Cashew Processing Industry: काजू प्रक्रिया उद्योगातून घेतली झेप

Success Story: कोल्हापूर येथील योगेश व अस्मिता ओटवकर या दांपत्याने वीस वर्षांपूर्वी घरगुती स्वरूपात सुरू केलेल्या काजू प्रक्रिया उद्योगाने मोठी झेप घेतली आहे. आज ते प्रति दिन एक टन काजू प्रक्रिया करत असून, देशभरात त्यांचे ग्राहक पसरलेले आहेत.
Cashew Processing Industry
Cashew Processing IndustryAgrowon
Published on
Updated on

Rural Entrepreneurship: मूळचे कोकणातील असलेले ओटवकर दांपत्य अनेक वर्षांपासून कोल्हापुरात राहते. त्यांचा पारंपरिक व्यवसाय सोनार कामाचा. कणकवली येथे वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. बहुतांश शिक्षण रात्रशाळेतून पूर्ण करत २००२ मध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले. या काळात योगेश यांनी सुवर्ण कारागीर म्हणून काम करत कुटुंबाला हातभार लावला. पण या कामात त्यांचे मन काही रमेना. मग त्यांचे वडील सुनील ओटवकर यांनी घरगुती काजू प्रक्रिया व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात प्रोत्साहन दिले.

कोकणातील रहिवासी असल्याने काजू व्यवसायाची मुलभूत माहिती होती. पण अनुभव अजिबात नव्हता. धाडस बांधत २००५ मध्ये योगेश यांनी कोल्हापुरातील घरीच काजू प्रक्रिया व्यवसाय सुरू केला. त्यासाठी ५० हजार रुपये गुंतवत व्यवसायाला सुरुवात केली. त्या वेळी फारशी यंत्रे नव्हते. दिवसाला चाळीस किलो बियांवर प्रक्रिया केल्यानंतर दहा किलो काजू तयार केले जात. त्यासाठी स्थानिक ग्राहक मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले.

सुरुवातीपासूनच काजू निर्मिती व त्यांची प्रतवारी यात कोणतीही तडजोड न केल्याने मागणी वाढत गेली. तसा प्रक्रियेचा वेग वाढविण्यात आला. पत्नी सौ. अस्मिता यांच्या खंबीर साथीमुळे व कुटुंबाच्या सहकार्याने व्यवसायाचा विस्तार वाढत गेला. घरात जागा अपुरी पडू लागली. तोपर्यंत व्यवसायामुळे आर्थिक सक्षमता आलेली होती. कोल्हापुरातच घराजवळ एक गुंठा जागा विकत घेत प्रक्रियेसाठी शेड उभारले. मोठ्या जागेमध्ये २०० किलोंपर्यंत काजूवर प्रक्रिया होऊ लागली. आता स्थानिक व राज्यातील ग्राहकांसोबतच परराज्यातून ग्राहक मागणी नोंदवू लागले.

Cashew Processing Industry
Cashew Farming: नवीन काजू लागवडीला प्रारंभ

वाढत्या मागणीइतके उत्पादन करण्यासाठी २०१३ मध्ये कांडगाव (ता. करवीर) येथे स्वतंत्र व प्रशस्त जागा विकत घेतली. तिथे ‘श्री महालक्ष्मी कॅश्यू फॅक्टरी’ या नावाने ५०० किलोवर प्रक्रिया करणारे युनिट सुरू केले. तिथे यांत्रिकीकरण वाढवले. स्वतःच्या बचतीसह २५ लाखांचे कर्ज बॅंकेतून घेतले होते. प्रक्रिया केंद्रासाठीचे शासनाचे ३० टक्के अनुदानही मिळाले. सध्या प्रती दिन एक टन ते बाराशे किलो काजूवर प्रक्रिया केली जाते. पुढील काळात दररोज दोन टन काजूवर प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे.

पंचक्रोशीतील मजुरांना मिळाला रोजगार

२०१३ मध्ये काजू प्रक्रिया युनिट कोल्हापुरातून कांडगावात आले. या भागात काजू उद्योगाची काहीच माहिती नव्हती. ओटवकर दांपत्याने परिसरातील महिला मजुरांनाच रोजगार देण्याचा निर्णय घेतला. खरेतर हे कौशल्याचे काम आहे. त्या बाबत तांत्रिक माहिती देतानाच ओटवकर दांपत्याने आपल्या उत्तम स्वभाव आणि व्यवहारातून त्यांचा विश्वास संपादन केला. गेल्या दहा वर्षांपासून या महिला दर्जेदार काजू निर्मितीसह प्रतवारीतील सर्व तांत्रिक कामेही लीलया करत आहेत. त्यामुळे काजूचा दर्जा टिकून आहे. आसपासच्या तीन, चार गावांतील महिलांना घरबसल्या साल बाजूला काढण्याचे काम दिले जाते. घरातील अन्य कामे सांभाळतानाच या महिलांना दररोज दोनशे रुपयांपर्यतची मजुरी मिळते.

