Desi Brinjal Variety : गावरान वांग्याचा तयार केला ब्रॅण्ड

Vegetable Farming : सौंदाणे (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील खैरनार कुटुंबीय एकेकाळी झोपडीत वास्तव्य करायचे. परंतु जिद्द, अपार मेहनत, कुटुंबाची एकी व उत्कृष्ट शेती व्यवस्थापनातून कुटुंबाने उल्लेखनीय आर्थिक व सामाजिक प्रगती साधली आहे.
Brinjal Farming
Brinjal Farming Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : नाशिक जिल्ह्यात सौंदाणे (ता.मालेगाव) येथील युवराज खैरनार यांच्या कुटुंबाची एकेकाळी अवघी दोन एकर व तीही कोरडवाहू शेती होती. आजोबा मुरलीधर पारंपरिक पिके घेत. आर्थिक स्थितीमुळे परिवार सांभाळताना ओढाताण व्हायची. उदरनिर्वाहासाठी मुरलीधर यांचे थोरले चिरंजीव बाळासाहेब अहमदाबाद येथे स्थलांतरित झाले.

बाळासाहेबांचा मुलगा युवराजचा त्यावेळी जन्म झाला होता. दरम्यान गावी असलेला बाळासाहेब यांचा धाकटा भाऊ एकनाथ यांचे निधन झाले. त्यावेळी म्हणजे १९८५ च्या दरम्यान खैरनार कुटुंब गावी झोपडीत राहायचे. आग लागून ही झोपडीही जळून खाक झाली. प्रपंच उघड्यावर आला.

आपत्तीमागून आपत्ती येत गेल्याने बाळासाहेब गावी परतले. परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी संघर्ष कायम ठेवला. सन १९८६ मध्ये भारतीय डाक विभागात त्यांना पोस्टमनची नोकरी मिळाली. खाऊच्या पानांचा ठेला आणि वृत्तपत्र वितरण हे व्यवसायही ते करू लागले.

सुधारित पीकपद्धतीचा अंगीकार

सन १९९९ मध्ये विहीर खोदून शाश्वत सिंचन व्यवस्था निर्माण केली. बाळासाहेबांचा मुलगा युवराज व पुतण्या सुनील हे नव्या पिढीतील सदस्य शेतीची जबाबदारी पाहू लागले. जिद्द, चिकाटी, उपलब्ध भांडवलाच्या जोरावर व्यावसायिक, सुधारित पद्धतीने भाजीपाला पीक पध्दतीचा अंगीकार केला.

केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहाता आठवडी बाजारात स्वतः विकण्याची हातोटी विकसित केली. हीच बाब अर्थकारणाला बळकटी देणारी ठरली. नवे तंत्रज्ञान, बदल स्वीकारत प्रयोगशीलता जपली. राहणीमानात अत्यंत साधेपणा, शेतीत राबणारा व रमलेला आदर्शवत असा एकत्रित परिवार अशी खैरनार यांची पंचक्रोशीत ओळख झाली.

Brinjal Farming
Women Agriculture Success Story: ऊस रोपवाटिकेत एका महिलेचे यश; सारिका लठ्ठे यांचा प्रेरणादायी प्रवास

गावरान वांगे शेती व बियाणे संवर्धन

अलीकडील काळ हे संकरित वाणांचे आहे. बाजारात वांग्याच्या विविध संकरित वाणांची चलती आहे. असे असताना खैरनार यांनी मात्र पंचवीस वर्षांपूर्वी (सन २०००) देशी वांग्यांची शेती सुरू केली. ही परंपरा आजगायत जपली आहे. कोरोना काळापूर्वी एक एकरांत वांगे घेतले जायचे. अलीकडील काळात एप्रिल- मे व डिसेंबर- जानेवारी अशा दोन टप्प्यांत प्रत्येकी २० गुंठ्यांत लागवड होते.

प्रत्येक प्लॉट सुमारे सहा महिने चालतो. इनलाइन ठिबक व पॉली मल्चिंग पेपर तंत्राच्या साह्याने लागवड होते. कुटुंबाने २५ वर्षांपासून वांग्याच्या या बियाण्याचे संवर्धनही केले आहे. निवड पद्धतीने चांगली वांगी वेगळी करून त्यांचे बी मिळवले जाते. गादीवाफ्यावर रोपनिर्मिती केली जाते. सुमारे ४५ दिवसांची रोपे झाल्यानंतर चार फुटी सरीवर ५ बाय २ फूट अंतरावर लागवड होते. खाण्यास रुचकर, आकार मध्यम व चांगली उत्पादकता अशी त्याची वैशिष्ट्ये आहेत.

