Cattle Conservation : सेवाभावी वृत्तीने नृसिंहवाडीत गोसंवर्धन

Srivasudevananda Saraswati Seva Sanstha : गोसंवर्धन हाच उद्देश ठेवून कोल्हापूर जिल्‍ह्यातील नृसिंहवाडी येथे श्रीवासुदेवानंद सरस्वती बहुउद्देशीय सेवा संस्थेने नऊ वर्षांपूर्वी गोशाळा उभारली.
Goshala
GoshalaAgrowon

संजय शिरटीकर

Gosvardhan : कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता. शिरोळ) हे श्री दत्तगुरूंचे धार्मिक स्थळ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. वर्षभर हे स्थान भाविकांच्या गर्दीने गजबजलेले असते. येथे पौराहित्य करण्यापासून ते वैद्यकीय, अभियांत्रिकी व अन्य व्यवसायांत कार्यरत शंभर मंडळी २०१४ च्या दरम्यान देशी गोसंवर्धन या उद्देशाने एकत्र आली. करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते गायीचे पूजन करून कार्यास प्रारंभ झाला. सन २०१६ मध्ये श्री वासुदेवानंद सरस्वती बहुउद्देशीय सेवा संस्था या नावाने संस्था व गोशाळेची नोंदणी झाली. शिरोळ रस्त्यावर भाडेतत्त्वावर अर्धा एकर जागा घेण्यात आली. राजस्थान, हरियाना येथून गायी आणल्या. गोशाळेबाबत परिसरात माहिती होऊ लागली तसतशा काही शेतकऱ्यांनीही गायी दिल्या. वृद्ध गायींचीही देखभाल सुरू केली.

..अशी आहे गोशाळा

मुक्त व बंदिस्त अशा दोन्ही प्रकारे गोठ्याची उभारणी.

थारपाकर, साहिवाल, खिलार आदी विविध जातींच्या सुमारे ६० गायी.

पाच कामगार तैनात.

काही अंतरावरच दोन एकर जागा भाडेतत्त्वावर घेऊन चारा उत्पादन.

सर्व वयोगटांतील गायी असल्याने प्रत्येकीवर जातीने लक्ष देत औषधोपचार व लसीकरण.

Goshala
Power Supply : सुरळीत वीजपुरवठ्यासाठी रामेश्वर येथे ‘रास्ता रोको’

संस्थेची मंडळीच उचलतात आर्थिक भार

गोशाळा चालविण्याचा खर्च मोठा असतो. कामगारांचे दर आठवड्याला वेतन असते. संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनीच आपापल्‍या परीने गोशाळेचा हा खर्च उचलला आहे. अनेक शेतकरी चारा दान म्‍हणून देतात. परिसरातील व्यावसायिक घरगुती कार्यक्रमानिमित्त रक्कम भेट देतात. कोणाकडे सक्तीने वर्गणी मागितली जात नाही. नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान, ब्राह्मण सभा आदी संघटनांनी सुरुवातीला आर्थिक तसेच वस्तुरूपी मदत केली आहे. संस्थेचे (ट्रस्ट) अध्यक्ष म्हणून संजय शिरटीकर यांच्याकडे जबाबदारी आहे. ते स्वतः प्रगतिशील शेतकरी आहेत. आपली शेती सांभाळत ते दररोज काही वेळ गोशाळेसाठी देतात. दत्तात्रेय रुक्के पुजारी, भालचंद्र पुजारी, महेश विभूते पुजारी, संतोष डोंगळे, आदींसह वासुदेव परिवार हे सर्व जण व्‍यवस्थापनात मोलाची भूमिका बजावतात. किरण मिटके, वसंत माने, सुनील नरके, श्रीपती भोसले आदी कर्मचारी सेवा बजावतात. शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्‍यात आला आहे.

