
डॉ. विलास जाधव, रूपाली देशमुख
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेल्या वाणगाव येथे २६ वर्षे वयाचे युवक सुश्रुत पाटील यांच्या कुटुंबाचे वास्तव्य आहे. तालुक्यातील निसर्गसंपन्न चंडीगाव हे पाटील यांचे मूळ गाव आहे. येथे एकत्रित कुटुंबाची त्यांची भातासह आंबा, चिकू व आदींच्या फळबागांची शेती आहे. या भागात फळे- भाजीपाला यांची लागवड मोठ्या प्रमाणात असते.
मात्र असमाधानकारक दर, बाजारपेठांची शाश्वती नसणे, वाढता उत्पादन खर्च, मजुरांचा अभाव अशा अडचणी शेतकऱ्यांना जाणवतात. मुंबईहून २०१९ मध्ये जैवतंत्रज्ञान विषयातील पदवी घेतलेल्या अभ्यासू वृत्तीच्या सुश्रुत यांनी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणींवर तोडगा शोधण्याचे ठरवले.
प्रक्रियेतील संधी ओळखली
फळे व भाजीपाला यांचे निर्जलीकरण करून मात्र त्यांचे नैसर्गिक गुण कायम ठेवून चिप्स, पावडर, स्लाईस (काप) आदी विविध स्वरूपातील उत्पादने तयार करता येतात. त्यांना बाजारपेठ देखील चांगली आहे.
हीच संधी सुश्रुत यांनी ओळखली. नोकरीच्या मागे न लागता याच उद्योगात उतरण्याचे त्यांनी निश्चित केले. तमिळनाडूतील तंजावर येथील अन्नप्रक्रिया संस्थेला भेट देऊन अधिक माहिती घेतली.
कृषी विज्ञान केंद्र कोसबाड, डहाणू यांनी आयोजित केलेल्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया प्रशिक्षणामध्ये सुश्रुत यांची आई अमिता पाटील यांनीही सहभाग घेतला. पूर्ण अभ्यास व विचारांती २०१९ मध्ये उद्योगाला सुरुवात झाली. परंतु मध्यंतरी कोरोनाच्या संकटात त्याला काहीसा प्रतिबंध लागला.
उद्योग आला आकारास
कोरोनाची लाट ओसरत गेली तशी उद्योगाने पुन्हा गती घेतली. आसनगाव माटण परिसरात सुमारे साडेसहा हजार चौरस मीटर क्षेत्रात प्रक्रिया उद्योगाची स्थापना केली. क्लीनिंग- ग्रेडिंग, प्रीड्राईंइंग डोम, निर्जलीकरण यंत्रे, पल्वरायझर, वेट बॅलेन्स, पॅकिंग अशी आवश्यक सर्व यंत्रसामग्री उभारली.
सुश्रूत यांच्या उद्योगात आंबा, जांभूळ, चिकू, स्ट्रॉबेरी, अननस, सफरचंद, किवी, ब्लू बेरी आदी विविध फळांचे यांत्रिक पध्दतीने निर्जलीकरण करून स्लाइस (काप किंवा फोडी) तयार केले जातात. त्याचबरोबर मेथी, आले, शेवगा, पुदिना, बीटरूट, जांभूळ बी, अर्जुनसाल आदी शेतमालावरही निर्जलीकरण प्रक्रिया करून स्लाइस, पावडर, क्यूब स्वरूपातील निर्जलीकृत उत्पादने (डीहायड्रेटेट प्रोडक्ट्स) तयार केले जातात.
कच्च्या मालाची खरेदी
सफरचंद, किवी, अननस आदी फळे देशातील विविध भागांतून मध्यस्थांमार्फत खरेदी केली जातात. ब्ल्यूबेरी कॅनडातून घेतली जाते. परिसरातील शेतकऱ्यांशी चांगले नेटवर्क असल्याने त्यांच्याकडूनही योग्य दरात फळे, भाज्या आदी शेतमाल खरेदी केला जातो.
