Rural Development : धुळगावने साधला शेतीसह ग्रामविकास

Agriculture Development : अग्रण धुळगाव (जि. सांगली) या एकेकाळी दुष्काळी गावाने मागील काही वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कृषी, जलसंधारण असे पंचसूत्री कार्यक्रम राबवले. त्यातून गाव दुष्काळमुक्त झाले.
Dragon Fruit Farming
Dragon Fruit Farming Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : सां गली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ हा दुष्काळी तालुका आहे. द्राक्ष, डाळिंबासह खरीप, रब्बी पिके तालुक्यात घेतली जातात. याच तालुक्यातील अग्रणी नदीकाठावर अग्रण धुळगाव वसले आहे. गावची लोकसंख्या साडेचार हजारपर्यंत आहे. सैनिकांचे गाव अशीही गावाची ओळख आहे. पहिल्या महायुद्धापासून आजअखेर भारतीय सैन्य दलात इथल्या सैनिकांनी सेवा केली आहे. सध्या ७१९ आजी- माजी सैनिक गावात आहेत. शिवकालीन वारसा असलेले धुळोजी भोसले सरदार यांच्या नावावरून गावाचे नामकरण झाल्याचे गावकरी सांगतात.

पाण्यासाठी गाव एकवटले

एकेकाळी भटकंती करून, प्रसंगी सायकलवर घागर बांधून येथील गावकऱ्यांनी पाणी आणले. टॅंकरने पाणी विकत घेऊन पिके जगवली. गावात डिसेंबरपासून पाणीटंचाई निर्माण व्हायची. मग टॅंकरने जूनच्या मध्यापर्यंत पाणीपुरवठा केला जायचा. गावकऱ्यांनी जलसंधारणाच्या कामांमधून गावाला दुष्काळमुक्ती द्यायचा निश्‍चय केला.

प्रसिद्ध जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांची जलबिरादारी संस्था, पाणी फाउंडेशन, सह्याद्री देवराई, नाम फाउंडेशन या संस्थांसह अन्य सामाजिक संस्था, कंपन्या अशा कामांना मदतीचा हात देतात याची माहिती मिळाली. अशा संस्थांसोबत चर्चा करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली.

काळा ओढा, नांगोळे ओढा, बामण ओढा, अग्रणी नदी खोली- रुंदीकरण आदी कामे झाली. नाला बांध, वनराई बांध, चर खोदाई अशी कामे श्रमदानातून करण्यासाठी गाव एकवटले. गायरानातील २५ हेक्टरवर चर खोदाई, नाला बांध, छोटे पाझर तलाव अशी कामे झाली. अटल भूजल योजनाही राबवली.

Dragon Fruit Farming
Agriculture Success Story: केवळ १२ गुंठ्यात भाजीपाला उत्पादन! सुमनबाईंचा संघर्ष आणि यशाचा प्रवास

गाव झाले टॅंकरमुक्त

हिंगणगाव मंडळाची पावसाची वार्षिक सरासरी ४५७ मिलिमीटर आहे. याच मंडळात अग्रण धुळगाव येते. जलसंधारणाच्या कामांमुळे पावसाचे पाणी नाला बांध, छोटे पाझर तलाव यांमध्ये साठू लागले. शेती बागायती होण्यास चालना मिळाली. दरम्यान, म्हैसाळ योजनेचे शिवारात फिरले. दोन वर्षांत गाव टॅंकरमुक्त झाले. नदीवर चार मोठे बंधारे असून, त्यांची पाणी साठवण क्षमता अडीच दशलक्ष घनफूट आहे. आता भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे.

सन २०२० पासून कृषी विभागाने गावात विविध प्रात्यक्षिके घेण्यास सुरुवात केली. यात बीजप्रक्रिया, लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व्यवस्थापन, हुमणी नियंत्रण आदी घटकांचा समावेश राहिला. त्यातून ज्वारी, मका, उडीद, हरभरा पिकांची उत्पादकता वाढण्यासाठी मदत मिळाली असे गावातील बाळासाहेब गुरव, श्रीकृष्ण भोसले सांगतात.