उत्पादने व विक्री

गोशाळा चालवायची तर उत्पन्न स्रोत निर्माण करावेच लागतात. त्यादृष्टीने येथे तयार होणाऱ्या पदार्थांच्या विक्रीतून आर्थिक नियोजन केले जाते. दररोज संकलन होणारे काही दूध नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात वापरण्यात येते. काही रतीब म्हणून देण्यात येते. तुपाची तीन हजार रुपये प्रति किलो दराने विक्री होते. गोमूत्र अर्क, शेणी यांचीही विक्री होते. वाडीचे मोठे धार्मिक महत्त्व पाहता राज्यभरातून भाविकांची रेलचेल असते. साहजिकच दत्त दर्शन झाल्यानंतर अनेक जण गोशाळेस भेट देतात. यथोचित मदत करतात. पदार्थांची खरेदी करतात. बाहेरील गोशाळांमध्ये तयार होणारे पदार्थही येथे विक्रीस ठेवण्यात येतात.

शेतकऱ्यांकडे सांभाळ

ज्या शेतकऱ्यांना गाय पालनासाठी हवी आहे त्यांना ती सांभाळण्यासाठी मोफत दिली जाते. तत्पूर्वी संबंधित शेतकऱ्याची पूर्ण चौकशी करून तो गाय पालनासाठी सक्षम आहे का याची खात्री केली जाते. गोशाळेतील गायींची विक्री केली जात नाही.

संजय शिरटीकर ९४२००८१४५१

Goshala
Kolhapur Sangli Rain Update : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचा दिलासा, रब्बी पेरण्यांना वेग

महापुरातून वाचवले गोधन

सन २०१९ व २०२१ ही वर्षे सांगली, कोल्हापूर जिल्हा आणि साहजिकच शिरोळ तालुक्यासाठी महापुराची होती. यात कोट्यवधी रुपयांची हानी झाली. हजारो जनावरे मृत झाली. नृसिंहवाडी गाव पूर्णपणे पाण्यात होते. स्वतःचे घर की जनावरे वाचवायची या द्विधा परिस्थितीत नागरिक होते. गोठा पूर्णपणे बुडणार याची खात्री झाली. त्या वेळी काहीही करून गोधन वाचवायचे यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न सुरू केले. विपरीत परिस्थितीत वाहनांची जुळवाजुळवकरीत तातडीने गायींना सुरक्षित स्थळी हलविले. चाऱ्याची आबाळ होती. पण ज्यांच्याकडे उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून तो संकलित करण्यात आला. अशा रीतीने महापुराच्या भयंकर संकटातून गायींना वाचविण्यात संस्थेला यश आले.

लम्पी रोगापासून वाचवले

अलीकडील काळात लम्पी रोगाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अशावेळी प्रादुर्भाव झालेल्या गायींना तातडीने वेगळे ठेवणे, धूर करून डासांना गोठ्यापासून दूर ठेवणे आदी बाबी करण्यात आल्या. तब्येत बिघडल्याचे वाटताच तातडीने औषधोपचार करण्यात आले. त्यामुळे एकाही गायीची जीवितहानी झाली नाही.

मृत्यूच्या दारातून गायीला परत आणले

कुटुंबातील सदस्य आजारी असेल, तर संपूर्ण कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य हरवते. तसाच प्रसंग गोशाळेत घडला. राजस्थानातून थारपारकर जातीची गाय आणली. इथे तिची तब्येत दिवसेंदिवस बिघडू लागली. सांगली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात काढलेल्या ‘एक्स रे’मध्ये तिच्या पोटात तार व ‘नट-बोल्ट’चे अवशेष असल्याचे लक्षात आले. शस्त्रक्रियेसाठी ५० हजार रुपये खर्च अपेक्षित होता. गाय वाचली पाहि़जे हाच संस्थेच्या कार्यकर्त्यांचा निर्धार होता. रकमेची जुळवाजुळव केली. शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. आज गाय ठणठणीत असून, आनंदी जीवन व्यतीत करीत आहे. गायीप्रति असलेल्या निष्ठेमुळेच मृत्यूच्या दारातून ती परत आली याचे मोठे समाधान गोशाळेच्या कार्यकर्त्यांना आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com