Gir Cow Farming : जातिवंत ‘गीर’ संगोपनातून वाढवला दुग्धव्यवसाय

नांदेड जिल्ह्यात काटेवाडी येथील सूर्यकांत पोतुलवार यांनी अभ्यास-प्रशिक्षण, शोधकवृत्ती, चिकाटी, सातत्य या बाबींच्या आधारे ५५ जातिवंत देशी गीर गायींचा अद्ययावत गोठा उभारला आहे.
Gir Cow Farming
Gir Cow FarmingAgrowon

Gir Cow Rearing : नांदेड जिल्ह्यात होट्टल-करडखेड (बिदर) रस्त्यावर नांदेडपासून सुमारे शंभर किलोमीटरवर काटेवाडी गाव आहे. सूर्यकांत पोतुलवार यांची येथे शेती आहे. सोशल सायन्स विषयातून त्यांनी मास्टर ही पदवी घेतली. बिनविरोध पद्धतीने निवडलेले ते विद्यमान सरपंचही आहेत.

त्यांचे वडील गोपालराव व आई राधाबाई या दांपत्याने शेती हा मुख्य व्यवसाय सांभाळून देशी गोपालनाचाही (Cow Rearing) ध्यास घेतला. हाच वारसा सूर्यकांत चालवत आहेत.

सन २०१७ च्या दरम्यान सुमारे १८ देशी गीर गायींचे संगोपन करण्यापासून त्यांनी पूरक व्यवसायाला (Milk Production) चालना दिली. त्यावेळी लालकंधारी व देवणी अशा दोन गायी देखील गोठ्यात होत्या.

गीरच्या जंगलात भटकंती (Gir Cow)

गोठ्यात जातिवंत गायीच असाव्या या आग्रहाने सूर्यकांत गीर गायींचे माहेरघर गुजरातला पोचले. तेथे दहा-बारा दिवस मुक्काम ठोकला. गीरच्या जंगलात वेड्यासारखे भटकले. सकाळी सात वाजता शोधमोहीम सुरू व्हायची. ती संध्याकाळीच संपायची.

तेथील शेतकऱ्यांना भेटून अस्सल गायी घेण्याचा प्रयत्न असायचा. जुनागढचा भागही पिंजून काढला. गुजरातला अशा सहा-सात खेपा झाल्या. प्रत्येक खेपेत काही गायी आणल्या जायच्या. दुसरीकडे गोठ्यात पैदासही सुरू होती. सूर्यकांत यांनी जातिवंत गाय ओळखण्याच्या मुख्य खुणा अभ्यासल्या.

त्यात डोके गोल व उंच, कान लांब, शिंगे खाली वळलेली असणे, वशिंड मोठे, शेपटी लांब म्हणजे जमिनीला टेकलेली हवी आदी बाबी पाहिल्या. शोधमोहिमेत सोबत गुजरातमधील पशुवैद्यकही असायचा. त्यानेही जातिवंत गायींबाबत मार्गदर्शन केले.

Gir Cow Farming
Animal Care : भ्रूण प्रत्यारोपण तंत्रातून गीर कालवडीचा जन्म

गीर गायींचे गोकूळ

सूर्यकांत सांगतात की गुजरातमध्ये अनेक गोशाळा आहेत. तेथे जातिवंत, सुदृढ जनावरे पाहण्यास मिळतात. जातिवंत वळू त्यातीलच एका गोशाळेतून आणला. त्या वेळी तो २५ महिन्यांचा होता.

तो घेण्यापूर्वी त्याची हिस्टरी ((पेडीग्री) ) अर्थात त्याच्या आईची किंवा त्या पिढीतील गायींची दूध देण्याची क्षमता तपासली. वळू सुपूर्त करण्यापूर्वी संबंधित मंदिर ट्रस्टकडूनही खरेदी करणाऱ्या व्यक्तीची माहिती, त्याचा उद्देश या सर्व बाबींची शहानिशा केली जाते. आज सुमारे ५५ पर्यंत

गीर गायींचे गोकूळ तयार झाले आहे. पैकी ५० टक्के पैदास स्वतःच्या गोठ्यातच झाल्याचे सांगताना कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान झळकते. काही गायी प्रति दिन २० लिटर तर काही १४ ते १६ लिटरपर्यंत दूध देतात.

