Vegetable Farming : अल्पभूधारक असूनही मिळविली आत्मनिर्भरता

इटलापूर (ता. जि. परभणी) येथील हरिभाऊ पुंड आणि त्यांच्या पत्नी सत्यभामा या दांपत्याकडे अडीच एकर शेती असली तरी त्यातील केवळ एक एकर क्षेत्राला पुरेसे पाणी उपलब्ध आहे. या एक एकर क्षेत्रामध्ये भाजीपाला व फुलशेतीचे नियोजन करत आहेत.
Vegetable Cultivation
Vegetable Cultivation Agrowon

Vegetable Farming: परभणी शहरापासून ९ कि.मी. अंतरावर इटलापूर हे गाव आहे. सिंचनासाठी (Agriculture Irrigation) पाण्याची उपलब्धता आणि जवळच असलेली जिल्ह्याची बाजारपेठ यामुळे येथील अनेक शेतकरी बारमाही भाजीपाला (Vegetable) व फुलशेती (Flower Farming) करतात.

या शेतीतून मिळत असलेल्या दैनंदिन शाश्वत ताज्या उत्पन्नामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या (Marginal Farmer) अर्थकारणाला बळकटी मिळत आहे. या गावातील हरिभाऊ गोविंदराव पुंड यांचीही केवळ अडीच एकर शेती आहे.

९ वी पर्यंत शिक्षण झालेले हरिभाऊ गेल्या ४० वर्षापासून शेती करत आहेत. वडिलांपासून त्यांचा फुलशेतीवर अधिक भर होता. त्यांच्या वाट्याला आलेल्या अडीच एकर जमिनीपैकी एक एकर मध्यम ते भारी प्रकारची असून, तिथे सिंचनासाठी सामाईक विहीर आणि दोन बोअरवेल आहेत.

सिंचनासाठी पुरेसे पाणी असल्यामुळे वर्षभर भाजीपाल्याचे उत्पादन घेणे शक्य होते. गाव शिवारातच दुसरीकडे दीड एकर हलकी ते मध्यम प्रकारची जमीन आहे. तिथे खरिपात सोयाबीन, तर रब्बीमध्ये ज्वारीचे उत्पादन घेतले जाते.

Vegetable Cultivation
Vegetable Farming : एकीच्या बळावर फुललं शिवार...

छोट्या छोट्या क्षेत्रावर भाजीपाला

एक एकर क्षेत्रात ३ ते ६ गुंठ्यांमध्ये विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करतात. पालेभाज्यांमध्ये पालक, चुका, शेपू, मेथी, कोथिंबीर इ. चे वर्षभर उत्पादन घेतले जाते. मशागतीनंतर शेणखत तसेच रासायनिक खतांची मात्रा देऊन पालक लागवड करतात.

२१ ते २५ दिवसांनी पालक काढणीस येतो. चुका लागवडीनंतर ४५ दिवसांनी उत्पादन सुरू होते.या दोन पालेभाज्यांचे २ ते ३ त्यानंतर उत्पादन मिळत राहते. पालक आणि चुक्याचे घरच्यापुरते बीजोत्पादन घेतात.

त्यामुळे शक्यतो बियाणे विकत घ्यायची गरज पडत नाही. कोथिंबिरीचे ५५ दिवसांनी उत्पादन सुरु होते. कंदवर्गीय पिकांमध्ये पातीचे कांदे, लसूण, बीट रूट इ. घेतले जाते. रब्बी हंगामात पातीसाठी कांद्याची लागवड करतात.

कांद्याला चांगले दर मिळाल्यास ३० ते ४० हजार रुपये उत्पन्न मिळते. तसेच लसूण आणि बीट रुटची लागवड करतात. बीटरुटला चांगली मागणी असून, अन्य पिकांच्या तुलनेत किफायतशीर उत्पन्न मिळते. अनेक वर्षापासून बीट रूट उत्पादनात सातत्य ठेवले आहे.

वेलवर्गीय पिकांमध्ये दुधी भोपळा, कारले इ. चे बारमाही उत्पादन घेतात. फळभाज्यांमध्ये मिरची, टोमॅटो इ. आदी भाजीपाल्याचा समावेश आहे. मिरचीची मे महिन्यात लागवड केल्यानंतर ऑगस्टमध्ये उत्पादन सुरू होते.

टोमॅटोची जून महिन्यात लागवड केल्यानंतर सप्टेंबर मध्ये उत्पादन सुरू होते. टोमॅटोचा हंगाम ४ ते ५ महिने चालतो.

