Goat Farming : आजोबांनी दिली शेळी अन् झाले धन

Sustainable Agriculture : एकोड-पाचोड (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील खाडे कुटुंबीयांची सहा एकर शेती आहे. अर्धबंदिस्त पद्धतीच्या पालनातून कुटुंबातील सोपान या युवकाने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत पैदास व विक्री पद्धतीची घडी बसवली आहे.
Goat Farming
Goat Farming Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकोड-पाचोड येथील अर्जुन व लक्ष्मीबाई खाडे या दांपत्याची सहा एकर शेती आहे. कृषी पदवी घेतलेला मुलगा सोपान व मुलगी अर्चना असं त्यांचं कुटुंब आहे. सहा एकरांपैकी दीड एकरात भाजीपाला, अर्धा एकर लिंबू बाग, दीड एकर मोसंबी असते. भाजीपाला शेतीत मेथी, कोथिंबीर, शेपू, भेंडी अशी विविध पिके पाण्याच्या उपलब्धतेनुसार फेब्रुवारी, मार्चपर्यंत घेण्यात येतात.

अर्थात मोसंबी व लिंबू बागेला पाणी पुरेल अशा पद्धतीने भाजीपाला शेतीचे नियोजन असते. उत्पादित शेतमालाची छत्रपती संभाजीनगर येथील जाधववाडी बाजारात, कधी व्यापाऱ्याला तर कधी स्वतः बाजारात बसून विक्री करण्याचे तंत्र अवलंबिले आहे. अलीकडे महिनाभरापूर्वी १५ गुंठ्यात घेतलेल्या मेथीला मिळालेल्या चांगल्या दरामुळे काही हजारांच्या पुढे उत्पन्न मिळाले. एकूणच हवामान व दर या बाबी चांगल्या साधल्या गेल्यास दीड एकरांतील भाजीपाल्यातून वर्षाकाठी अडीच, तीन ते दीड लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते.

Goat Farming
Goat Farming : यशस्वी शेळीपालनासाठी कशा शेळ्या निवडाल?

आजोबांनी दिली शेळी अन् झाले धन

खाडे कुटुंबीयांनी शेतीला शेळीपालनाचा पूरक आधार दिला आहे. त्याची सुरुवात झाली ती सोपानच्या आजोबांच्या काळापासून. सोपान आता २४ वर्षांचा झालाय. तो आठ वर्षाचा असताना त्याच्या आजोबांनी थोडी गुंतवणूक करून त्याच्या आईला गावरान शेळी घेऊन दिली. तिचा चांगल्या प्रकारे सांभाळ करून आईने शेडमध्ये त्यांची संख्या वाढवली. त्यावेळी वडील अर्जुनराव छत्रपती संभाजीनगर शहरात खासगी वाहन चालवण्याचे काम करायचे. त्यावेळी शेतात बाजरी शिवाय काही नसायचे.

त्यामुळे शेतीतील उत्पन्न नसल्यातच जमा होते. अशावेळी झपाट्याने वाढत असलेल्या शेळ्यांची संख्या, त्यावरील अत्यल्प खर्च व त्यातून मिळणारे उत्पन्न मात्र ठळक दिसू लागलं. त्यामुळे अर्जुनरावांनी शेळीपालनाकडे लक्ष देणे सुरू केले. बघता बघता शेळ्यांची संख्या वाढत गेली. चांगली पाट ठेवायची.

एखादा नर पैदाशीच्या उद्देशाने ठेवायचा व उर्वरित शेळ्यांची विक्री करायची अशा पद्धतीने शेळीपालन सुरू ठेवले. त्यामुळे दरवर्षी कुटुंबाच्या अर्थकारणाला आधार मिळू लागला. साधारणतः दीड वर्षापूर्वी सोपानच्या वडिलांचा अपघात झाला. त्यावेळीही शेळीपालन व्यवसायानेच आर्थिक आधार दिला. त्या प्रसंगानंतर शेळ्यांची चराई आणि सांभाळ आई व आपण स्वतः करीत असल्याचे सोपान सांगतो.

