Agriculture Entrepreneurship : कृषी शिक्षणासह विद्यार्थ्यांना मिळतायत मार्केटिंग- विक्रीचे धडे

Agriculture Marketing Skills : कृषी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय शेती व्यवस्थापनासोबत मार्केटिंग- विक्रीचाही अनुभव घेता येतो. पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर दरवर्षी कांदा बीजोत्पादन, स्ट्रॉबेरी व अन्य भाजीपाला शेती विद्यार्थी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली करतात.
Agriculture Education
Agriculture Marketing Skill Agrowon
Published on
Updated on

Agriculture Students Learn Marketing Skills : कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अभ्यास-क्रमाचा भाग म्हणून प्रत्यक्ष शेती व त्यातही शास्त्रीय दृष्ट्या व्यवस्थापन करण्याचा अनुभव मिळतो. मात्र उत्पादनाबरोबरच विक्रीचाही अनुभव घेता आला तर शिक्षण संपल्यानंतर घरच्या शेतीत किंवा नोकरी-व्यवसायात त्याचा चांगला उपयोग त्यांना करून घेता येतो.

कृषी पदवीच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी एक सत्र ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी आधारित अनुभवातून शिक्षण या विषयावर आधारित असते. यात विद्यार्थ्यांच्या दोन बॅचेस तयार केल्या जातात . पैकी एक बॅच विविध गावांमध्ये जाऊन ग्रामीण कार्यानुभव घेते. तर दुसरी बॅच विविध भाजीपाला पिकांची लागवड करून उत्पादन व विक्री व्यवस्थेचा अनुभव घेते.

दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांची अदलाबदल होऊन हे कार्य वर्षभर सुरू राहते. पुणे येथील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख व कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनुभव दरवर्षी घेतात.

विद्यार्थी करतात कांदा बियाणे निर्मिती

अनुभवातून शिक्षण या उपक्रमाद्वारे महाविद्यालयाच्या उद्यानविद्या विभागातील विद्यार्थी कांद्याचे तंत्रशुद्ध बीजोत्पादन घेतात. त्यासाठी सुमारे ७० विद्यार्थ्यांचा समावेश असतो. यातील निम्मे विद्यार्थी कांदा शेतीचा तर उर्वरित निम्मे विद्यार्थी बियाणे निर्मितीची प्रक्रिया पार पाडतात.

त्यासाठी खरिपात ५० गुंठ्यांत लागवडीचे नियोजन होऊन बी पेरणीपासून ते रोपे तयार करणे, पुनर्लागवड, कांदा काढणी, त्यानंतर योग्य आकारमानाच्या व प्रतवारीच्या कांद्याची निवड करण्यापर्यंत सर्व कामे विद्यार्थी करतात. रब्बीत बीजोत्पादन हा टप्पा असतो. विद्यापीठाने विकसित केलेल्या फुले समर्थ या लाल वाणाच्या कांद्याचे बियाणे तयार करण्याची तयारी सुरू होते.

त्यासाठी सुमारे दीड एकर क्षेत्राची निवड केली जाते. तणनियंत्रण, खत, पाणी, कीड- रोग नियंत्रण या सर्व बाबी विद्यार्थी येथील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करतात. सुमारे ५० ते ६० टक्के गोंडे पक्व झाल्यानंतर काढणी होते. त्यानंतर गोंडे उन्हात सुकवण्यात येतात. त्यानंतर मळणी उफणणी, बी निवडण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यात विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने राबतात.

Agriculture Education
Agriculture Success Story: केवळ १२ गुंठ्यात भाजीपाला उत्पादन! सुमनबाईंचा संघर्ष आणि यशाचा प्रवास

...असे होते विक्रीचे नियोजन

शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली बियाणे निर्मितीचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी ते राहुरी येथे पाठविले जाते. पुढे त्याचे एक किलोचे पॅकिंग तयार होते. पंधराशे रुपये प्रति किलो असा त्याचा दर आहे. मागील वर्षी विद्यार्थ्यांनी फुले समर्थ वाणाचे १८४ किलो बियाणे तयार केले. त्याची विक्री देखील केली.