भेंडीची जानेवारी आणि जून महिन्यात २ ते ३ गुंठ्यावर लागवड करतात. हिवाळ्यात फ्लॉवर, कोबी आणि मेथीचे उत्पादन घेतात. फ्लॉवरची रोपे विकत आणून लागवड करतात. फ्लॉवरचे आणि कोबीचे अडीच महिन्यांत उत्पादन सुरू होते. पंधरा ते वीस काढणी सुरू राहते.

Vegetable Cultivation
Flower Farming : फुलशेतीच्या बळावर फुलवला संसार

फुलशेतीतून नियमित उत्पन्न...

एकत्रित कुटुंबात असल्यापासून हरिभाऊ यांना फुलशेतीचा अनुभव आहे. त्या वेळी ते शेवंती आणि गलांडा या फुलांचे उत्पादन घेत. त्याकाळी परभणी येथे फुलाची बाजारपेठ नसल्यामुळे नांदेड येथे फुले विक्रीसाठी नेली जात.

मात्र आता परभणी येथील ग्राहकांकडून फुलांना मागणी वाढली आहे. आता त्यांच्याकडे झेंडू, बिजली, गलांडा यांसह पिवळी, पांढरी, तपकिरी रंगाच्या शेवंती फुलांचे उत्पादन घेतले जाते. श्रावण महिन्यात विविध प्रकारच्या फुलांना अधिक मागणी असते.

श्रावणात प्रतिकिलो सरासरी १२० ते १३० दर मिळतात. अन्य महिन्यात ८० ते १०० रुपये किलो दर मिळतात. त्याच प्रमाणे विविध सण, समारंभ यासाठी फुलांचे हार तयार करूनही विक्री करत असल्याने अधिक फायदा होतो.

Vegetable Cultivation
Vegetable Crop Management : शेतकरी नियोजन पीक : भाजीपाला

पत्नीची खंबीर साथ...

हरिभाऊ यांच्या पत्नी सत्यभामा यांचे माहेरही इटलापूरचेच असल्याने त्यांनाही भाजीपाला व फुलशेतीचा चांगला अनुभव आहे. त्या घरकाम सांभाळून त्या भाजीपाला लागवड ते काढणी, काढणी पश्चात स्वच्छता, प्रतवारी अशा कामांमध्ये खंबीर साथ देतात.

त्यांच्याकडे एक गाय आहे. स्वतःची बैलजोडी नसल्यामुळे नातेवाइकांची बैलजोडी आणून विविध कामे करून घेतात.

कामाचे नियोजन...

कोणत्याही शेतकरी कुटुंबाप्रमाणे पुंड दांपत्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतीत राबत असते. शेतीच्या प्रत्येक कामामध्ये सत्यभामा यांची खूप मदत होते. कारण हरिभाऊ यांना भाजीपाला विक्री करून यायला अकरा वाजतात.

त्यानंतर चार वाजेपर्यंत ते शेतीमध्ये काम करतात. त्यानंतर फुले आणि भाजीपाल्याची काढणी केली जाते. काढणीनंतर स्वच्छता, प्रतवारी, आवश्यकतेनुसार पॅकिंग करून सकाळी बाजारात नेण्यासाठी सज्ज ठेवली जातात.

स्वतःच करतात विक्री

हरिभाऊ दुचाकीवर पिशव्या बांधून भाजीपाला, फुले परभणी येथे विक्रीसाठी नेतात. वसमत रस्त्यावर दररोज भरणाऱ्या भाजीपाला बाजारात दररोज सकाळी साडेपाच ते दहा या वेळेत स्वतः बसून त्याची विक्री करतात.

त्यामुळे विक्रीतून अधिक नफा मिळतो. खर्च जाता रोज १००० ते १५०० रुपये उत्पन्न मिळते. त्यातून सर्व घरखर्च, पुढील पिकांसाठीचा खर्च भागवला जातो. जिरायती पिकांचे उत्पन्न बऱ्यापैकी शिल्लक राहते.

प्रापंचिक जबाबदाऱ्यांची पूर्तता शेतीतूनच

हरिभाऊ आणि सत्यभामा या दांपत्याला चार मुली आणि एक मुलगा आहे. प्रियंका, भाग्यश्री,आश्विनी या पदवीधर झाल्या आहेत. तर मुलगा कृष्णा बारावीला आणि स्वाती ही दहावीला आहे. सर्वांना योग्य शिक्षण मिळेल, याकडे लक्ष देत आहेत.

शिक्षण आणि विवाहाचा खर्च भाजीपाला आणि फुलशेतीमुळेच करणे शक्य झाल्याचे ते सांगतात. या सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्यांतूनही ठरावीक रकमेची बचत करत गावात पक्के घर बांधले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com