अर्धबंदिस्त पद्धतीमुळे खर्चात बचत

एका शेळीच्या सहा त्यानंतर १०, २०, ३० अशी संख्या वाढत गेली. कोरोना काळात सुमारे ६० पर्यंत पोचलेली ही संख्या आजमितीला २५ पर्यंत आली आहे. अलीकडे व्यालेल्या १५ शेळ्यांपासून २० पिल्लांचे उत्पादन झाले. त्यामध्ये सुमारे १३ नर व ७ पाटी आहेत.

गावालगत असलेल्या ओढ्याकाठी तसेच शिवारातील पडीक शेतात अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालनाचे तंत्र खाडे यांनी अवलंबिले आहे. त्यामुळे चाऱ्यांवर होणारा खर्च तसा खूप कमी आहे. सुमारे १५ गुंठ्यात गिन्नी गवत, मेथी, बांधावर शेवरी असे चाऱ्याचे नियोजन केले आहे.

पावसाळ्यात सरकी पेंड तर हिवाळ्यात चार महिने सुमारे दीड ते दोन क्विंटल मका व गहू यांचा एकत्रित खुराक देण्यात येतो. या व्यतिरिक्त कुठलाही खर्च चाऱ्यासाठी केला जात नाही. पावसाळ्यापूर्वी एकदाच लसीकरण केले जाते. मरतुक नाही असे नाही. परंतु त्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे सोपान सांगतो.

Goat Farming
Goat Farming Success: भूमिहीन मजुराने शेळीपालनातून गाठली आर्थिक सक्षमता

अर्थकारण

दर सहा महिन्याला १५ ते २५ पर्यंत तर वर्षात मिळून सुमारे ३० ते ४० पर्यंत नर व पाटीची विक्री केली जाते. चार ते साडेचार महिने वयाच्या पिल्लाचे वजन १५ किलोच्या दरम्यान असते. मादी किंवा नर यांना व्यापारी सरसकट सहा ते सात हजार रुपये दर देऊन त्यांची खरेदी करतात. वर्षाला या व्यवसायातून खाडे कुटुंबाला सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.

पीकपद्धतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जवळपास हे उत्पन्न असल्याने शेतीला या व्यवसायाचा भक्कम आधार झाल्याचे सोपान सांगतो. पूर्वी पडीक असलेल्या क्षेत्राचा याच उत्पन्नातून विकास करून ती जमीन लागवडीखाली आणली.

शेतीची दुरुस्ती किंवा विहीर खोदण्याचा विषय असेल तो याच व्यवसायातून मार्गी लागला. विहिरीमुळे पाण्याची उपलब्धता होऊन पिकांची शाश्वती आली. लिंबू, मोसंबी सारखी थोडी का होईना बाग उभी झाली.मुलांच्या शिक्षणासाठीही उत्पन्नाचा आधार मिळाला.

शेतीचे अर्थकारण

सुमारे सहा वर्षांपूर्वी अर्धा एकरांत १२ बाय १० फूट अंतरावर लिंबाची तर १२ बाय ८ फूट अंतरावर मोसंबीची बाग उभी केली. सिंचनासाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर होतो. दोन वर्षापासून लिंबू व मोसंबीचे उत्पन्न सुरू झाले. पहिल्या वर्षी मोसंबी बाग ५० हजारांना तर दुसऱ्या वर्षी ती ७५ हजारांना बागवानाला उक्ती दिली.

लिंबाची विक्री मात्र दर ३ ते ४ दिवसाला ४ ते ५ गोण्यांमधून छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेत होते. व्यापारी किंवा प्रसंगानुसार हातावरही विक्रीचे नियोजन असते. शेळ्यांच्या संगोपनातून वर्षाकाठी सुमारे चार ट्रॉली लेंडी खत मिळते. त्याचा पूर्णतः वापर स्वतःच्या शेतासाठीच होतो. त्यातून पीक उत्पादकता व जमिनीची सुपीकता वाढीस लागली आहे.

सोपान खाडे ९३२२११९४९५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com