दररोजचे दूध संकलन ११०ते १३० लिटरच्या दरम्यान तर कमाल १५० लिटरपर्यंत पोचते. सूर्यकांत यांच्या पत्नी कल्पना व्यवस्थापन पाहतात.

गोठ्यातील व्यवस्थापन- ठळक बाबी

१) दोन कायमस्वरूपी बिहारी गवळी तैनात. त्यांची राहण्याची व्यवस्था. शेताचे काम पाहायलाही दोन व्यक्ती. एक डेअरी व्यवस्थापक. दूध, खाद्य, चारा, औषधे, दूध संकलन, पशुवैद्यकाशी संपर्क, गाईंच्या अवस्थांची नोंद, अशा बाबींची त्याच्याकडे जबाबदारी.

२) मुक्त संचार पद्धतीचा गोठा, शुद्ध, स्वच्छ पाण्याचे हौद, संगीतमय वातावरण. गायींची प्रतिकारक्षमताही चांगली. खूप थंडी किंवा खूप उष्णतेला (४२ अंश सेल्सिअस) त्या अनुकूल झाल्या आहेत.

३) गोठ्यात दोन फूट उंचीचा थर. (गादी). त्यावर गायींना बसायला खूप आवडते. पाणी, खाणे यांची जागेवरच सोय.

३) दूधवाढीसाठी सरकी वा अंबोण, गव्हाचा भुस्सा, मक्याची चुनी यांचा वापर.

४) फर्ममध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे.

५) एक बोअर, शेततळे. एप्रिल व मेमध्ये किंवा दुष्काळात शेजाऱ्याकडून पाणी घेण्यात येते.

दुधाचे ‘मार्केटिंग’

आरोग्याबाबत अधिक जागरूक झालेले ग्राहक जास्त पैसे मोजूनही देशी गायीचे दूध घेण्यास तयार आहेत. त्यातूनच ‘ब्रॅण्ड’ तयार करून विक्रीचा विचार पुढे आला. त्यासाठी ‘मार्केटिंग’ महत्त्वाचे होते. देगलूर हे तालुका ठिकाण असून सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांची संख्या व ठिकाणे शोधली.

त्यानुसार सोसायटी परिसरात स्टॉल उभारला. आमच्याकडे जातिवंत गीर गायी आहेत. त्यांच्या काटेकोर व्यवस्थापनातून आरोग्यदायी, उत्तम गुणवत्तेचे दूध आम्ही उपलब्ध करतो असे ग्राहकांना सांगण्यास सुरवात केली.

देशी गोपालनांसबंधीशी प्रशिक्षण प्रमाणपत्रे, माहितीपत्रके स्टॉलवर उपलब्ध केली. व्हॉट्स ॲपचा आधार घेतला. ग्राहकांना दुधाचा स्वाद मोफत देण्यात आला.

ग्राहकांचा विश्‍वास जिंकणे महत्त्वाचे होते. कुणीही आले, काहीही विकतेय असा दृष्टिकोन तयार होऊ नये हा सूर्यकांत यांचा प्रयत्न होता. सर्व प्रयत्नांना हळूहळू यश येत गेलं.

Gir Cow Farming
Gir Cow Farming: जातिवंत दुधाळ गीर गोवंश पैदास हेच ध्येय...

मागणी वाढली

दुधाला प्रति लिटर ८० रुपये दर असून ‘होम डिलिव्हरी दिली जाते. वितरणासाठी पाच ‘डिलिव्हरी बॉईज’ नेमले आहेत. पूर्वी दर ७० रुपये असल्याने काही ग्राहक मुलांसाठीच हवे असे सांगून दररोज अर्धा लिटरच घ्यायचे. पण हळूहळू मागणी वाढली.

