Poultry Farming : देशी कोंबडीपालनातून अर्थकारण केले सक्षम

Poultry Business : आज सुमारे २० एकर शेतीला देशी कोंबडीपालन व्यवसायाची जो़ड देत शेतीसह कुटुंबाचे अर्थकारण सुधाकर सिरसट कुटुंबाने भक्कम केले आहे. शेतीतील वाढत्या अडचणींवर उपाय शोधला आहे.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon

Success Story of Poultry Farming : सोलापूर-बार्शी महामार्गावर वडाळ्यापासून आत आठ किलोमीटरवर पडसाळी गाव आहे. बोरांसाठी प्रसिद्ध या गावाने अलीकडील वर्षांत ढोबळी मिरचीत लौकिक तयार केला आहे. भाजीपाला-फळभाज्यांसह कांद्यातही आघाडी घेतली आहे. याच गावातील सुधाकर दिगंबर सिरसट यांनी नववीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शेतीला सुरवात केली. त्यांचे वडीलही शेतीच करत. घरी सुरवातीला पारंपरिक पिके होत.

वीस वर्षापूर्वी कांदा आणि भाजीपाला पिकांकडे ते वळले. मग शेतीची घडी बसली. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुधाकर यांच्या वडिलांना संघर्ष करावा लागला. पैसे उभे करण्यासाठी खासगी सावकाराला जमीन लिहून द्यावी लागली होती. त्यात जेमतेम एक एकर शेती राहिली. पण सुधाकर यांनी शेतीत अत्यंत मेहनत घेत, विविध प्रयोग करीत अर्थव्यवस्था सुधारली.

नव्याने शेती खरेदी करीत आजमितीला २० एकर व १० गुंठ्यांपर्यंत क्षेत्र पोहोचविण्यात ते यशस्वी झाले आहेत. सध्या त्यात ४ एकर ऊस, ६ एकर मका आहे. दहा एकरांत कांदा लावणीचे नियोजन आहे. दरवर्षी उल्लेखनीय उत्पादन ते घेतात. सन २०१५ मध्ये सुधाकर यांनी दीड एकरात शेडनेट उभारले. ढोबळी मिरची, काकडी आदींचे चांगले उत्पादन त्यातून ते घेत आहेत. अलीकडील काळात नैसर्गिक आपत्ती, बाजारपेठेतील दरांचा बेभरवसा, वाढता खर्च आदी कारणांमुळे शेतीतील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे त्यास
आधार म्हणून पूरक उद्योगाचा विचार सुरू केला.

Poultry Farming
Poultry Farming : उच्चशिक्षित कुटुंबाचे यशस्वी कुक्कुटपालन

सुरू केले देशी कोंबडीपालन

सन २०१८ च्या सुमारास नातेवाइकांकडे देशी कोंबडीपालन पाहण्यात आले. त्याची सविस्तर माहिती घेतली. देशी कोंबड्यांना बाजारपेठेत मागणी चांगली असते. दरही चांगले असतात. त्यामुळे हाच व्यवसाय करायचे पक्के केले. पुढील काहीच दिवसांत नातेवाइकांच्या सल्ल्याने आपला विचार प्रत्यक्षातही आणला.

तेराशे पिलांपासून सुरुवात झाली. सुरुवातीला व्यवस्थापन करताना अनेक अडचणी आल्या. त्रास झाला. नुकसानही झाले. पुढे जसजसा अनुभव येऊ लागला, अर्थकारण सुधारू लागले, तसतसा व्यवसायातील आवाका वाढू लागला. अभ्यास होत राहिला. आत्मविश्‍वास वाढू लागला.

...असा आहे आजचा व्यवसाय

सोलापूरसारख्या हवामानात काटक असलेल्या देशी कोंबड्या आहेत.

चिकनचा स्वाद चांगला असल्याने बाजारपेठेत मागणी आहे.

प्रत्येकी अडीच हजार कोंबड्यांचे संगोपन होऊ शकेल असे दोन प्रशस्त शेड्‍स.

एकूण पाच हजार पक्ष्यांचे होते संगोपन.

