Medicinal Plants : शेतकऱ्यांनी टिकवलेय औषधी पानपिंपळीचे अस्तित्व

Panpimpali : अकोला, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांत पसरलेल्या सातपुडा पर्वतीय भागातील शेतकरी अत्यंत मेहनतीतून उत्तम दर्जाची पानपिंपळी येथील मातीत पिकवीत आहेत.
Panpimpali Farming
Panpimpali FarmingAgrowon
Published on
Updated on

Panpimpali Medicinal Plant : अकोला, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांच्या उत्तर सीमेला सातपुडा प्रदेश आहे. या लगतच्या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने पानपिंपळी या औषधी वनस्पतीची शेती होते. पूर्वी पानमळ्यांची लागवड करणारे व सिंचनाची सोय असलेले शेतकरी या वेलवर्गीय पिकाचे उत्पादन घेतात. मागील काही काळात या भागात पानपिंपळीखालील क्षेत्र अडीच हजार एकरहून अधिक पुढे पोचले असावे.

...अशी आहे पानपिंपळी

शास्त्रीय भाषेत पायपर लाँगम असे नाव असलेल्या पानपिंपळीला पानपिंपरी, पिप्पल, टिपली, लेंडी पिंपरी अशी विविध नावे आहेत. विविध औषधे, मसालेवर्गीय उत्पादने यात पिंपळीचा वापर होतो. अकोला, बुलडाणा आदी भागांतील जमीन व हवामान या पिकाला पोषक मानली जाते.

पणज (ता. अकोट, जि. अकोला) येथील गजानन आकोटकार यांना १५ ते १८ वर्षांपासून या पिकाचा अनुभव आहे. ते सांगतात, की एक वर्षाचे हे बहुवार्षिक वेलवर्गीय पीक आहे. जानेवारीत त्याची लागवड तर डिसेंबर काळात काढणी हंगाम असतो. वाफे तयार करून आधीच्या लागवडीतील कांड्यांचाच बेणे म्हणून वापर होतो. त्यामुळे ते बाहेरून विकत घेण्याची गरज भासत नाही.

हादग्याच्या आधारावर वेली

लागवडीपूर्वी उभी, आडवी नांगरट करून कुळवाच्या पाळ्या देण्यात येतात. त्यानंतर गादीवाफे बनविले जातात. बेणे लागवडीपूर्वी पाट पद्धतीने पाणी देऊन वाफसा येऊ दिला जातो. जानेवारी व जूनमध्ये हेक्टरी २० टनांपर्यंत शेणखत व गाळाच्या मातीचा वापर होतो. लागवडीनंतर काही दिवसांनी उगवण होऊन वेल वाढीस लागतो.

त्याला आधार द्यावा लागतो. त्यासाठी हादगा, पांगरा, सावरी यापैकी एका झाडाची लागवड करावी लागते. गवत किंवा प्लॅस्टिक दोऱ्यांच्या साह्याने या झाडांना वेल बांधण्यात येते. हे काम जुलै ते ऑगस्टपासून सुरू होते. तांत्रिक स्वरूपाचे हे काम असल्‍याने त्यासाठी कुशल मजूर लागतात. पीक तणमुक्त ठेवण्यासाठी निंदणी करावी लागते.

Panpimpali Farming
Ganesh Patri : गणेशपत्रींचे औषधी महत्त्व काय आहे?

काढणी व उत्पादन

लागवडीनंतर वेली पाच ते सहा महिन्यांच्या झाल्यानंतर पिंपळी येण्यास सुरुवात होते. ऑक्टोबरच्या काळात ती परिपक्व होऊ लागते. पिंपळीची लांबी दोन ते अडीच सेंटिमीटर असते. रंग गर्द हिरवट काळसर असतो. परिपक्व झालेल्या पिंपळीची मजुरांमार्फत देठापासून तोडणी केली जाते. ऑक्टोबर ते जानेवारी या काळात ३ ते ४ वेळा तोडणी होते. पिंपळी सूर्यप्रकाशात वाळवणीसाठी ठेवली जाते.

आठवडाभराच्या प्रक्रियेनंतर ती बाजारपेठेत विक्रीसाठी योग्य होते. सुमारे साडेपाच ते सहा किलो हिरव्या पिंपळीपासून एक किलो वाळलेली पिंपळी मिळते. एक ते दीड वर्षे ती साठवूनही ठेवता येते. या भागातील शेतकरी एकरी ५ ते ८ क्विंटलपर्यंत त्याचे उत्पादन घेतात. आकोटकार सांगतात की एकरी आठ क्विंटलपर्यंत मी उत्पादन घेतो. मात्र मरसारख्या रोगाचे आक्रमण झाल्यास पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसानही होऊ शकते.

बाजारपेठ

पानपिंपळीला औषधी कारणांसाठी उत्तरेकडील राज्यांत मागणी असते. प्रामुख्याने दिल्ली भागातील व्यापारी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. स्थानिक खरेदीदारांच्या माध्यमातून ते पानपिंपळीची उचल करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ शोधण्यासाठी अन्यत्र जाण्याची गरज भासत नाही. प्रति किलो ३५० ते ३९० रुपयांपर्यंत दर मिळतात. मागणीनुसार ते दरवर्षी बदलतातही.

