
Rural Development : बुलडाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यात वसलेले सुमारे ११५० लोकसंख्येचे निपाणा गाव सन २००८ पूर्वी टँकरग्रस्त गाव म्हणून ओळखले जायचे. नोव्हेंबर- डिसेंबरपासूनच पाणीटंचाई जाणविण्यास सुरुवात व्हायची. टँकरशिवाय दुसरा पर्याय गावकऱ्यांसमोर नसायचा.
महिलांना डोक्यावर हंडे घेत पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागायची. सन २००८ च्या दरम्यान गावची पाणीटंचाई दूर करण्यासाठी लढा सुरू झाला. गावातील संतोष तांदूळकर या सामाजिक कार्यकर्त्याने थेट राष्ट्रपती भवनासमोर आंदोलनाचा इशारा दिला.
त्याचा असा परिणाम झाला तरी केंद्रातील यंत्रणा हलली. गावाला पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यंत्रणांनी महत्त्वाचा निर्णय घेत गावाला व्याघ्रा नाला प्रकल्पातून पाणी देण्यासाठी तब्बल नऊ किलोमीटर लांबीची पाइपलाइन उभारली. पिण्याच्या पाण्याची समस्या यानंतरच्या काळात मार्गी लागली खरी.
पण शेतशिवार अजून पावसावरच अवलंबून होते. पावसाचे चार महिने संपल्यावर विहिरी तळ गाठायच्या. शेतकऱ्यांना एकच पीक घेता येत होते. त्यातून जेमतेम उत्पन्न मिळायचे. तुटपुंज्या पाण्यावर शेती करणे म्हणजे जणू जुगार झाला होता.
उगवली नवी पहाट
मध्यंतरी काही काळ गेला. ग्रामस्थांचा संघर्ष सुरूच होता. सन २०२० मध्ये गावाने अटल भूजल योजनेत भाग घेतला. तेव्हाचा हा कोरोनाचा काळ होता. कामांनी संथ गती पकडली होती. सन २०२२ मध्ये मात्र जलसंधारणाच्या कामांनी गती घेतली. लोकसहभागातून व श्रमदानातून चार बंधारे, ६८ रिचार्ज शाफ्ट्स, चार रिचार्ज स्ट्रेंच आणि १० शोषखड्डे एवढे काम गावशिवारात झाले. शिवारातून वाहून जाणारे पावसाचे पाणी जमिनीतच जिरवले जाऊ लागले. त्यातून भूजल पातळीत लक्षणीय वाढ होत गेली.
यंदाच्या वर्षी पाझर तलावातून आठ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्याचा लक्षांक होता. पण गावकऱ्यांना त्याचे महत्त्व पटल्याने तब्बल ३५ हजार क्युबिक मीटर गाळ उपसण्याचे दिव्य त्यांनी पार पाडले. तलावानेही मोकळा श्वास घेतला. त्यातून लाखो लिटर जलसंचयाची क्षमता वाढली.
सोबतच ३५ हेक्टर शिवार सुपीक होण्याकडे वाटचाल करू लागले. सन २०२० पूर्वी गावातील विहिरी कोरड्या असायच्या. जलसंधारणाची कामे झाली आणि तीन वर्षांत पावसाचे पाणी शिवारात जिरू लागले. आज तीस फुटांवर त्या पाणी देऊ लागल्या आहेत. पावसाळ्यात काही विहिरींमधून तर पाणी हाताने काढता येईल अशी अवस्था येऊन ठेपली आहे.
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा काटेकोर वापर
पाण्याची किंमत निपाणा गावाने अनुभवली आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा काटेकोर वापर ठिबकद्वारे करण्याचा निर्धार करण्यात आला. आज गावातील ५० टक्क्यांहून अधिक शेती ठिबक सिंचनाखाली आली आहे. यंदाचा खरीप हंगाम सुरू झाला आहे. गावशिवारातील प्रत्येक शेतात ठिबकच्या नळ्या अंथरलेल्या दिसत असून कपाशी लागवडीचे नियोजन झाले आहे. भूजल पातळी वाढवणे, रिचार्ज स्ट्रक्चर आदी तंत्रज्ञानाचाही वापर निपाणाच्या ग्रामस्थांनी केला. सुजल गाव या दर्जासाठी त्यांनी स्वतःला सिद्ध केले.
