
Agriculture Success Story : व्यावसायिक पीक उत्पादकांचे गाव अशी खैरगाव देशमुखची (ता. केळापूर, जि. यवतमाळ) ओळख आहे. याच गावात कृष्णराव देशट्टीवार यांची वडिलोपार्जित ७० एकर शेती आहे. सन १९८६ मध्ये त्यांचे वडील अण्णाराव यांचे निधन झाले. त्या वेळी कृष्णराव यांचे वय १६ वर्षांचे होते. मात्र वयाच्या बाराव्या वर्षापासूनच कृष्णराव शेतीचे धडे वडिलांकडून घेत होते.
त्या वेळी काका भाऊराव यांचे सहकार्य व्हायचे. सन २००२ मध्ये काकांचेही निधन झाल्यानंतर शेतीची संपूर्ण जबाबदारी कृष्णरावांवर आली. कापूस, तूर, नंतरच्या काळात भुईमूग, सोयाबीन यासारखी पिके घेतली जात होती. त्यातून गाठीशी पैसे जोडत ३० एकर जमीन कृष्णरावांनी घेतली. आज त्यांची एकूण जमीनधारणा १०० एकरांवर पोहोचली आहे. सध्या या गावापासून १० किलोमीटरवर असलेल्या पांढरकवडा येथे ते राहतात. तेथून दररोज जाऊन-येऊन करून शेती सांभाळतात.
तालुक्यात पहिल्यांदा केले ठिबक
एकूण क्षेत्रापैकी ४० एकर शेतीच्या भागातून नाला व सोबतच सायखेडा प्रकल्पाचा कालवा गेला आहे. त्या माध्यमातून सिंचनाचे पर्याय आहेत. दोन विहिरी असून त्यांनाही मुबलक पाणी आहे. या विहिरींना आडवे बोअर घेण्यात आले आहेत. त्यामुळे जूनपर्यंत पाण्याची शाश्वती राहते. सन २००९ मध्ये केळापूर तालुक्यात पहिल्यांदा ठिबक सिंचन प्रणाली उभारण्यासाठी कृष्णरावांनी पुढाकार घेतला. सुरुवातीला सात एकरांत ही यंत्रणा होती. पुढील वर्षी ५० एकरांवर आणि टप्प्याटप्प्याने आज हे क्षेत्र ९५ एकरांपर्यंत नेण्यात आले आहे.
जमीन सुधारणेवर भर
कृष्णरावांची जमीन हलकी, टणक आहे. परिणामी, ‘जेसीबी’ यंत्राच्या माध्यमातून पाइपलाइनसाठी खोदकाम होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अखेरीस ब्लास्टिंग करून त्यातून खोदकाम करून सिंचनासाठी पाइप अंथरण्यात आले. पन्नास वर्षांपासून जमीन सुधारणेवर भर देण्यात आला. त्यासाठी सायखेडा प्रकल्पातील गाळ वापरला. बांधबंदिस्ती केली. शेतातील दगड साफ केले. दरवर्षी १५ ते २० हजार रुपयांच्या शेणखताची खरेदी करून त्याचा वापर शेतात सुरू केला.
पीक पद्धती
कृष्णरावांनी आपले क्षेत्र, त्याची भौगोलिकता, पाणी, हवामान, मजूरटंचाई, बाजारपेठेचे अंतर व उत्पन्नाची शाश्वती या बाबींचा विचार करून पिकांची निवड केली व तीच कायमस्वरूपी केली. यात फळपिकांमध्ये लिंबू, केळी, पेरू, कलिंगड तर हंगामी पिकांमध्ये कापूस व त्यातही तूर पिकाला अधिक प्राधान्य दिले. पूर्वी ते कोबी, मिरची आदी काही भाजीपाला घेत. चेन्नई, नागपूर, हैदराबाद आदी बाजारपेठांमध्ये त्याचा पुरवठा करायचे. मात्र मजुरांचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर भाजीपाला पिके घेणे थांबवले.
विविध पिकांचे नियोजन- व्यवस्थापन
लिंबू -ः नजीकच्या तेलंगण राज्यातील लिंबू बागांना भेटी दिल्यानंतर या पिकाची निवड करणे शक्य झाले. त्यातून सन २०१६ मध्ये लिंबू लागवड केली असून तीन प्रकारचे वाण आहेत. हे पीक कमी देखभालीत वर्षभर उत्पादन व साहजिकच उत्पन्न देत राहते. बिगर हंगामात २५ रुपये प्रति किलो मिळणारा दर उन्हाळ्याच्या दिवसात ६० रुपयांपर्यंत पोहोचतो. व्यापारी बांधावर येऊन खरेदी करतात.
चंदन व पेरू ः सुमारे सहा वर्षांपूर्वी चंदनाच्या झाडांची लागवड केली आहे. चंदनासाठी यजमान पीक म्हणून पेरूची लागवड केली असून, सुमारे ५०० पर्यंत झाडे आहेत. पेरूच्या प्रति झाडापासून सरासरी ४० किलो उत्पादन मिळते. तर प्रति किलो किमान २० रुपये दर मिळतो. छाटणीचे व्यवस्थापन करून हे पीकही वर्षभर उत्पादन देत असल्याने त्यातून काही लाख रुपयांचा नफा होत आहे. अजून सुमारे दहा वर्षांनी चंदनही विक्रीयोग्य उत्पादनक्षम होऊन जाईल.
केळी, कलिंगड व अन्य पिके
अनेक वर्षांपासून केळीची बागही जोपासली आहे. सरासरी १५०० झाडे उत्पादनक्षम आहेत. त्यावर २८ किलो वजनाचा घड मिळतो. दहा रुपये प्रति किलो असा दर मिळतो. डिसेंबर काळात कलिंगडाची लागवड होते. त्याचे एकरी १५ ते २८ टन उत्पादन मिळते. मार्चमध्ये म्हणजे उन्हाळ्यात ते विक्रीस येते. त्यास किलोला १० रुपये दर मिळतो. या व्यतिरिक्त अंजीर, फणस, आंबे (दहा प्रकार), मोसंबी, संत्रा, नारळ आदी प्रत्येकाची प्रत्येकी २० झाडे लावली आहेत.
हंगामी पिकांचीही साथ
बहूवर्षायू पिकांसोबत हंगामी पिकांचा मिलाफ घातला आहे. यातील कापसाचे एकरी १५ क्विंटल उत्पादन मिळते. गव्हाचे एकरी १२ क्विंटल उत्पादन मिळते. तीस रुपये प्रति किलो दराने जागेवरूनच त्यास मागणी राहते. सोयाबीन व तूर अशी तीस एकरांवर पीकपद्धती राबवली आहे. यातील तुरीचे एकरी साडेआठ क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्यात येते. विविध किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे, निळे गंधसापळे तसेच सौर ऊर्जा आधारित सापळे लावले आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर २०२३-२४ मध्ये पॅक हाउस बांधले आहे. मजूरटंचाईवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरण केले आहे. तसेच २२ आणि ४५ एचपी क्षमतेचे दोन ट्रॅक्टर्स आहेत.
इस्राईलचा अभ्यास दौरा
भरपूर कष्ट, त्यातून कमावलेला दीर्घ अनुभव, अभ्यास व प्रयोगशीलतेत हातखंडा यातून कृष्णरावांनी शेतीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. यापूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेकडून त्यांना वसंतराव नाईक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच २०१९-२० मध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून इस्राईल दौऱ्यासाठीही निवड झालेले कृष्णराव हे जिल्ह्यातील एकमेव शेतकरी होते.
कृष्णराव देशट्टीवार ९४२२१२६१६१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.