Sahyadri Farms : सह्याद्री’ने उभारला सर्वांत मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प

Sahyadri FPC : द्राक्ष निर्यातीत आघाडीवर असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने काजू मूल्यसाखळी उभारली आहे.
Sahyadri Farms
Sahyadri Farms Agrowon

Nashik cashew processing plant : भारतात साधारण १८ लाख टन कच्च्या काजूवर प्रक्रिया केली जाते. मात्र देशातील उत्पादनाच्या तुलनेत त्याचे प्रमाण ८ लाख टन आहे. परिणामी, ६० टक्क्यांहून अधिक कच्चा काजू प्रक्रियेसाठी प्रामुख्याने आफ्रिका खंडातून आयात केला जातो. देशांतर्गत काजू उत्पादनाच्या अनुषंगाने गरज पूर्ण होत नसल्याने उत्पादक ते ग्राहक या साखळीत विपुल संधी आहेत. हीच संधी ओळखून द्राक्ष निर्यातीत आघाडीवर असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने काजू मूल्यसाखळी उभारली आहे. कंपनीच्या मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स आवारामध्ये प्रतिदिन तब्बल १०० टन क्षमतेचा काजू प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला आहे.

Sahyadri Farms
Sahyadri Farms : सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे यांना ‘मराठी उद्योजक’पुरस्कार जाहीर

कच्च्या मालावर प्रक्रिया करून काजू निर्मितीबरोबरच काजू कवचापासून तेल निर्मितीही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील भागाचे अर्थकारण उंचावण्यास यामुळे मदत होईल. यासह संधी ओळखून प्रतिएकर उत्पादकता वाढ, नवीन वाण लागवडी, सेंद्रिय काजू उत्पादन, उत्पादित मालावर प्रक्रिया व विपणन साखळी सक्षम करण्यासाठी ‘सह्याद्री’ने पाऊल टाकले आहे.

काजूची सरासरी उत्पादकता वाढविण्याबरोबरच दुसरीकडे काजू गर व बोंडापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचे मोठे प्रकल्प उभारण्यावर भर देणे गरजेचे आहे. यातून केवळ काजू उत्पादकांचे उत्पन्न वाढण्यासह गावातच रोजगाराची संधीही निर्माण होईल. त्यामुळे रोजगारासाठी शहरात गेलेला तरुणवर्ग पुन्हा गावांत स्थिरावण्यास मदत होईल, असा विश्‍वास ‘सह्याद्री’च्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. त्यासाठी काजू पिकाच्या मूल्यसाखळ्या उभारण्यावर ‘सह्याद्री फार्म्स’ भर देणार आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील आदिवासी पट्टा व कोकण भागातील शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने काम केले जाईल. राज्यात प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू आहेत. मात्र हा १०० टन क्षमता असलेला एकात्मिक स्वरूपाचा प्रकल्प आहे.

Sahyadri Farms
Solar Project : सौरऊर्जेसाठी ‘सह्याद्री फार्म्स’चे पाऊल पडते पुढे

‘सह्याद्री’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे म्हणाले, ‘‘राज्यातील वातावरण, माती यामुळे गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम काजू उत्पादनासाठी नैसर्गिक वरदान लाभले आहे. त्याकडे गांभीर्याने पाहून उत्पन्नवाढ व रोजगार संधी ओळखून व्यावसायिक पद्धतीने काम करण्याची गरज आहे. हे सर्वाधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून पुढे येऊ शकते. म्हणूनच संधीचे रूपांतर ताकदीच्या मूल्यवर्धित साखळीत करण्याची गरज आहे. त्यासाठी ‘सह्याद्री’ने ही सुरुवात केली आहे.’’

जगात काजू उत्पादनात भारत म्हणून आपण आघाडीवर असलो; तरीही देशांतर्गत काजूची मागणीही आपण पूर्ण करू शकत नाही. इतकी या शेतीत व व्यापारात संधी आहे. कोकणाबरोबरच सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील घाटमाथ्यावरील इतरही भागांत काजूमुळे आर्थिक क्रांती घडविण्याची संधी आहे.
- विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, मोहाडी (जि. नाशिक)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com