Poultry Business Success Story : कामरगाव (ता. नगर) येथील जगन्नाथ ठोकळ यांनी दोन्ही उच्चशिक्षित मुलांच्या मदतीने तीन वर्षांपूर्वी ब्रॉयलर कुक्कुटपालन सुरू केले. दुष्काळी भागात शेतीला पूरक म्हणून करारावर सुरू केलेल्या कुक्कुटपालनात व्यवस्थापनाला प्राधान्य देत व्यवसाय यशस्वी केला आहे. त्यामुळे कुटुंबाच्या आर्थिक स्त्रोतांत वाढ होत आहे.
नगर तालुक्याच्या पश्चिम भागातील कामरगाव, चास, भोयरे पठार हा तसा दुष्काळी भाग. जमिनी माळरानाच्या, हलक्या प्रतीच्या. त्यात शाश्वत पाणी स्रोत नसल्याने बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून. नगर-पुणे रस्त्यावरील कामरगाव येथील जगन्नाथ विठ्ठल ठोकळ हे जुन्या काळात पदवीचे शिक्षण घेतलेले ज्येष्ठ शेतकरी.
त्यांनी नगर येथील औद्यागिक वसाहतीमधील खासगी कंपनीत सुमारे ३५ वर्षांपेक्षा अधिक काळ नोकरी केली. एकत्रित कुटुंबात ९ सदस्य. मुलगा प्रशांत एमएसस्सी ॲग्री तर त्यांच्या पत्नी दीपिका पदवीधर, दुसरा मुलगा धनंजय यांचे बीएस्सी (केमिस्ट्री) तर त्यांच्या पत्नी रूपाली यांनी बीएस्सी पर्यंत शिक्षण झालेले आहे.
नोकरी करत असतानाच जगन्नाथ ठोकळ यांनी शेतीला जोड म्हणून ब्रॉयलर कुक्कुटपालन करण्याचे ठरविले. दोन्ही मुलांच्या मदतीने तीन वर्षांत व्यवसाय भरभराटीला आणला आहे. प्रशांत हे खासगी बॅंकेत तर धनंजय हे एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. मात्र नोकरी सोडून आता धनंजय यांनी पोल्ट्रीची जबाबदारी सांभाळली आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची कुक्कुटपालन व्यवस्थापनाला मदत मिळते.
करारावर कोंबडीपालन
ठोकळ कुटुंबाची नगर- पुणे रस्त्यावरील उत्तरेला डोंगराळ भागात माळरानावर अडीच एकर शेती आहे. नोकरी सोडल्यानंतर जगन्नाथ ठोकळ यांनी सुमारे २५ ते २७ लाख रुपये खर्च करून ३२५ लांबी व ४० फूट रुंद आकाराचे शेड उभारले. गावापासून दूर असलेली मोकळी जागी ब्रॉयलर कुक्कुटपालनासाठी सोईस्कर ठरली आहे.
पाण्याची सोय म्हणून साडेसात लाख रुपये खर्चून अकरा लाख लिटर क्षमतेची टाकी उभारली.
करार केलेल्या कंपनीकडून पिले, त्यासाठी लागणारे खाद्य तसेच औषधांचा पुरवठा होतो. पिलांच्या आरोग्याची कंपनीमार्फत नियमित आरोग्य तपासणी होते. एक बॅच साधारण ४५ ते ५५ दिवसांपर्यंत चालते. त्यानंतर वजन करून कंपनीला कोंबड्यांची विक्री होते. त्यास सरासरी ५ रुपये ६५ पैसे प्रति किलो इतका दर मिळतो.
करारावरील कुक्कुटपालनामुळे कुटुंबाची आर्थिक घडी चांगली बसली आहे.
व्यवस्थापनातील बाबी
पहिला लॉट गेल्यानंतर साधारण पंधरा दिवसांत नवीन पिले आणली जातात. त्याआधी आठ दिवस कंपनीकडून नवीन पिले देण्याबाबत शेड्यूल सांगितले जाते.
पिले शेडवर आणण्यापूर्वी शेडमध्ये भाताच्या साळीचा भुस्सा पसरला जातो. प्रत्येक लॉटला १० हजार कोंबड्यांसाठी सुमारे चार टन साळीचा भुस्सा लागतो. आठ ते दहा रुपये प्रति किलो दराने भुस्सा ठोक विक्रेत्यांकडून खरेदी होते.
