डॉ. संदीप ढेंगे, डॉ. गणेश गादेगावकर
Chicken Poultry Care : उष्णतेच्या ताणामुळे खाद्य कमी खाल्ल्याने शारीरिक ऊर्जा व एकूण वजन कमी होते. यामुळे शारीरिक क्रिया, उत्पादन आणि प्रजोत्पादन क्रिया मंदावतात. बाह्य वातावरणातील हवेचे तापमान आणि तीव्र स्वरूपाची आर्द्रतेचा आरोग्य आणि उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो.
शेडमधील तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअसच्या पुढे असल्यास उष्णतेचा ताण जाणवायला लागतो. श्वास तोंडावाटे घेतात, धापा टाकतात, वारंवार पंख वर करतात, पोट जमिनीला घासतात. डोळे बंद करतात. सुस्त राहतात. भूक मंदावते, पाणी जास्त पितात. अंडी कमी, लहान आकाराचे देतात. एकूण वजनात घट होते.
वजन कमी होऊन मांसाच्या गुणधर्मात विपरीत बदल होतो. प्रजोत्पादन, अंड्यांची गुणवत्ता यावर ताणाचा सरळपणे विपरीत परिणाम होतो.
शारीरिक तापमान, श्वासोच्छ्वास आणि हालचालीवर परिणाम होतो. पिसांचा रंग बदलतो, त्वचा खरबरीत होते.
उष्णतेच्या ताणामुळे चयापचय व संप्रेरक यांचे केंद्र मेंदूत असल्याने ते विस्कळीत होते. रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन कोंबड्या आजारी पडतात.
उष्णतेमुळे कोंबड्यांची मज्जा संस्था व्यवस्थित काम करीत नसल्याने शारीरिक क्रिया बिघडतात. वजन कमी होते.
व्यवस्थापन
शेडमध्ये पंखे, पडदे आणि तापमान नियंत्रित करणारी उपकरणे लावावीत.
काही तासांच्या फरकाने उजेडाची व्यवस्था करावी. यामुळे शरीरात कमी उष्णता तयार होते.
शेडच्या छताला उष्णता रोधक पत्रे लावावेत. बाहेरील शुद्ध हवा आत येईल याकरिता स्वयंचलित यंत्रणा लावावी.
बाहेरील शुद्ध हवा आत येत राहिल्याने शेडमधील दमटपणा कमी होतो. कोंबड्यांनी उत्सर्जन केलेला वायू (अमोनिया, कार्बन डायऑक्साइड) लवकर शेडबाहेर जातात.
ताणापासून बचाव करण्याकरिता १ टक्का खाद्य प्रत्येक १ अंश सेल्सिअस तापमानाकरिता (२२ ते ३२ अंश सेल्सिअस तापमानादरम्यान) कमी करावे आणि ५ टक्के खाद्य प्रत्येक १ अंश सेल्सिअस तापमानाकरिता (३२ ते ३८ अंश सेल्सिअस तापमानादरम्यान) या प्रमाणात कमी द्यावे.
ताणामुळे चयापचय आणि पचन संस्था बिघडल्याने शारीरिक वाढीकरिता आवश्यक असलेले पोषक घटक (जीवनसत्त्वे व खनिजे) उत्सर्जन प्रक्रियेद्वारे बाहेर टाकले जातात. व्यवस्थित पोषण होण्याकरिता खाद्यात अतिरिक्तपणे जीवनसत्त्वे, खनिजे तसेच औषधी वनस्पती (आवळा, लिंबू, अश्वगंधा, तुळस आणि शतावरी) मिसळाव्यात.
कोंबड्यांना आवश्यक खनिजे (अमोनिअम क्लोराइड, सोडिअम बायकार्बोनेट, पोटॅशिअम क्लोराइड आणि पोटॅशिअम सल्फेट) पिण्याच्या पाण्यातून दिल्याने उष्णतेचा ताण कमी करता येतो. जीवनसत्त्व क आणि ई खाद्यातून पुरविल्याने उष्णतेचा प्रतिकार करण्याची शक्ती वाढते.
बाहेरील तापमान वाढल्याने कोंबड्या खाद्य कमी खातात, पाणी जास्त पितात. म्हणूनच प्रत्येक १ अंश सेल्सिअस तापमान वाढीकरिता ७ टक्के पिण्याचे पाण्याचे (२१ अंश सेल्सिअस तापमान वाढीनंतर) प्रमाण वाढवावे.
शेळी-मेंढी व्यवस्थापन
साधारणपणे तापमान ३५ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यावर उष्णतेचा त्रास जाणवायला सुरुवात होते. बाह्य वातावरणातील किमान व कमाल तापमान सहन करण्याची शेळ्यांची क्षमता इतर पशुधनापेक्षा अधिक आहे. तरीही अप्रत्यक्षपणे तापमान व आर्द्रता वाढीचा उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो. उच्च तापमान बदलाचा आघात सहन करू शकत नाहीत. त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
मोकळ्या कुरणांवर चरताना सावली शोधत फिरतात. पाणी पिणे वाढते. धापायला लागतात आणि तोंडाला फेस येतो. शारीरिक तापमान वाढते, श्वसन क्रियेचा वेग वाढतो. प्रखर ऊन असल्यास तडफडून जमिनीवर कोसळतात.
प्रजोत्पादन क्रिया खोळंबते. करडांची वाढ मंदावते.
गोठ्यात नेहमी हवा खेळती आणि थंड राहणे गरजेचे आहे. छत टीन पत्राचे असेल तर वरील भागास पांढरा रंग किंवा चुना लावावा. आतील भागाला हिरवा रंग द्यावा. गोठ्याच्या बाहेरील भागाला पोती किंवा गोणपाट बांधावे.
कोरड्या चाऱ्याचे प्रमाण कमी करून हिरवा चारा अधिक प्रमाणात द्यावा.
खाद्यात सोयाबीन अवशेष, गहू, तांदूळ भरडा आणि खनिज मिश्रणांचा समावेश करावा. पिण्याचे थंड पाणी पाजावे.
गोठ्यात क्षमतेपेक्षा जास्त शेळ्या, मेंढ्या बांधू नयेत. हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
सकाळी आणि सायंकाळी चरण्यास सोडावे. कुरणाची सोय नसल्यास चारा गोठ्यात द्यावा.
चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी २ टक्के मिठाचे पाणी शिंपडावे. यामुळे चाऱ्याची चव वाढते, पोटात थंडावा निर्माण होतो. पाणी जास्त पितात, खाद्याची पाचकता वाढते. शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते.
शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलीत राहाण्यासाठी गूळ व मीठ मिश्रित पाणी पाजावे. गुळाच्या पाण्याने पोटात गारवा तयार होतो. शरीरातील साखरेची गरज भागविली जाते.
डॉ. संदीप ढेंगे, ९९६०८६७५३६ (सहायक प्राध्यापक व प्रभारी विभाग प्रमुख,
पशू शरीरक्रियाशास्त्र, विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.