Animal Care : भ्रूण प्रत्यारोपण तंत्रातून गीर कालवडीचा जन्म
पुणे ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (Mahatma Phule Agriculture University rahuri) गो संशोधन व विकास प्रकल्पातील (Cow Research And Development Project) गाईंमध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा (Embryo Transfer Technique) अवलंब करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे नुकताच जातिवंत गीर कालवडीचा (Gir Heifer) जन्म झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर २८ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांच्या उपस्थितीत भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान वापराचा प्रारंभ करण्यात आला होता.
पुणे कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने म्हणाले, ‘‘महात्मा फुले कृषी विद्यापीठातील गो संशोधन व विकास प्रकल्पामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या वापरातून नुकताच जातिवंत गीर कालवडीचा जन्म झाला. यासाठी सरोगेटर मदर म्हणून संकरित गाईची निवड करण्यात आली होती. नवजात गीर कालवडीचे वजन २२.९ किलो आहे. भ्रूण संकरीकरणासाठी वापरलेल्या बायफ संस्थेमधील वळूच्या (विष्णू) आईचे प्रतिवेतातील दूध ४,१६५ लिटर आणि फॅट ५ टक्के आहे. ‘एनडीडीबी’मधील भ्रूण दाता गाईचे (क्र.१८५) दूध प्रति वेत ३,६०० लिटर आहे. राहुरी येथील ‘एनडीडीबी‘च्या संशोधन केंद्रामार्फत भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येत आहे. उच्च वंशावळीचा देशी गाईंच्या संवर्धनासाठी हे तंत्र फायदेशीर आहे.’’
देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रातील तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र शासनाने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राद्वारे विद्यापीठ प्रक्षेत्र आणि शेतकऱ्यांकडील गाईंमध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे १५० पेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होईल.’’
विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, डॉ. कांबळे यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सोमनाथ माने, डॉ. धीरज कणखरे, डॉ. विष्णू नरवडे, डॉ. प्रमोद साखरे, डॉ. अडांगळे तसेच ‘एनडीडीबी‘ चे डॉ. शिवकुमार पाटील यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.