Dragon Fruit Farming
Women Agriculture Success Story: ऊस रोपवाटिकेत एका महिलेचे यश; सारिका लठ्ठे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्वतःपासून सुरुवात

झाडे लावण्याचा वसा शाळेने घेतला होता. त्यामुळे मुले शाळेच्या पटांगणावर झाडे लावू लागली. दहावी झाल्यानंतरही शिवदास भोसले यांनी वृक्ष लागवड सुरू ठेवली. माजी सैनिक सुरेश सुतार यांनी मदतीचा हात दिला. गावात बदल करायचा असले तर स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे हे ब्रीद त्यांनी तयार केले. त्यानंतर विशाल देशमुख, अण्णासाहेब भोसले, मोहन भोसले असे तरुण वृक्ष लागवडीसह श्रमदानासाठी एकत्र आले.

गावात झालेल्या ठळक सुधारणा

तरुण मंडळींकडून फाउंडेशनची स्थापना. त्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कृषी, जलसंधारण असे उपक्रम.

आजपर्यंत ४३ हजार ७३० वृक्ष लागवड.

शिक्षण, कृषी, आरोग्य, महिला सबलीकरण असे २६ विभाग. त्यासाठी २४६ जणांचे पथक. प्रत्येक विभागासाठी ३० ते ४० युवकांची नेमणूक.

पक्षिसंवर्धनासाठी मूठभर धान्य, घोटभर पाणी ही योजना वर्षभर राबवली जाते.

पहाटे पाच वाजता उठा उठा पहाट झाली, अभ्यासाची वेळ झाली असा पहिला भोंगा वाजतो. सायंकाळी सात वाजता मुलांच्या अभ्यासाची वेळ झाली अशी घोषणा होते. मुले टीव्ही, मोबाइल बाजूला ठेऊवून अभ्यासाला बसतात.

राबविलेले अभियान

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

संपूर्ण स्वच्छता अभियान

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

जलयुक्त शिवार

माझी वसुंधरा

चला सावली पेरूया

धूरमुक्त गाव

एक फौजी, एक वृक्ष

ग्रामपंचायतीत वृक्ष लागवडीचा ठराव.

विवाह नोंदणीनंतर पाच वृक्ष, तर जन्म-मृत्यू नोंदणीवेळी प्रत्येकी एका झाडाची लागवड.

शेतकरी प्रतिक्रिया

पर्यावरण संतुलनासह गावच्या शाश्वत विकासासाठी गावकऱ्यांची धडपड आहे. मधाचे गाव करण्याच्या दृष्टीने प्रयत्न असून, शेतकरी मधमाशीपालन प्रशिक्षणासाठी पुढे येऊ लागले आहेत.

शिवदास भोसले, सरपंच ९४२१३४५५६६

आमच्या शेतीला शाश्‍वत पाणी मिळाल्याने बागायती क्षेत्र वाढले आहे. त्यातून शेतीचे अर्थकारण वाढण्यास मदत होणार आहे.

रमेश खंडागळे, शेतकरी

आमची सोळा एकर शेती आहे. आता १२ एकर शेती बागायती झाली आहे. पाणी टंचाईमुक्त झाल्याचे आम्हाला समाधान आहे.

वसंत भोसले ७३८७९०५५२०

गावात अजूनही जलसंधारणाची कामे सुरू आहेत. येत्या काळात भूजल पातळी अजून वाढण्यास मदत होईल.

प्रवीण कुंभार ९८७७७७१५६०

कार्यशाळेच्या माध्यमातून गावात २५० एकरांवर पाचट व्यवस्थापन केले जाते. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मधमाशीपालन प्रशिक्षणासाठी ४६ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.

गजानन अजेटराव, कृषी सहायक ९०४९४६९५२२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com