उत्पादन व विक्रीत हातखंडा

वीस गुंठ्यांत पाचशे ते सहाशे क्रेट (प्रति क्रेट १५ किलो) उत्पादन मिळते. युवराज सांगतात, की पूर्वी एका एकरांत १२०० ते १३०० क्रेटपर्यंतही उत्पादन घेतले आहे. हाताळणी, प्रतवारी करून एकसारखा माल क्रेटमध्ये भरण्यात येतो. सौंदाणेसह उमराणे व चांदवड येथील आठवडे बाजारात थेट विक्री होते.

देवळा तालुक्यातील दहिवड, मालेगाव तालुक्यातील जळगाव चोंढी, मुंगसे, कळवण तालुक्यातील अभोणा, कनाशीच्या आठवडी बाजारांपर्यंतही खैरनार यांची पोचली आहेत. पावसाळी हंगामात प्रति किलो ७० ते १०० रुपयांपर्यंत तर उन्हाळी हंगामात ३०, ४० ते ६० रुपयांपर्यंत दर मिळतो.

अनेक वर्षांपासून गुणवत्ता टिकवली असल्याने वांग्याचा जणू ब्रॅण्ड तयार झाला आहे. ग्राहकांची या वांग्याला आवर्जून पसंती राहते. मध्यस्थांची साखळी तोडून स्वतः विक्रीतून अधिकचे दोन पैसे कमवू शकतो हे परिवाराने सिद्ध केले आहे.

Brinjal Farming
Agriculture Success Story: शेतीला मिळाली मसाला उद्योगाची जोड

भाजीपाला उत्पादनात आघाडी

वांगी हे वर्षभर महत्त्वाचे पीक असले तरी टोमॅटो, कोबी, काकडी, हिरवी मिरची, भेंडी अशी भाजीपाला पिकेही टप्प्याटप्प्याने घेण्यात येतात. उत्पादन खर्च मर्यादित ठेवून गुणवत्ता व उत्पादकता यावर मुख्य भर असतो. कांद्याची सर्वाधिक लागवड असते. रब्बी हंगामात काढणीपश्चात साठवणूक करून बाजारातील आवक व दराचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीचे नियोजन असते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत २०२३ मध्ये शेडनेट हाउसची उभारणी केली आहे. त्यामध्ये भेंडी, काकडी, मिरची अशी पिके यशस्वी केली आहेत.

संयुक्त कुटुंबाचा आदर्श

एकेकाळी खैरनार कुटुंबाने गरिबी अनुभवली. मात्र एकीच्या बळावर कुटुंबाने आज सामाजिक व आर्थिक प्रगती साधली आहे. सहा एकर शेती आहे. बटाईनेही तेवढीच शेती कसली जाते. दोन विहिरी असून साडेतीन किलोमीटरवरून पाइपलाइन केली आहे. कामातच राम पाहणारे आणि वारकरी संप्रदायाचा वसा जपणारे हे कुटुंब व्यसनमुक्त आहे.

वडिलांनी नोकरी, व्यवसाय आणि शेती करून कुटुंबाला सावरले. पुढील पिढीतील युवराज व चुलतभाऊ सुनील आज शेतीची मुख्य जबाबदारी सांभाळत आहेत. युवराज यांचे सख्खे भाऊ योगेश औषध निर्माण शास्त्र विषयात पदवीधारक असून त्यांचे औषध विक्री केंद्र आहे. एकमेकांच्या विचारांच्या देवाणघेवाणीतून सर्व कारभार केला जात असल्याने आर्थिक सक्षमता येण्याबरोबर कुटुंब सुखी- समाधानी झाले आहे.

आई सुशीला, काकी अलका, युवराज यांची पत्नी मनिषा, सुनील यांची पत्नी सविता व योगेश यांची पत्नी ज्योती अशा सर्वांची समर्थ साथ लाभली आहे. युवराज यांनी काहीकाळ उपसरपंचपदाचा कार्यकाळही भोगला आहे. घरात ४ लग्नसोहळा झाले. टुमदार बंगला झाला. चारचाकीसह चार मोटरसायकल, ट्रॅक्टर, यांत्रिकीकरण आहे.

युवराज खैरनार ९९२२१४९७२२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com