते. गुणवत्तेनुसार प्रतिमोत्याला दीडशे, दोनशेपासून ते पाचशे रुपये व त्याहून अधिक दर मिळतो.

दिलीप कांबळे ९०४९८०८७६८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com