नवीन बॅच घेतल्यानंतर लहान पिलांना भाताच्या साळीचा त्रास होऊ नये म्हणून कागद अंथरला जातो. दोन दिवसांनंतर तो कागद काढून पुन्हा पिले भुश्श्यावर ठेवली जातात.
पिले ठेवण्यासाठी शेडमध्ये एकूण ३४ कप्पे केले आहेत. त्यात सुरवातीचे १० दिवस लहान पिले कप्प्यामंध्ये ठेवली जातात. त्यानंतर वजन वाढेल तसे टप्प्याटप्प्याने शेडमधील कप्प्यात विस्तार केला जातो.
लहान पिल्लांना १२ दिवसांपर्यंत खाद्य आणि पाण्यासाठी लहान भांडी स्वतंत्र ठेवली जातात. पिले बारा दिवसांची झाल्यावर लहान भांडी काढून त्याजागी मोठी भांडी ठेवली जातात. खाद्य आणि पिण्याच्या पाण्याची भांडी नियमित स्वच्छ धुवून घेतली जातात. शेडमध्ये टाकलेले तूस ओले होणार नाही याची काळजी घेतली जाते.
वजन वाढीनुसार खाद्याचा पुरवठा केला जातो. साधारणपणे पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीत प्रति ब्रॉयलर कोंबडी साधारण ४ ते साडेचार किलो खाद्य लागते. मात्र संगोपनावेळी मोकळे वातावरण, खेळती हवा व व्यवस्थापनातील बाबींचे काटेकोर नियोजन केल्यास प्रति पक्षी साधारण अर्धा किलो खाद्यात बचत होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.
कोंबडी खताला मागणी
विश्रांतीचा कालावधी धरून एक बॅच साधारण ६० ते ७० दिवसांची असते. प्रत्येक बॅचमधून सुमारे ५०० ते ६०० गोण्या कोंबडीखत उपलब्ध होते. फळबाग उत्पादकांसह अन्य शेतकऱ्यांकडून कोंबडीखताला चांगली मागणी असते. कोंबडी खताची पॅकिंग करून विक्री केली जाते. साधारण ३० ते ३५ किलो वजनाच्या खत पिशवीची १५० रुपयांना विक्री होते. त्यातून दरवर्षी चार ते साडेचार लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळते. कोंबडीखत दर्जेदार असल्याने शेतकऱ्यांकडून आगाऊ मागणी नोंदविली जाते.
हिवाळ्यात वाढत्या थंडीचा कोंबड्यांवर परिणाम होऊ नये म्हणून शेडमधील तापमान वाढविण्यासाठी विजेचे बल्ब लावले जातात. थंड वारे शेडमध्ये येऊ नये यासाठी पडदे लावले जातात. थंडी जास्त वाढल्यास, लोखंडाच्या टिपापासून भट्ट्या तयार करून शेडमध्ये ठेवल्या जातात.
उन्हाळ्यात फॉगर्सचा वापर केला जातो. त्यामुळे मरतुकीचे प्रमाण तीन ते चार टक्के एवढेच राहते.
खाद्य, आरोग्य व्यवस्थापन या बाबींचे काटेकोर व्यवस्थापन केल्यामुळे इतर पोल्ट्री उत्पादकांच्या तुलनेत आमच्या पोल्ट्रीमधील कोंबड्या वजनाने साधारण ५०० ग्रॅमने अधिक भरतात. खाद्य बचत, वजनात अधिक व मरतुकीचे प्रमाणही कमी केल्याने करारानुसार ठरलेल्या दरापेक्षा तीन ते पाच रुपये अधिक मिळत, असल्याचे ठोकळ कुटुंबीय सांगतात.
पठारावर मुबलक पाणी
माळरानावरील डोंगराकडेच्या शेतात ५० ते ६० वर्षांपूर्वी धनंजय यांच्या आजोबांनी घेतलेली जुनी विहीर होती. त्या विहिरीला चांगले पाणी होते. कालांतराने विहीर बुजवली गेली. त्या जागी तीन वर्षांपूर्वी कृषी विभागाच्या मदतीने १०० फूट बाय १०० फूट आकाराचा शेततलाव काढण्यात आला.
पुढच्या वर्षी तेथेच खडकात खोदकाम केल्यावर पठारावर ४५ फुटांवर मुबलक पाणी लागले. त्यामुळे पोल्ट्रीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटला. डोंगरातील वन्यजीवांनाही या पाण्याचा आधार मिळतो आहे. येत्या काळात तेथे मस्त्यपालन करण्याचे नियोजन आहे.
- धनंजय ठोकळ, ७०२०१६९३०२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.