साधारणपणे दहा वर्षांपूर्वी मी गीर गोपालनास (Gir Cow rearing) सुरवात केली. सुरवातीला घरच्या दुधासाठी चाकण बाजार (Market) आणि कल्याण बाजारातून दोन गीर गाईंची (Gir Cow) खरेदी केली. गाईंचा सांभाळ करताना गोवंश सुधारणा अभ्यास सुरू झाला. त्याचवेळी लक्षात आले की, मी खरेदी केलेल्या गीर गाई जातिवंत नाहीत.
आपल्याकडे ज्या गीर गाई दिसतात त्यामध्ये स्थानिक किंवा कॉंक्रेज गोवंशाचा संकर दिसतो. शुद्ध जातिवंत दुधाळ गीर मिळत नाही. त्यामुळे जातिवंत गीर गोवंशासाठी गुजरात गाठले. तेथील पैदासकारांसोबत चर्चा केली, जातिवंत गीर पाहिल्यानंतर पैदाशीचे धोरण कसे असावे हे समजले. गोठ्यात दुधाळ जातिवंत गीर गोवंश तयार करण्यासाठी आराखडा केला.
आज दहा वर्षांनी माझ्याकडे जातिवंत भावनगर ब्लड लाईनच्या दुधाळ गीर गाई, कालवडी,वळू आहेत. स्थानिक देशी गोवंश हा भारतीय शेतकऱ्यांचा ‘फॅमिली मेंबर' आहे. देशी गोवंश हा जमीन सुपीकता, मानवी आरोग्य, दुग्धोत्पादन, पूरक उद्योग आणि शास्त्रशुद्ध जातिवंत पैदास या विषयाला धरूनच किफायतशीर ठरतो. पुणे शहराजवळील रावेत भागातील गीर गोवंशपालक रविशंकर शशिकांत सहस्रबुद्धे शास्त्रशुद्ध गीर पैदास आणि संगोपनातील अनुभव सांगत होते...
रावेत परिसरात रविशंकर सहस्रबुद्धे यांची शेती आणि मातृकाश्रम गोशाळा आहे. गेल्या दहा वर्षांत रविशंकर सहस्रबुद्धे यांनी जातिवंत गीर गोवंश पैदाशीमध्ये महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. आज त्यांच्याकडे देश, परदेशातील पशूतज्ज्ञ अभ्यासासाठी येतात. गीर संगोपनाबाबत ते म्हणाले की, गुजरात राज्य गीर गोवंशाचे उगम स्थान असले तरी गेल्या काही वर्षांत स्थानिक गोवंशाशी झालेला संकर आणि पैदास धोरणाकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे जातिवंत शुद्ध गीर गोवंशाची संख्या कमी होत आहे.
फार थोड्या लोकांकडे जातिवंत गीर आहे. गेली सात वर्षे मी जातिवंत दुधाळ गीर गोवंशासाठी गुजरातमध्ये जाऊन पिढीजात गीर पशूपालकांशी संगोपन आणि जातिवंत पैदाशीबाबत चर्चा करतोय. त्यातूनच मला दिशा मिळाली. येथील गोशाळांमध्ये जातिवंत गाय आणि वळूची शास्त्रीय वंशावळ उपलब्ध आहे.
मला यातील दोन गाई हव्या होत्या, परंतु त्यांनी गाई देण्यास नकार दिला. परंतु जातिवंत पैदासीबाबत मार्गदर्शन केले. चर्चेतून असे समजले की, काही पशुपालकांना एक सड बाद, वय जास्त झाल्याने जातिवंत गाई विकायच्या होत्या. काही गाईंमध्ये गाभण होण्याची समस्या होती, काही सतत आजारी पडायच्या.
अशा चार जातिवंत गीर गाई विकत घेतल्या. गाई आणल्यानंतर पशू तज्ज्ञांच्या सल्याने त्यांच्या आरोग्यात सुधारणा केली. पुरेसा चारा, पोषक खाद्य आणि योग्य औषधोपचार केले. ज्या गाईमध्ये गाभण राहण्याची अडचण होती, तिच्यावर योग्य उपचार करत माज चक्र सुरळीत केले. दीड वर्षांनंतर गाय गाभण राहिली.
जातिवंत पैदास धोरण असल्याने गाईसोबत जातिवंत वळू निवड आणि धोरणात्मक पैदासीवर भर दिला. माझ्याकडे चार गाई असल्या तरी कृत्रिम रेतनासाठी एकच वळू न वापरता विविध वळूंचे गुणधर्म आणि त्यांच्या कालवडी आणि वैशिष्ट्यांचा अभ्यास करून योग्य वळू निवडला. माझे वडील शशिकांत सहस्रबुद्धे यांच्याकडूनच गीर गोवंश सुधारण्याची प्रेरणा मिळाली.