कुरूल (ता. मोहोळ) येथील व्यावसायिकाकडून एक दिवस याच्या कोंबडीची पिले आणली जातात.

रोजच्या व्यवस्थापनामध्ये सकाळी सहा वाजता शेडमधील खाद्य आणि पाण्याची भांडी स्वच्छ केली जातात. त्यानंतर पशुखाद्य आणि पाणी भरले जाते. त्यातून पक्षी ना हवे तेव्हा खाद्य आणि पाणी घेऊ शकतात.

लहान कोंबडीला दररोज १० ते २० ग्रॅम, तर मोठ्या कोंबडीला १०० ते १२५ ग्रॅम खाद्य देण्यात येते.

शक्यतो बाजारपेठेतील खाद्य देण्यावरच भर असतो. कॅल्शिअम पुरेसे प्रमाणात देण्यात येते.
आठवड्यातून एकदा गूळपाणी दिले जाते.

मुळात या कोंबड्या फारशा आजारी पडत नाहीत. त्यामुळे आवश्‍यकता भासेल तेवढाच औषधोपचार केला जातो.

सुमारे ७५ ते ८० दिवसांच्या संगोपनानंतर पक्षी विक्रीसाठी होतात. त्या वेळी नराचे सुमारे दीड किलो तर मादीचे वजन सव्वा किलोपर्यंत होते.

Poultry Farming
Poultry Management : कोंबड्यांमधील ताणाचे व्यवस्थापन

विक्री व्यवस्था, बाजारपेठ व अर्थकारण

बहुतांश विक्री वजनावर होते. सुधाकर यांनी जागेवरच बाजारपेठ तयार केली आहे. सोलापूर, धाराशिव, नांदेड, अक्कलकोट या भागांतून व्यापारी फोनद्वारे आगाऊ ऑर्डर नोंदवितात. काही सण व कालावधी वगळल्यास तशी वर्षभर मागणी सुरू असते. वजनावर प्रति किलो १०० ते १८० रुपये दर मिळतो.

स्थानिक ग्राहकांना विक्री नगावर होते. कोंबडीला प्रति नग २५० ते ३०० रुपये, तर कोंबड्याला ३०० ते ३५० रुपये दर मिळतो. प्रत्येक अडीच-तीन महिन्यांची एक बॅच असतो. प्रति शेडमध्ये
वर्षभरात तीन बॅचेस अशा दोन्ही शेडसमधून सहा बॅचेस तयार होतात. वर्षाला सुमारे १४ हजारांच्या दरम्यान पक्ष्यांची विक्री होते. प्रति बॅच ७५ हजारांपासून ते एक- दीड लाखांपर्यंत नफा मिळतो. या पूरक व्यवसायामुळे ताजे भांडवल उत्पन्न होत राहते. शेतीतील खर्चाला ते वर्षभरासाठी उपयोगी ठरते असे सुधाकर सांगतात.

कुटुंबाची साथ

सुधाकर यांना पत्नी कल्पना यांची या व्यवसायात मोठी साथ आहे. पदविकेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुलगा सुशांत देखील या व्यवसायात मदत करू लागला आहे. तिघांच्या एकत्रित राबण्यातून श्रमांची विभागणी झाली. शिवाय केवळ एक मजूर पुरेसा ठरला असून त्यावरील खर्चही कमी झाला आहे. आई छबूबाई व वडील दिगंबर आता शरीराने थकले आहेत. ते सध्या विश्रांती घेतात.

मात्र त्यांचे मार्गदर्शन मिळत असते. शेतीतील उत्पन्नातूनच सुधाकर यांना दोन्ही मुलींचे लग्न
करणे शक्य झाले. दिल्या घरी त्या सुखी आहेत. दोन विहिरी आहेत. चांगले घर आहे. आजपर्यंतचा कुटुंबाचा प्रवास खडतर कष्टाचा राहिला. पण गावातील प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांनी आज ओळख तयार केली आहे. शिवाय आता देशी कोंबडीपालन उद्योगातून एक पाऊल पुढेही टाकले आहे.

सुधाकर सिरसट, ७९७२८८४०२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com