मग ग्राहकांचे ‘फीडबॅक’ घेण्यास सुरवात केली. त्यातून संख्या अजून वाढण्यास मदत झाली. दुधाची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याने ‘माऊथ पब्लिसिटी’ झाली. आजमितीला १०० ते १२० पर्यंत ग्राहक तयार करण्यापर्यंत मजल मारली आहे. ग्राहकांमध्ये डॉक्टरांची संख्या अधिक आहे.

तूपनिर्मिती

सूर्यकांत यांच्या आई राधाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली दह्याचे विरजण लावून घरगुती स्वरूपाने तूपनिर्मिती होते. महिन्याला अंदाजे १५ ते २० किलो प्रमाणात प्रति लिटर तीन हजार रुपये दराने विक्री होते. विशेष म्हणजे दूध व तूपही सीलबंद काचेच्या बाटलीतून ग्राहकांपर्यंत पोचवले जाते.

गायींच्या सानिध्यातील जीवनशैली

सूर्यकांत यांनी वेदखिलार गोशळा तर्फे आयोजित देशी गोसंगोपनाची शास्त्रीय प्रशिक्षणे घेतली आहेत. महाराष्ट्रासह गुजरातेतही गोशाळांना भेटी दिल्या आहेत. ते म्हणाले की गुजरातमध्ये एका संस्थानिकाकडे तब्बल दोन हजार गीर गायींचे संवर्धन होत आहे.

एखादी व्यक्ती उदासीन अवस्थेत (डिप्रेशन) असेल किंवा रक्तदाब वा तत्सम त्रास असेल तर गायींच्या सान्निध्यात राहिल्यास ती पूर्ण बरी होऊन समाधानी जीवन जगू लागते. दोन वळू व श्‍वानाचेही पालन केले आहे.

या सर्वांच्या संगतीत राहताना सर्व समस्यांचा आम्हाला विसर पडतो. जगण्याची ऊर्मी वाढते अशी भावना पोतुलवार कुटुंब व्यक्त करते.

Gir Cow Farming
Gir Cow : गीर गाईची वैशिष्ट्ये काय आहेत?

दुधाची गुणवत्ता

शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीचे, कोणत्याही रासायनिक प्रतिजैविकांचा वा औषधांचा वापर नसलेले दूध राधेगोपाल या ब्रॅण्डद्वारे विकण्यात येते. आई-वडिलांच्या नावाने ‘ब्रॅण्डनेम’ तयार केले आहे.

दुधातील खनिजे, जीवनसत्वे , प्रथिने, एसएनएफ आदी घटकांची प्रयोगशाळांमधून वेळोवेळी तपासणी होते. ग्राहकांनाही त्याचा ‘फीडबॅक’ देण्यात येतो. त्यामुळे उत्पादनाविषयी विश्‍वासार्हता तयार होते. दूध व तुपासाठी फूड सेफ्टी अर्थात ‘एफएसएआयआय’चा परवाना घेतला आहे.

सेंद्रिय पद्धतीने शेती व उत्पादने विक्री

पोतुलवार यांची ३० एकर शेती आहे. आठ एकरांत चारा पिके आहेत. बाकी हंगामी पिके असतात. सुमारे ७० ट्रॉली शेणखत वर्षभरात मिळते. सुरवातीला त्याची विक्री केली. आता घरच्या शेतातच वापर होतो. त्यातून जमिनीची सुपीकता वाढली आहे. चाराही पौष्टिक तयार होतो. पंचगव्य, घन जीवामृत, दशपर्णी अर्क आदींची निर्मिती होते. स्वतःकडील तसेच अन्य सेंद्रिय उत्पादकांकडून घेऊन ते उत्पादनांची विक्रीही करतात.

काही उदाहरणे पुढीलप्रमाणे.

-लाकडी घाण्याचे तेल.

-भाजीपाला, करडई, शेंगदाणा, सूर्यफूल, मोहरी, तीळ तेल

-गूळ

-पिवळी ज्वारी, टाळकी ज्वारी, गहू, बाजरी

-लोणचे, पापड

-गोमूत्र व अर्क, गोमय पणती, दिवा, गोवऱ्या, धूपकांडी, पत्रावळी.

सूर्यकांत पोतुलवार- ९०९६६०३०८३, ७०३८२७७३४४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com