यातून ओटवकर दांपत्याने स्वतःच्या प्रगतीसोबतच परिसरातील आर्थिकदृष्ट्या प्रगतीच्या वाटेवर नेले आहे. सध्या हंगामी सोळा महिला व दोन पुरुष असे अठरा जण काम करतात. हे सर्व जण ओटवकर यांच्या कुटुंबातील सदस्यच असल्याप्रमाणे वातावरण ठेवले आहे. खेळीमेळीत अधिक काम होते, हा त्यांचा अनुभव आहे. मजुरांच्या घरगुती कार्यक्रमामध्येही हे ओटवकर दांपत्य सहभागी होतात.

Cashew Processing Industry
Cashew Processing: राज्यात काजू प्रक्रिया व्यवस्था बळकट करा : पणनमंत्री रावल

वर्षभर प्रक्रियेसाठी काजू बियांचे नियोजन

वर्षभरातून विविध ठिकाणांहून काजू बियांची खरेदी होते. फेब्रुवारी ते मे या कालावधीत कोकणातून खरेदी केली जाते. तर मे ते जानेवारीपर्यंत आफ्रिकेमधून काजू बियांची आयात केली जाते. आवश्यकतेनुसार मंगळूर, तमिळनाडू भागातून बिया आणल्या जातात. वर्षाला सुमारे तीनशे टनांपर्यंत काजू बी वर प्रक्रिया केली जाते. यातून ६० ते ७० टन काजू तयार होतो. रंग, आकार, दरानुसार तब्बल चाळीस प्रकारे काजूचे वर्गीकरण केले जाते. वर्गीकरणानुसार १८० ते १०५० रुपये प्रति किलो इतके त्याचे दर असतात.

काजूची बहुतांश विक्रीही होलसेलमध्ये केली जाते. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाना, जम्मू- काश्मीरपर्यंत त्यांच्या काजूला मागणी असते. कोल्हापुरातून ट्रान्स्पोर्टद्वारे देशाच्या विविध भागात काजू पाठविला जातो. सुरक्षित पॅकिंगसाठी प्लॅस्टिक पॅकिंग, टीन बॉक्स किंवा बकेट यांचा वापर होतो.

हुशारीने टाळली आर्थिक जोखीम

ओटवकर दांपत्य गेल्या वीस वर्षापासून काजू प्रक्रिया व्यवसायात आहेत. आर्थिक बाबींबाबत अनेक कटू अनुभवही त्यांना आले. अनेकांनी ओळखीचा फायदा घेतला. उधारीवर काजू घेत रक्कम बुडवली. अनेकदा कमी दराने काजू मागितला गेला. सुरुवातीला काही प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. अशा काही अनुभवातून शहाणपण येत गेले. योगेश हे पूर्णपणे आर्थिक बाबी सांभाळतात. तर त्यांच्या पत्नी मजूर व्यवस्थापनासह उत्पादन विभाग सांभाळतात.

काजूचा दर्जा चांगला असल्याने आता बाहेरील राज्यातून त्यांच्याकडे काजूसाठी ग्राहक येतात. टनाने काजू बाहेर जातो. फसवणूक टाळण्यासाठी योगेश यांनी मागणी नोंदविल्यानंतर पूर्ण रक्कम अगोदरच घेण्याची पद्धत सुरू केली. कितीही जवळचा किंवा जुना ग्राहक असला तरी पूर्ण रक्कम दिल्याशिवाय मागणी घेतली जात नाही. तरीही काजू दर्जेदार असल्यामुळे मागणीत वाढच होत आहे.

यांत्रिकीकरणावर भर

जर कोकणातून काजू बी आणले असतील तर उन्हात ते दोन ते तीन दिवस वाळविले जातात. आयात केलेले काजू वाळवावे लागत नाहीत. पहिल्यांदा बॉयलरवर काजू वाफवून घेतल्यानंतर पंधरा ते वीस तास ते थंड केले जातात. दुसऱ्या दिवशी कटिंग केले जातात. त्याच रात्री काजू गर ड्रायरला लावले जातात. दुसऱ्या दिवशी त्याचा साल काढली जाते. कलर सॉर्टर मशिनच्या माध्यमातून वर्गीकरण केले जाते. पुन्हा ते ड्रायरला लावले जाते. यंत्राबरोबरच महिला मजुरांकडून प्रतवारी केली जाते. पुन्हा ड्रायरला लावून मागणीनुसार आकार, रंगानुसार वर्गीकरण केले जाते.

वर्गीकरणानुसार दहा किलोच्या पिशव्यामध्ये पॅकिंग केले जाते. या सर्व प्रक्रियांसाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागतो. संपूर्ण युनिटमध्ये यांत्रिकीकरण केले आहे. आधुनिक पद्धतीचे बॉयलर, कटिंग मशिन, स्कूपिंग लायनर, ड्रायर ओव्हन, पिलिंग मशिन, कलर सॉर्टरची यंत्रे वापरली जात असल्याने मनुष्यबळाचा हस्तक्षेप कमी राहतो. एकूण प्रक्रियेच्या ८० ते ९० टक्के काम यंत्राने, तर १० ते २० टक्के काम मनुष्यबळाने होते. दोन्हींचा समन्वय साधून दर्जेदार काजू निर्मिती केली जाते.

योगेश ओटवकर ९८६००६४००७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com