पानपिंपळी उत्पादकांसमोरील अडचणी

मर रोगाची मोठी समस्या.

पिकाचा दर्जा नसल्याने शासन दरबारी कागदोपत्री नोंद नाही. त्यामुळे आपत्तीच्या काळात शासकीय मदत मिळत नाही.

पीक नोंद नसल्याने विमा उतरवता येत नाही.

एकरी उत्पादन खर्चही वाढला आहे. पिकाचे क्षेत्र दरवर्षी वाढत असल्याने या भागात शेतीचा एक वर्षाचा ठोका ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

Panpimpali Farming
Medicinal Plant Farming : औषधी वनस्पती मूल्यसाखळी प्रकल्पांना २५ लाखापर्यंत अनुदान

सातपुड्यातील शेतकरी जोपासताहेत औषधी वनस्पती

अंजनगाव सूर्जी (जि. अमरावती) येथील ‘कार्ड’ संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार लाडोळे मागील अनेक वर्षांपासून औषधी वनस्पतींच्या विषयांवर कार्य करीत आहेत. ते म्हणाले, की बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांतील बारी समाज पिढ्यान् पिढ्या पानवेली, पानपिंपळीच्या व्यवसायात आहे.

ही औषधी पिके त्यांनी जोपासून ठेवली आहेत. या पिकांवर अद्याप अधिक संशोधन होण्याची गरज आहे. अलीकडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (अकोला) पानपिंपळी पिकावर काम हाती घेतले. जास्त उत्पादन देणाऱ्या वेलींचे दोन वर्षांत संकलन करीत नवीन बेणे तयार करण्याचा प्रयत्न होत आहेत. ‘कार्ट’ संस्थेने पानपिंपळी पिकाला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी अमरावती कृषी विभागाकडे प्रस्ताव दिला आहे. त्याच्या पुढील कार्यवाहीसाठी कृषी विभागाने होकार दर्शविला आहे. ही एक नवी सुरुवात मानता येईल.

पानवेलीचे उत्पादन : पानवेलीचे उत्पादन करणारे दानापूर (ता. तेल्हारा) येथील शेतकरी मंगेश विश्‍वनाथ हागे म्हणाले, की दरवर्षी आम्ही हे पीक घेत असतो. सध्या १२ गुंठ्यांत लागवड आहे. आमच्या भागात पानमळ्यांची संख्या बोटावर मोजता येईल एवढीच आहे. यामागे अनेक कारणे आहेत. वातावरण बदलामुळे पिकाचे नुकसान होत आहे. मजुरी खर्च वाढला आहे. पानांची मागणी देखील पूर्वीपेक्षा कमी झाली आहे.

पानपिंपळीची बाजारपेठ : दिल्ली, मुंबई, निमच, कोलकता, इंदूर, बंगळूर येथील औषधी वनस्पतींच्या बाजारपेठा आहेत. त्या ठिकाणी पानपिंपळीची विक्री होते. शेतकरी या वनस्पतीचे ‘मार्केटिंग’ आवश्यकतेप्रमाणे स्थानिक पातळीवर अधिक करतात. दिल्ली, मुंबई येथील विविध औषधी कंपन्यांमध्ये या उत्पादनाचा वापर होत असल्याने तेथे मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठांची वार्षिक मागणी एक हजार टनांपर्यंत असावी असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. केरळमध्ये या पिंपळीची ‘विश्‍वम’ नावाची जात आढळते. त्यास तुलनेने जास्त दर मिळत असल्याचेही अभ्यासकांनी सांगितले.

पीक विकास समितीची उदासीनता

पानपिंपळीला पिकाचा दर्जा मिळावा, पीकविम्याच्या कक्षेत आणले जावे यासाठी शेतकरी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. यात गजानन आकोटकार (रा. पणज) आदी अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे. अमरावती विभागस्तरावर पानमळा व पिंपळी पीक विकास समितीही काही वर्षांपूर्वी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. यात अधिकारी, शास्त्रज्ञ, शेतकरी सदस्य आहेत. काही बैठकाही झाल्या. शेतकरी मागण्यांचे अहवाल शासनाकडे पाठवण्यातही आले. मात्र अद्याप कुठलाही ठोस निर्णय शासनस्तरावरून झालेला नाही.

पानपिंपळी अनेक वेळा आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. काही वेळा एकरी एक लाख ते ७० हजार रुपयांपर्यंत नफाही मिळतो. मात्र वाडवडिलांपासून त्याचा चालत आलेला वारसा किंवा अस्तित्व आम्ही टिकवला आहे. पूर्वी शासनाकडून वनौषधी घटकातून अनुदान मिळायचे. आज ते बंद झाले आहे. उत्पादन व उत्पन्नाचा ताळमेळ बसविताना अडचणी येतात. पानपिंपळी टिकवून धरण्यासाठी शासनाच्या पाठबळाची गरज आहे.

गजानन आकोटकार ९३२५९१५६०० पणज (ता. अकोट)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com