त्यातून दोन लाख ७६ हजार रुपयांचे उत्पन्नही मिळविले. या वर्षी दीड एकरात बीजोत्पादन क्षेत्र आहे. त्यातून अडीच ते तीन क्विंटल बियाणे उत्पादन अपेक्षित आहे. त्याच्या विक्रीतून चार ते साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न विद्यार्थी विद्यापीठाला मिळवून देतील अशी अपेक्षा आहे.

काढणी व विक्री नियोजन

कांद्याव्यतिरिक्त विद्यार्थी स्ट्रॉबेरीसारखे फळ व अन्य भाजीपाला शेतीही करतात. विक्रीची जबाबदारी देखील त्यांच्याकडे असल्याने काढणीचे कुशल तंत्र ते शिकून घेतात. काढणी हंगामात सकाळी नऊच्या दरम्यान हे काम सुरू होते. तीन विद्यार्थ्यांचा एक असे पाच गट तयार केले जातात. कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ विक्री व्यवस्था केलेली असते. ग्राहक तेथे येऊन खरेदी करतात. या व्यतिरिक्त जवळच्या शासकीय कार्यालयांमध्येही जाऊनही विद्यार्थी विक्रीचा अनुभव घेतात.

Agriculture Education
Agriculture Success Story: शेतीला मिळाली मसाला उद्योगाची जोड

यात ‘मार्केटिंग’ कसे करावे, ग्राहकाशी कसे बोलावे याबाबतचे ज्ञान प्राप्त होते. प्रक्षेत्रावर विविध जातींच्या स्ट्रॉबेरीची थोड्या थोड्या क्षेत्रात ऑक्टोबरमध्ये लागवड करण्यात आली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ती तोडणीस उपलब्ध झाली. प्रति किलो २०० रुपये दर मिळाला. तर सुमारे ४ लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न विद्यार्थ्यांनी या फळाच्या विक्रीतून मिळवले.

पाच गुंठे क्षेत्रावर कलिंगड लागवडही विद्यार्थ्यांनी केली. सुमारे तीन टनांच्या आसपास उत्पादन मिळाले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कलिंगड विक्रीस उपलब्ध झाले. विद्यार्थी शुभम देशमुख म्हणाला की अनुभवातून शिक्षण या उपक्रमातून मला खूप काही शिकायला मिळाले.

दहा गुंठे खुल्या क्षेत्रावरील स्ट्रॉबेरीसह पाच गुंठ्यात शेडनेटमध्येही या पिकाचा संरक्षित शेतीचा अनुभव घेता आला. त्यातून दोन्ही तंत्रज्ञानही समजून घेता आले. तर कोणताही व्यवसाय करावयाचा तर विक्री व्यवस्थेचे ज्ञान ही त्याची गुरुकिल्ली असल्याचा अनुभव घेतल्याचे अनघा पाटील या विद्यार्थिनीने सांगितले.

विद्यार्थ्यांना होतो नफा

महाविद्यालयाच्या उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. सुभाष भालेकर म्हणाले की कांदा बीजोत्पादन, स्ट्रॉबेरी आणि अन्य भाजीपाला पिकांच्या विक्रीतून दरवर्षी चांगले उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता निव्वळ नफ्यातील ५० टक्के वाटा विद्यार्थ्यांना देण्यात येतो. तर उर्वरित हिस्सा महाविद्यालय आपल्याकडे ठेवते.

गेल्यावर्षीच्या स्ट्रॉबेरीला किलोस २०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. सुमारे चार लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न विद्यार्थ्यांनी मिळवले. निव्वळ नफा दोन लाख २० हजार रुपयांच्या दरम्यान झाला. नफ्यातील वाटा म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर सरासरी साडेचार हजार रुपये जमा करण्यात आले.

भालेकर पुढे म्हणाले, की कृषी आधारित अनुभवातून शिक्षण या उपक्रमांतर्गत कोणत्या पिकांमधून किती कालावधीमध्ये व खर्चामध्ये किती उत्पन्न व नफा मिळू शकते याचे प्रात्यक्षिकांसह ज्ञान दिले जाते. पुढे नोकरी मिळाली नाही तरी आपल्या शेतात ज्ञानाचा अनुभव घेऊन विद्यार्थी स्वयंरोजगार निर्मिती करू शकतात.

डॉ. सुभाष भालेकर ९४०५८५४६०६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com