त्यामुळे या उद्योगाशी अनेक शेतकरी जोडले गेले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा अडत, वाहतूक, हमाली आदी खर्चही वाचले असून त्यांनाही दोन पैसे अधिक मिळू लागले आहेत. सुश्रुत यांनी तीनशेहून अधिक शेतकऱ्यांना संघटित करून शेतकरी उत्पादक कंपनी बनविण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.\
उत्पादनांची गुणवत्ता, पॅकिंग
सर्व उत्पादने आकर्षक पॅकिंगमध्ये फ्रूटॉन ब्रॅंडने बाजारपेठेत आणली आहेत. ‘फूड सेफ्टी’ परवाना घेतला आहेच. शिवाय उत्पादनांचे ‘एनएबीएल’ संमत प्रयोगशाळेतून परिक्षण करून घेतले आहे. उत्पादने पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनविली जातात. निर्जलीकरण तंत्रज्ञानातून मूल्यवर्धन करताना त्यात कोणत्याही रासायनांचा वापर केला जात नाही.
पदार्थांची मूळ चव, रंग, गंध यात कोणताही बदल होत नाही. बाजारपेठेतील मागणीमुसार ५० ग्रॅम ते पाच किलोपर्यंत विविध आकारात पॅकिंग तयार केले आहे. फळांवर आधारित उत्पादनांची प्रति किलो ५०० ते तीन हजार रुपये तर भाज्यांवर आधारित उत्पादनांची प्रति किलो २०० ते २५० पर्यंत विक्री होते.
उत्पादनांचे प्रमोशन
विक्रीच्या सुरुवातीच्या टप्प्प्यात मुंबई, दिल्ली येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय अन्नप्रक्रिया प्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला. त्यातून आत्मविश्वास वाढला. सन २०२४ मध्ये दुबई येथे फूड एक्सपो या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग घेतला. विविध देशांतून आलेले कंपन्यांचे प्रतिनिधी, व्यापरी, शेतकऱ्यांशी चर्चा घडली.
त्यातून परदेशातील मागणी लक्षात आली. काही प्रतिनिधींकडून ‘सॅम्पल’ मालाची मागणी पुढे आली. देशांतर्गत बाजारपेठेचाही अभ्यास करताना व्यापारी, उद्योजकांसोबत संवाद केला. त्यातून मार्केटिंग व विक्रीची दिशा पक्की झाली. आज रिटेल व ऑनलाइन पद्धतीने उत्पादनांना बाजारपेठ मिळवली आहे.
काही लाखांपर्यंत उलाढाल होत आहे. ‘बी टू बी’ पद्धतीनेही मार्केटिंग तंत्र वापरले जाते. उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी www.frutons.com या वेबसाइटची सुविधा उपलब्ध केली आहे. आरोग्याच्या दृष्टीने उत्पादनांचे फायदे आदी विविध सविस्तर माहिती त्याद्वारे उपलब्ध केली आहे. ग्राहकांना वेबसाइटवरूनही माल खरेदी करण्याची सुविधा आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर विक्री व व्यवस्थापनासाठी केला जातो. यू-ट्यूब, फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांचीही मदत उत्पादनांच्या प्रमोशनसाठी घेण्यात येते.
केव्हीकेच्या सहकार्यातून मार्गदर्शन
कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथे अन्नप्रक्रिया उद्योगासंदर्भात सातत्याने प्रशिक्षणवर्ग घेण्यात येतात. यामध्ये सुश्रुत यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले आहे. उद्योग प्रकल्पासाठी सुमारे चार कोटींचे भांडवल गुंतवावे लागले आहे. सुश्रुत यांना उत्पादने निर्मितीत आईची मोठी साथ आहेच.
शिवाय चुलतबंधू श्रेयस देखील आपली नोकरी सोडून उद्योगात पूर्णवेळ सहभागी झाले आहेत. उद्योगात महिला सक्षमिकरण संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. निर्मिती प्रक्रियेपासून मार्केटिंगपर्यंत ६० ते ७० महिलांना रोजगार दिला आहे. कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन पाटील कुटुंबाला मिळाले आहे. कृषी- आत्मा विभाग यांचाही मोलाचा वाटा आहे.
सुश्रुत पाटील, ९९७०५७४००९, विलास जाधव, ८५५२८८२७१२
(लेखक श्री. जाधव कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, जि. पालघर येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख तर श्रीमती देशमुख गृहविज्ञान शास्त्रज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.