जातिवंत पैदास धोरण ः
वळू निवडीबाबत सहस्रबुद्धे म्हणाले की, रेतन करताना गाईमधील शारीरिक कमतरता लक्षात घेऊन जन्मणाऱ्या कालवडीत योग्य सुधारणेसाठी मी रेतनासाठी योग्य वळू निवडला. माझ्याकडील सात
गाईंच्या रेतनासाठी ‘बाएफ'कडील ‘विष्णू' आणि एनडीडीबीकडील ‘जी-०१' तसेच गुजरातमधील भावनगर ब्लडलाईनचे गोंडालियो, राज, सारंग, प्रिन्स, पांखालिओ, लिलिडीनो हे नोंदणीकृत वळू निवडले. त्यावेळी एक रेतमात्रा ३,००० रुपयांना मिळत असे. हे वळू निवडायचा मुख्य उद्देश म्हणजे जलद गतीने जातिवंत दुधाळ पिढी गोठ्यात तयार करणे हा होता.
वळू निवडीबाबत सहस्रबुद्धे म्हणाले की, मी वळूच्या कालवडींची गुणवत्ता तपासली, शरीर,कासेची ठेवण पाहिली आणि मग माझ्याकडील गाईच्या कमतरतेनुसार वळू निवडला. एखाद्या गाईची कास,सड रचना आणि दुधात कमतरता असेल तर अशा गाईसाठी मी ज्या वळूची दुधाची वंशावळ चांगली आहे, कालवडीचे सड, कास योग्य तयार झाली आहे, असा वळू रेतनासाठी निवडला.
यामुळे कास,सडाची योग्य रचना आणि दुधाळ गुणधर्म असलेली कालवड माझ्या गोठ्यात तयार झाली. माझ्याकडील एक गाय आरोग्यदृष्ट्या योग्य तसेच दूधही चांगली देते, परंतु तिच्यामध्ये जातिवंतपणाची कमतरता होती. मी त्या गाईच्या रेतनासाठी जातिवंत गुणधर्म असलेला वळू निवडला. काही गाई दुधाला उत्तम होत्या, पण त्यांची उंची, देखणेपणा कमी, वशिंड बारीक होते. अशा गाईसाठी मी गीर गोवंशाच्या सगळ्या गुणांनी परिपूर्ण वळू निवडला. यातूनच जातिवंत, दुधाळ पिढी गोठ्यात तयार होत गेली.
एकच वळू सर्व जातिवंत गुणधर्म दाखवेल असे नाही, परंतु किमान ३ ते ४ योग्य गुणधर्म नवीन पिढीत आणू शकतो, यावर भर देत मी वळूची निवड करतो. माझ्याकडे सध्या भावनगर ब्लडलाईनचे दोन सिद्ध वळू आहेत. या वळूंपासून तयार झालेल्या कालवडींचे वशिंड, कास, सडाची ठेवण आणि दूध उत्पादनवाढीत सातत्य होते.
आज हे सिद्ध वळू माझ्या गोशाळेचा ठेवा आहेत. याचबरोबरीने विविध वळुंच्या जातिवंत कालवडी माझ्या गोठ्यात पहावयास मिळतात. गीर गोवंश पैदासीसाठी भावनगरचे प्रसिद्ध गीर गोपालक प्रदीपसिंह रावळ यांचे मला मार्गदर्शन मिळते.
जातिवंत कालवडींची पैदास ः
कालवड संगोपनाबाबत सहस्रबुद्धे म्हणाले की, माझ्याकडे १८ ते २० महिन्यात कालवड रेतनासाठी येते. चांगला आहार, आरोग्य व्यवस्थापनामुळे कालवड दोन वर्षात गाभण होते. तीन वर्षांत पहिले वेत देते. या पहिल्यांदा विणाऱ्या गाईचे दिवसाला सरासरी दूध उत्पादन १४ लिटर आहे.
पहिल्या वेतातील दुधाचा आलेख सरासरी २८०० लिटर आहे. आज माझ्या गोठ्यात ८७ जातिवंत गीर गोवंश आहे, त्यातील ९० टक्के माझ्या गोठ्यात जन्मलेला आहे. ही सुधारणा केवळ शास्त्रीय जातिवंत पैदास धोरणामुळे आहे. पशुपालक नेमके वंशावळ, योग्य व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करतात,त्यामुळे गाय वेळेवर गाभण होत नाही, दूध कमी देते, आरोग्याच्या तक्रारी वाढतात.मग गोवंशाला दोष दिला जातो.
भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर ः
सहस्रबुद्धे यांनी वळूचा वापर,कृत्रिम रेतनाबरोबरीने भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा अवलंब केला. याबाबत ते म्हणाले की, माझ्या गोठ्यात सर्व गाई, वळू हे भावनगर ब्लड लाईनचे आहेत. हा गोवंश देखणा आणि काटक आहे, दूध उत्पादन चांगले आहे. गीर गोवंशाचे सर्व गुणधर्म या ब्लड लाईनमध्ये दिसतात.
जातिवंत गाय आणि वळूपासून माझ्या गोठ्यात तयार झालेली पिढी पहिल्या वेतामध्ये सरासरी प्रति दिन १४ लिटर दूध देत आहे. पहिल्या पिढीतील कालवडी मी भ्रूण प्रत्यारोपणासाठी घेतल्या. माझ्या गोठ्यातील २३ वासरे ही भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून जन्मलेली आहेत. या तंत्रज्ञानाचा फायदा म्हणजे जी कालवड अजून एकदाही व्यायली नाही,तिचे स्त्रीबीज वापरून तयार झालेली १० वासरे माझ्या गोठ्यात आहेत. त्यामुळे एकाच पिढीत चांगली जनुकीय सुधारणा दिसून आली. यासाठी ज्येष्ठ पशूतज्ज्ञ डॉ. श्याम झंवर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
भ्रूण प्रत्यारोपणासाठी माझ्या गोठ्यातील गाईचे स्त्रीबीज आणि भावनगरच्या निवडक वळूच्या रेतमात्रा मी डॉ. श्याम झंवर यांना दिल्या. प्रयोगशाळेत त्यांनी यापासून भ्रूण तयार करून ते सरोगेटेड गाईच्या गर्भाशयात सोडले. वासरू जन्मल्यानंतर पाच दिवसांनी माझ्या गोठ्यात आणून त्याचे पुढील व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने करतो.
माझ्याकडे पूर्णपणे जातिवंत भारतीय गीर गोवंश तयार झाला आहे. त्यामुळे राज्य आणि परराज्यातील पशुपालक तसेच पशुसंवर्धन विभागाकडूनही माझ्याकडील ६ ते ७ महिन्यांच्या मादी वासरांच्याबरोबरीने नर वारसांना पैदाशीसाठी मागणी आहे. आज गुजरातमधील पशुपालक माझ्याकडून नर वासरू आणि कालवड नेतात.
त्यांची किंमत ही गोवंशाचा देखणेपणा, वंशावळ, जातिवंत गुणधर्मावर अवलंबून आहे. आपण आपल्या भौगोलिक परिस्थितीत वाढलेले आणि आपल्याकडील जातिवंत गोवंशातून पुढील पिढी तयार करणे गरजेचे आहे. दर पिढीमध्ये सुधारणा करण्यास वाव आहे आणि ते शास्त्रशुद्ध पैदास धोरणातून शक्य आहे. जातिवंत पैदाशीतून माझी गोशाळा शाश्वत होत आहे.
गीर गोवंशाचे व्यवस्थापन ः
- मुक्त संचार गोठ्यात ८७ गीर गोवंश (वासरे, कालवड,गाई, वळू).
- भावनगर ब्लड लाईनच्या तीन प्रकारांचे संवर्धन.
- तेरा एकरातील गोशाळा प्रक्षेत्रामध्ये मुक्त संचार गोठा, हवेशीर शेड. प्रत्येक गाईला पुरेशी जागा
- वळू, कालवडींचे वयानुसार वेगळे संगोपन. गाभण गाई, व्यायलेल्या गाईंसाठी स्वतंत्र गोठा.
- दिवसभर मुक्त संचार, संध्याकाळी गाई आणि वळू गोठ्यात बांधले जातात.
- मुक्त संचार पद्धतीमुळे गाई, वळूचे चांगले आरोग्य, त्यांना पुरेसा व्यायाम होतो. औषधोपचार अत्यंत कमी लागतात.
- स्वतःच्या शेतामध्ये हंगामानुसार मका,ज्वारी,बाजरी तसेच नेपिअर चारा लागवड.
- डोंगरी गवत, कडबा, भुईमूग, सोयाबीन पाल्याचा पशू आहारात वापर.
- टिएमआर नुसार पशूखाद्य निर्मिती. यामध्ये मका, मोहरी पेंड, शेंगदाणा पेंड, गहू भुसा, तूर चुणी, मीठ, क्षार मिश्रणाचा वापर. पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतील अशा पद्धतीने खाद्य मिश्रणाची निर्मिती.
- गोठ्यात सैंधव मिठाचे खडे ठेवले जातात. गरजेनुसार गाई खडे चाटतात.
- दैनंदिन पशुखाद्यात ॲझोला तसेच अकरा वनौषधींचा वापर. यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत.