मेहनतीचा झाला सन्मान
अटल भूजल योजना स्पर्धेत २०२२-२३ या वर्षासाठी गावाला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ५० लाख रुपयांची रक्कम मिळाली. ग्रामस्थांनी केलेल्या कामांचे हे फळ होते. त्यांच्यासाठी हा अभिमानाचा क्षण होता. याच बळावर गावाने पुढील टप्प्यात स्मार्ट ग्रामपंचायत स्पर्धेत देखील बाजी मारली. दहा लाखांचे पारितोषिक मिळवले. गाव एकजुटीने विकासाच्या मार्गावर निघाल्याचेच हे फलित होते.
घडला आमूलाग्र बदल
पाणी आल्याने केवळ शेती नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक जीवनातही अमूलाग्र बदल घडला. गावात रस्त्यांची ७० टक्के कामे झाली. भव्य ग्रामपंचायत भवन उभे राहिले. तरुणाईसाठी व्यायामशाळा बनविण्यात आली. समाज मंदिराचे बांधकाम झाले. ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी ‘आरओ’ची सुविधा बसविली. पहिली ते पाचवीपर्यंत शासनाची शाळा गावात असून तेथेही ही सुविधा तयार केली आहे. गावातील दलित वस्तीत ६० घरे रमाई घरकुल योजनेतून उभी राहिली. सांडपाण्याचीही योग्य रचना करण्यात आली. ठिकठिकाणी शोषखड्डे बनवून हे पाणी जमिनीत जिरविण्यात आले. गावाच्या प्रत्येक घटकाचा अशा कामांमधून विकास होत आहे.
शेतशिवारात पाणी वाहू लागले तसे पूरक व्यवसायही बाळसे धरू लागले. चाऱ्याची सोय झाल्याने दुधाळ जनावरे गावात आली. सध्या दररोज २०० लिटरहून अधिक दूध संकलन होते. जळगाव दूध संघ व खासगी डेअरीला त्याचा पुरवठा होतो. त्यातून ग्रामस्थांच्या हाती पैसा खेळता राहत आहे. महिलांचे बचत गट सक्रिय झाले.
त्यांना सक्षमीकरणासाठी पाठबळ देण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींना लाखो रुपयांचे साहित्य वाटप करण्यात आले.येत्या एक जुलै रोजी कृषी दिनानिमित्त गावात १० हजार फळरोपे लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा दोनमध्ये गावाची निवड झाल्याने आणखी योजनांची वाट मोकळी झाली आहे.
संतोष तांदूळकर ९४०५००००७१
आधुनिकतेच्या दिशेने पावले
कायमस्वरूपी पाणी मिळून गाव टँकरमुक्त व्हावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष तांदूळकर यांनी थेट राष्ट्रपती भवनासमोर एक डिसेंबर २००८ पासून उपोषणाचा इशारा तेव्हा दिला होता. त्याची निवेदने जिल्हा प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या विविध घटकांना पाठविली होती. त्या वेळी केलेला हा स्वाभिमानासाठीचा लढा होता असे तांदूळकऱ सांगतात.
त्यानंतरही त्यांनी सातत्याने विविध योजनांसाठी प्रशासनाकडे आग्रह धरला. योगायोगाने फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांची पत्नी शारदा गावच्या सरपंचपदी विराजमान झाल्या. लोकशक्ती, इच्छाशक्ती, योजनांचा समन्वय आणि दूरदृष्टी याच्या जोरावर आता जलयुक्त निपाणा गावाने आधुनिकतेच्या दिशेने पावले टाकली आहेत. केवळ टँकरमुक्त गाव नव्हे, तर आत्मनिर्भरतेचा प्रतीक बनले आहे.
शारदा संतोष तांदूळकर (सरपंच)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.