- सकाळी हिरवी वैरण आणि संध्याकाळी कोरडी वैरण. दोन्ही वेळा अंबोणाचा वापर. दुधाळ गाई, गाभण गाईंना प्रति दिन ३.५ ते ४ किलो अंबोण, वासरांना वयोगटाप्रमाणे प्रति दिन अर्धा ते दीड किलो अंबोण.
- वेळेवर लसीकरण, औषधोपचारावर भर. मुक्त संचार गोठ्यात ग्रुमींग ब्रशला गाई, वळू अंग घासतात. त्यामुळे त्वचा चांगली राहाते. परजिवींचा प्रादुर्भाव नाही.
- प्रत्येक जनावरास इनाफ टॅगिंग. गाईंना सेन्सर बसवल्याने माज, रेतनास असलेली योग्य वेळ तसेच दररोज आरोग्याच्यादृष्टीने शारीरिक बदलाच्या संगणकावर नोंदी. त्यानुसार नियोजन. प्रत्येक जनावराची वंशावळ उपलब्ध.
- सध्या दुधात दहा गाई. एक गाईचे प्रति दिन सरासरी ८ ते १४ लिटर दूध उत्पादन.
- दररोज ११० लिटर दूध उत्पादन. ग्राहकांना ७० लिटर दुधाची थेट विक्री. प्रति लिटर १२० रुपये दर.
- अतिरिक्त दुधापासून तूप निर्मितीवर भर. प्रति किलो ४६०० रुपये दर.
- शेणापासून गोवरी, धूपकांड्या निर्मिती.
- शेण, गोमूत्रापासून बायोगॅस निर्मिती, गांडूळ खत निर्मिती. खताचा स्वतःच्या शेतीमध्ये वापर.
गीरमध्ये विभागानुसार विविधता ः
गीर गोवंशामधील रंगाच्या विविधतेबाबत (ब्लड लाईन्स) रविशंकर सहस्रबुद्धे म्हणाले की, गीर गोवंशामध्ये रंगानुसार आणि त्यांच्या संगोपनाच्या प्रक्षेत्रानुसार पाच प्रकार दिसून येतात. गुजरातमधील पैदासकारांनी या गोवंशामध्ये शुद्धता जपली आहे. गुजरातमधील गोपालक त्यांची ठळक गुणवैशिष्टे पुढील प्रमाणे सांगतात...
१) भावनगर ः देखणा गोवंश, काबरा रंग (पांढरा,तांबूस मिश्र रंग), दूध उत्पादनात सातत्य. प्रति दिन सरासरी दूध उत्पादन क्षमता १८ ते २० लिटर.
२) जुनागढ ः धिप्पाड गोवंश. लाल रंग. प्रति दिन सरासरी दूध उत्पादन क्षमता १४ ते १८ लिटर.
३) जसधनः बारा वेळा राष्ट्रीय चॅम्पियन गोवंश.पिवळसर,लाल रंग मिश्रणाची त्वचा.प्रति दिन सरासरी दूध उत्पादन क्षमता १५ ते १८ लिटर.
४) भाडवा दरबार ः भावनगर गोवंशासोबत साधर्म्य. प्रति दिन सरासरी दूध उत्पादन क्षमता १४ ते १८ लिटर.
५) गोंडल ः लाल, भगरा रंग मिश्रित त्वचा, शरीराची ठेवण मध्यम ते भक्कम. कासेची चांगली ठेवण. प्रति दिन सरासरी दूध उत्पादन क्षमता १५ ते १८ लिटर
‘राष्ट्रीय गोपाल रत्न' पुरस्काराने सन्मान
नवी दिल्ली येथे केंद्रीय पशू संवर्धन मंत्रालयातर्फे आयोजित राष्ट्रीय पशू चर्चासत्रात रविशंकर सहस्रबुद्धे यांना गीर गोवंश पैदासीमध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान अवलंबाचे अनुभव सांगण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
जातिवंत पैदाशीबाबत त्यांचा राज्य तसेच केंद्रीय पशुसंवर्धन विभागातर्फे गौरव करण्यात आला आहे. दरवर्षी परदेशातील पशूतज्ज्ञ आणि पशू महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांच्या गोशाळेत पैदास तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन अभ्यासासाठी येतात.
जातिवंत गीर गोवंश संवर्धन, शास्त्रशुद्ध पशूपैदास वंश सुधार आणि शाश्वत देशी गोपालनातील कार्य लक्षात घेऊन केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि डेअरी मंत्रालयातर्फे नुकतेच बेंगळुरू येथे रविशंकर सहस्रबुद्धे यांना यंदाच्या ‘राष्ट्रीय गोपाल रत्न' पुरस्काराने गौरविण्यात आले.
संपर्क ः रविशंकर सहस्रबुद्धे, ९८५०९१०९०९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.